मुलाचं नाईट लाइफ कमी केलं असतं, तर आजचा प्रसंग टळला असता; नितेश राणेंचा ठाकरेंवर पलटवार
शिवसेना (ठाकरे गट) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात राणे कुटुंबावर केलेल्या तीव्र टीकेला भाजपचे आमदार आणि मंत्री नितेश राणे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. उद्धव ठाकरे यांच्यावर वैयक्तिक आणि राजकीय पातळीवर निशाणा साधत नितेश राणे यांनी त्यांच्या मुलाच्या आयुष्यावरही थेट टिप्पणी केली.

शिवसेनेच्या वर्धापन दिनानिमित्त उद्धव ठाकरे यांनी सरकारवर आणि विरोधकांवर जोरदार हल्ला चढवला होता. याच पार्श्वभूमीवर नितेश राणे यांनी माध्यमांशी संवाद साधताना, "हिंदुत्वासाठी जे काम करत आहेत, त्यांच्यावर टीका होत असेल, तर हे बाळासाहेब ठाकरे यांचा विचार सोडल्याचं लक्षण आहे," असं स्पष्टपणे म्हटलं.
'पेंग्विन' टिप्पणीवर उत्तर
आपल्यावर 'पेंग्विन' अशा शब्दांत टीका केली जात असल्याबाबत नितेश राणे म्हणाले, "माझ्याबाबत पेंग्विन म्हटलं तरी काही फरक पडत नाही. पण स्वतःच्या मुलाची अवस्था पाहावी. आम्ही जर दिशा आणि दिनो यांच्याविषयी बोलत असू, तर टीका होते. परंतु जर वेळेत मुलाचं नाईट लाइफ नियंत्रित केलं असतं, तर बरेच प्रश्न टळले असते."
ठाकरे गटावर वैचारिक टीका
राणे यांनी उद्धव ठाकरेंवर वैचारिक टीकाही केली. "ज्यावेळी महाविकास आघाडीचं सरकार होतं, त्यावेळी उद्धव ठाकरे स्वतःच्या वडिलांचं नाव मंचावर घ्यायलाही घाबरत होते. राहुल गांधी स्टेजवर असताना 'हिंदू हृदयसम्राट' बोलायची हिंमत दाखवली नाही," अशी टीका करत त्यांनी ठाकरे गटावर बाळासाहेब ठाकरे यांची विचारधारा विसरण्याचा आरोप केला.
याचबरोबर, "शिवसेनेचा वर्धापन दिन जसा साजरा केला जातोय, त्यावरून वाटतं की तो इस्लामाबादमध्ये साजरा झाला पाहिजे. उद्धव ठाकरे म्हणजे 'राजकीय लव्ह जिहाद'चं सर्वोत्तम उदाहरण आहेत," असंही ते म्हणाले.
मनसे-ठाकरे युतीवर टोकाची भूमिका
मनसे आणि ठाकरे गट यांच्यात होणाऱ्या संभाव्य युतीच्या चर्चांवर बोलताना राणे म्हणाले, "हे कोणतं राजकीय हित साधण्याचं प्रकरण नाही, तर कौटुंबिक भांडण आहे. लग्नात लोक एकत्र येतात, पण कोणी विचारून येतं का? एकीकडे शून्य आमदार, दुसरीकडे वीस आमदार त्यांचं एकत्र येणं म्हणजे केवळ नाट्य."
उद्धव ठाकरे यांच्या भाषणानंतर नितेश राणे यांनी दिलेलं परखड उत्तर म्हणजे राजकीय वादाच्या पुढच्या टप्प्याची नांदी म्हणता येईल. एका बाजूने बाळासाहेब ठाकरे यांचा वारसा जपण्याचा दावा, आणि दुसऱ्या बाजूने त्याच विचारधारेचा 'विकृतीकरण' केल्याचा आरोप - या सर्व पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापलं आहे. आगामी दिवसांत ठाकरे गट आणि भाजप यांच्यातील शाब्दिक चकमक अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे.












Click it and Unblock the Notifications