परभणीत भाकरी फिरणार..? आव्वाज कुणाचा? तर सध्यातरी आनंद भरोसे यांचाच...
Parbhani Assembly Election 2024 Shiv Sena Anand Bharose : परभणी विधानसभा मतदारसंघ गेल्या 35 वर्षांपासून शिवसेनेच्या ताब्यात आहे. सध्याही तेथे शिवसेनेचे डाॅ. राहूल पाटील हे आमदार आहेत. शिवसेना फुटीनंतर या तालुक्यातील शिवसेनाही विभागली गेली. यावेळी या मतदारसंघात दोन्ही शिवसेनेतच लढाई होत असून, पाटील यांच्यासमोर शिंदे गटाने आनंद भरोसे यांना उभे केले आहे. या तालुक्यातील महायुती एकसंघ असल्याने व स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीच येथे लक्ष घातल्याने सध्यातरी भरोसे यांचेच पारडे येथे जड समजले जात आहे.
मुख्यमंत्र्यांनी दिला भरघोस निधी
परभणी जिल्हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. येथे हिंदूहृदयसम्राट स्व. बाळासाहेबांना मानणारा मोठा वर्गआहे. गेल्या 25-30 वर्षांपासून या संपूर्ण जिल्ह्यात खासदार आणि परभणी विधानसभेचा आमदार हा शिवसेनेचाच राहिला आहे. शिवसेनेत फूट पडल्यानंतर खासदार आणि आमदारांनी उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबत राहण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आमदार आणि खासदारांना आपल्याकडे वळवण्याचा भरपूर प्रयत्न केला. परभणी जिल्ह्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोठ्या प्रमाणावर निधी देऊन नवी फळी उभी करण्याचे काम केले. ही शिंदे गटाच्या उमेदवारासाठी जमेची बाजू ठरणार आहे.

भाजपची ताकदही भरोसे यांच्या पाठीशी
परभणी जिल्ह्यातील नेते ठाकरेंसोबत राहिले असले तरी, गेल्या वर्षभरात शिंदे गटानेही येथे चांगली ताकद वाढवली आहे. लोकसभेला ही जागा महायुतीचा मित्रपक्ष असलेल्या रासपला सोडण्यात आली होती. मात्र लोकसभेला झालेली चूक विधानसभेला भरुन काढत यावेळी विधानसभेला शिंदे गटाने येथून उमेदवार दिला आहे. शिंदे गटाने भाजपशी मनोमिलन कायम ठेवण्यासाठी 2014 साली भाजपकडून लढलेल्या आनंद भरोसे यांनाच आपल्याकडे घेत उमेदवारी दिली. शिंदे गटाने भाजपचाच उमेदवार दिल्याने येथे महायुतीत एकसंघपणा राहिला असल्याचे दिसत आहे.
उबाठाला निवडणुकीपूर्वीच धक्का
दोन-तीन महिन्यांपूर्वी परभणीतील ठाकरे गटाला धक्क्यामागून धक्के बसले. विद्यमान आ. पाटील यांच्यावर नाराज असलेल्या शेकडो कार्यकर्त्यांनी पक्षाला सोडचिठ्ठी देत शिंदे गटात प्रवेश केला. कारेगावचे ससपंच आप्पाराव वावरे यांनीही 21 ऑगस्टला शेकडो समर्थकांसह शिंदे गटात प्रवेश केला. आ. पाटील यांच्या कार्यपद्धतीवर नाराज होत, अनेकांनी भाजप किंवा शिंदे गटाची वाट धरली. त्यामुळे यंदाची निवडणूक ही पाटील यांच्यासाठी सोप्पी नसल्याचे बोलले जात आहे.
भरोसे यांनी जोडली सर्वसामान्यांशी नाळ
2001 साली आनंद भरोसे यांनी राजकारणाला सुरुवात केली. गावातील सेवा संस्थेवर प्रभुत्व गाजवल्यानंतर त्यांनी परभणी कृषि उत्पन्न बाजार समितीवर दहा वर्ष प्रतिनिधीत्व केलं. या काळात त्यांची शेतकऱ्यांची चांगली नाळ जुळली. ते उपसभापतीही होते. त्यानंतर पंचायत समिती, जिल्हा परिषद या निवडणुकांतून ते जिल्हाध्यक्षपदापर्यंत गेल्याने सामान्यांचा नेता, ही त्यांची प्रतिमा तयार झाली. त्यांनी आतापर्यंत भरवलेल्या संजीवनी कृषी महोत्सवाला चांगला प्रतिसाद मिळाला आहे. कृषी क्षेत्रातील विविध उत्पादनांचे भव्य प्रदर्शन, चर्चासत्रे असे या महोत्सवाचे स्वरूप असते. कोरोना काळतही त्यांनी सामान्यांना मदतीचा हात दिला होता. या सगळ्या कामाच्या जोरावर आनंद भरोसे यांचेच पारडे जड आहे, असे दिसते.
परभणीकर भाकरी फिरवण्याच्या मनस्थितीत
ठाकरे गटाने राहुल पाटील यांना तिसऱ्यांदा उमेदवारी दिली. मात्र सलग तिसऱ्या टर्ममध्ये पाटील उमेदवारी करत असल्याने गेल्या दहा वर्षांच्या राजकारणात त्यांचे विरोधकही वाढले आहेत. शिवाय गेल्या वर्षभरात ठाकरे गटाकडील शेकडो सरपंचांनीही शिंदे गटात प्रवेश केल्याच्या बातम्या आल्या आहेत. शिंदे गटाची परभणी विधानसभेतील ताकद पाहता यावेळी परभणीकर भाकरी फिरवून आनंद भरोसे यांनाच आमदार करतील, अशी शक्यता राजकीय विश्लेषकांनी व्यक्त केली आहे.












Click it and Unblock the Notifications