आता ओबीसी प्रचंड आक्रमक, जरागेंना अन् सरकारला दिला सर्वात मोठा इशारा
मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी 'सरसकट ओबीसी'तून आरक्षणाची मागणी केल्यानंतर आता ओबीसी संघटना आक्रमक झाल्या आहेत. जरांगे यांच्या मागणीला विरोध करत त्यांनी राज्यभर आंदोलने सुरू केली आहेत. जर ही मागणी मान्य झाली, तर आम्हीही मुंबईकडे कूच करू, असा इशारा ओबीसी संघटनांनी दिला आहे.

अंतरवाली सराटीत ओबीसींचे साखळी उपोषण
जरांगे यांच्या आंदोलनाचे केंद्र असलेल्या जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथेच ओबीसी बांधवांनी साखळी उपोषणाची तयारी सुरू केली आहे. १ ऑगस्टपासून या उपोषणाला सुरुवात होणार असून, याबाबतचे निवेदन उपजिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहे. ओबीसी आरक्षणात घुसखोरी थांबली पाहिजे आणि शिंदे समिती रद्द झाली पाहिजे, या प्रमुख मागण्यांसाठी ओबीसी समाज मैदानात उतरला आहे.
नागपुरात सर्वपक्षीय नेत्यांचा पाठिंबा
नागपुरातही राष्ट्रीय ओबीसी महासंघाने साखळी उपोषण सुरू केले आहे. या आंदोलनाला भाजप आणि काँग्रेससह सर्वपक्षीय नेत्यांनी पाठिंबा दिला आहे. आंदोलकांनी थेट इशारा दिला आहे की, जर त्यांच्या मागण्या मान्य झाल्या नाहीत, तर ते भविष्यात मुंबईकडे कूच करतील.
ओबीसी समाजाचे नेते लक्ष्मण हाके यांनी जरांगे यांच्या मागणीला कडाडून विरोध केला आहे. ते म्हणाले की, "जरांगे कोण आहेत? ते काही संवैधानिक पदावर बसलेले नाहीत. आमदारांनी ओबीसी आरक्षणाला धक्का लागणार नाही, याची भूमिका स्पष्ट केली पाहिजे."
याचप्रमाणे मंगेश ससाणे यांनीही जरांगे यांची मागणी बेकायदेशीर असल्याचे म्हटले आहे. ते म्हणाले की, "दहा-पंधरा टक्के लोकांनी संपूर्ण मुंबई जाम केली आहे." त्यांनी सरकारला इशारा दिला की, "बेकायदेशीर मागणीला बळी पडून ओबीसींच्या विरोधात कोणताही निर्णय घेऊ नये. गरज पडल्यास आम्ही संघर्ष करू."
यामुळे आता मराठा आणि ओबीसी समाज आरक्षणाच्या मुद्द्यावरून आमनेसामने येण्याची शक्यता निर्माण झाली आहे, आणि दोन्ही समाजांचे आंदोलन मुंबईकडे कूच करणार का, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.












Click it and Unblock the Notifications