ज्या भूमीला छत्रपतींचा स्पर्श तेथे धर्मांधता चालणार नाही, विशाळगडावरील कारवाई बेकायदेशीर - आव्हाड
विशाळगडावरील अतिक्रमाचा वादात आता राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी उडी घेतली आहे. या प्रकरणावरुन आव्हाड यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला आहे. ज्या भूमीला छत्रपतींचा स्पर्श तेथे धर्मांधता चालणार नाही असे म्हणत आव्हाड यांनी राज्य सरकारवर गंभीर आरोप केले आहेत.
विशाळगडावरील अतिक्रमण हटाव मोहिमेवरून सुरु झालेला वाद अद्याप मिटलेला नाही. त्यावरून आरोप प्रत्यारोप अद्याप सुरुच आहेत.

गडकिल्ल्यांवरील सर्व अतिक्रमणे हटवणार अशी ठाम भूमिका गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली आहे. ईडी आघाडीचे नेते अतिक्रमण करणाऱ्यांच्या बाजूचे आहेत की अतिक्रमण हटवण्याच्या असा खडा सवाल जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे. दुसरीकडे अतिक्रमण हटावची मागणी करणारे "अतिरेकी" होते असा आरोप केल्यामुळे कोल्हापूरचे खासदार शाहू महाराज यांच्यावर आरोपांच्या फैरी सुरु आहेत.
कोल्हापूरचे माजी पालकमंत्री सतेज पाटील, युवराज संभाजीराजे, खासदार धनंजय महाडिक यांनी आपापली भूमिका मांडली आहे. आता या वादात राष्ट्रवादी शरद पवार गटाचे माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी उडी घेतली आहे.
कारवाई बेकायदेशीरच : आव्हाड
विशाळगडावर सुरू असलेली घरे आणि दुकाने निष्कासित करण्याची कारवाई पूर्णतः बेकायदेशीर आहे. राज्यातील वातावरण खराब व्हावे, या उद्देशानेच जिल्हाधिकाऱ्यांपासून पोलीस अधीक्षकांपर्यंतची सर्व प्रशासकीय यंत्रणा सरकारच्या आदेशानुसार हे काम करीत आहे. मा. उच्च न्यायालयाने फेब्रुवारी २०२३ मध्ये दिलेल्या आदेशामध्ये, अंतिम निकाल लागेपर्यंत कोणतीही कारवाई करू नका, असे स्पष्ट म्हटलेले आहे, असा दावा आव्हाड यांनी केला आहे.
सरकारला वातावरण खराब करायचे आहे
उच्च न्यायालयाचा आदेश असताना ही कारवाई करणे म्हणजे, 'आम्ही कायद्याला जुमानतच नाही. आम्हाला पाहिजे ते आम्ही करू', असाच अर्थ प्रतीत होत आहे. अन् एवढी उद्धट आणि उद्दाम कारवाई प्रशासकीय अधिकारी हे सरकारी आदेशाशिवाय करूच शकत नाहीत. याचाच अर्थ असे आहे की, या सरकारला वातावरण खराब करायचे आहे. त्याची सुरूवात विशाळगडावरून करीत आहेत; ज्या भूमीला छत्रपती शिवाजी महाराजांचा स्पर्श झाला आहे. शिवरायांच्या महाराष्ट्रात द्वेष, कटुता, धर्मांधता तेव्हाही चालली नव्हती अन् आताही चालणार नाही, अशा शब्दात आव्हाड यांनी सरकारला ठणकावले आहे.
सरकारच्या योजनांवर आव्हाडांची टीका
राज्य सरकारच्या विविध योजनांवर जितेंद्र आव्हाड यांनी टीका केली आहे. निवडणूकीच्या तोंडावर सरकारकडून जोरदार गाजर वाटप सुरु असल्याचा त्यांचा आरोप आहे. या योजनांच्या मागे काही लॉजिक तरी आहे का? लाडकी बहीण काय? लाडका भाऊ काय ? बारावी पास काय? पदवीधर काय? कुठून देणार आहेत इतका पैसा? लाभार्थीचा आकडा गुणिले ही रक्कम..... जरा गणित करून बघा! अर्ध्या देशाचं बजेट इकडे वळवावे लागेल, अशी टीका आव्हाड यांनी केली आहे.
आधी समजून घ्या, मग बोला : आमदार प्रसाद लाड
हाथ बदलेगा हालात म्हणत कॉंग्रेस महिलांच्या खात्यात वर्षाला एक लाख देणार म्हणत होती. आम आदमी पक्षाने तर फुकट वाटपाचे धोरणच लागू केलेले आहे! त्यावेळी कुठे गेला होता तुमचा हा बुद्धीप्रामाण्यवाद? नरेटीव्ह सेटिंगच तुमचे लॉजिक आणि महायुती सरकारच्या या जनतेच्या हिताच्या योजना यात जमीन आसमानचा फरक आहे! आधी समजून घ्या! मग बोला, असा टोला भाजपचे आमदार प्रसाद लाड यांनी जितेंद्र आव्हाड यांना लगावला आहे.












Click it and Unblock the Notifications