'Walmik Karad : आमचे दैवत'; पंकजा मुंडेंच्या मेळाव्यात तुरुंगातील आरोपीच्या पोस्टरमुळे गदारोळ!
Pankaja Munde Dasara Melava 2025, Walmik Karad banner : लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या स्मृतीप्रित्यर्थ दरवर्षी आयोजित होणाऱ्या पंकजा मुंडे यांच्या दसरा मेळाव्यात यंदा एक अनपेक्षित आणि वादग्रस्त प्रसंग घडल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना चांगलेच उधाण आले आहे.
बीड जिल्ह्यातील सावरगाव घाट येथे पार पडणाऱ्या दसरा मेळाव्याच्या ठिकाणी संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी आणि सध्या तुरुंगात शिक्षा भोगत असलेला वाल्मिक कराड याचे पोस्टर झळकल्याचे दिसून आले.

'कराड आमचे दैवत' पोस्टरने वाढवला वाद
मेळाव्याच्या ठिकाणी झळकलेल्या या पोस्टरवर "We support walmik anna, कराड अण्णा आमचे दैवत" असा मजकूर स्पष्टपणे दिसत होता. वाल्मिक कराडच्या समर्थकांनी हे पोस्टर झळकवल्याची माहिती समोर आली आहे.
एका राजकीय नेत्याच्या महत्त्वाकांक्षी दसरा मेळाव्यात, गंभीर गुन्ह्याखाली शिक्षा भोगत असलेल्या व्यक्तीचे समर्थन करणारे पोस्टर झळकल्याने पंकजा मुंडे यांच्या उपस्थितीत मोठा राजकीय वाद निर्माण झाला आहे. या घटनेमुळे दसरा मेळाव्याच्या मूळ उद्देशापेक्षा ही घटनाच अधिक चर्चेत आली आहे.
अंजली दमानिया यांचा पंकजा मुंडेंवर हल्लाबोल!
सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी या संपूर्ण प्रकरणावर तीव्र संताप व्यक्त करत पंकजा मुंडे यांच्यावर थेट हल्लाबोल केला आहे. एका आरोपीचे पोस्टर झळकणे ही बाब 'शर्मेची' असून, या घटनेने राजकारणात आणि लोकांच्या मानसिकतेत आलेली 'विकृती' दर्शवते, असे दमानिया म्हणाल्या.
दमानिया यांनी कठोर शब्दांत म्हटले की, "इतक्या खालच्या दर्जाची कृत्य करून सुद्धा या लोकांचे अशा पद्धतीचे बॅनर झळकत असतील तर पंकजा मुंडे यांना घेराव घालून हा याबाबत प्रश्न विचारला पाहिजे."
त्यांनी पंकजा मुंडेंना उद्देशून प्रश्न उपस्थित केले: "यावर तुमचे म्हणणे काय? पंकजा मुंडेंना वैयक्तिकरित्या वाल्मीक कराड यांच्याबाबत काय वाटते?" त्याचबरोबर, धनंजय मुंडे यांना याबाबत विचारून काही फायदा नाही, कारण ती 'गॉन केस' आहे, असे म्हणत दमानिया यांनी धनंजय मुंडेंनाही लक्ष्य केले.
काय आहे दसरा मेळाव्याची पार्श्वभूमी?
दरवर्षीप्रमाणे यंदाही पंकजा मुंडेंचा दसरा मेळावा बीड जिल्ह्यातील सावरगाव घाट येथे मोठ्या जल्लोषात आयोजित करण्यात आला आहे. पंकजा मुंडे सकाळी ११ वाजता हेलिकॉप्टरने मेळाव्याच्या ठिकाणी दाखल झाल्या. त्यांनी सर्वप्रथम राष्ट्रसंत भगवान बाबा यांच्या मंदिरात जाऊन दर्शन घेतले आणि पूजा व आरती केली. यावेळी धनंजय मुंडे आणि लक्ष्मण हाके यांचीही उपस्थिती होती.
गोपीनाथ मुंडे समर्थक आणि भगवान बाबा भक्त मोठ्या संख्येने या मेळाव्याला उपस्थित आहेत. पंकजा मुंडे गोपीनाथ मुंडे यांच्या विचारांची परंपरा पुढे नेण्यासाठी कोणती नवी दिशा दाखवतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले असतानाच, वाल्मिक कराड यांच्या पोस्टरमुळे दसरा मेळाव्याला अनावश्यक वादाचे गालबोट लागले आहे. या संपूर्ण प्रकरणावर पंकजा मुंडे कोणती भूमिका घेतात, याकडे आता राज्याचे लक्ष लागले आहे.
मेळाव्यात पंकजा मुंडे काय म्हणाल्या?
पंकजा मुंडे म्हणाल्या की, 9 दिवस आमच्या घरात कांदा लसूण नाही, नॉनव्हेज नाही. नऊ दिवस आम्ही देवीची पूजा केली. या देवीने महिषासुर, रक्तबिजासारखा राक्षस संपवून टाकला आहे हे सांगताना त्यांनी आज रक्तबीजासारखा राक्षस जन्माला आलाय. तुमच्या मेंदूत जन्माला आला. चुकीच्या निर्णयातून, संदेशातून अनेक राक्षस उभे राहतात. जातीचे राक्षस, धर्मवादाचे राक्षस आहे. देवीला प्रार्थना करते हे राक्षस नष्ट करण्याची शक्ती दे.
पंकजा मुंडे म्हणाल्या की, महात्मा गांधी आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा एक प्रसंग सांगते. ते दोघे एका रूममध्ये असताना महात्मा गांधी वेळेवर झोपले होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर रात्रभर जागे होते महात्मा गांधींनी त्यांना विचारले तुम्ही का झोपले नाही तेव्हा डॉ.आंबेडकरांनी सांगितले की माझा समाज झोपला आहे म्हणून मला झोप येत नाही. तसाच तुमच्या डोळ्यातील अश्रू पाहून मला झोप येत नाही. प्रीतम ताईंनी बीडमध्ये रेल्वे आणली आणि मी पाणी आणल्याशिवाय मला झोप येणार नाही.
मी जात पात मानत नाही
पंकजा मुंडे म्हणाल्या, मी अनेकांच्या प्रचारासाठी गेले यावेळी मी त्यांची जात काय आहे पाहिले नाही. मी जात पात कधी पाहिली नाही. माझ्या भगवान बाबांनी आणि वडीलांनी मला ते कधीच शिकवले नाही. गोपीनाथ मुंडे यांनी कधीही मराठा आरक्षणाला विरोध केला नाही. त्यांनी केवळ म्हटले की आमच्या मुलांच्या ताटातील घेऊ नका.
खोटे काम करू नका आणि गुंड पाळू नका असे पंकजा मुंडे यांनी भगवान गडावरील भाषणात बोलताना म्हटले आहे. तर 2 घास कमी खा पण स्वाभिमान बाळगा असे आवाहन त्यांनी कार्यकर्त्यांना केला आहे.
भगवान गडावर धनंजय मुंडेंची शायरी
धनंजय मुंडें म्हणाले की, आग तो लगी थी घर में.. दोस्त ने आ के पुछा... घर में आग लगी है तो बचा क्या है.. मैं ने कहा.. मैं बचा हू तो दोस्त ने कहा... तू बचा है तो जला क्या है..
धनंजय मुंडें म्हणाले की,.हर मुश्कील को हसते हसते झेलते है हम... हम आंधीओ मे चिराग जलाते चलते है...












Click it and Unblock the Notifications