राष्ट्रवादीत मोठी घडामोड! जयंत पाटील देणार प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा? पुण्यात कार्यक्रमात संकेत

पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) चा वर्धापन दिन साजरा करण्यात आला आणि याच कार्यक्रमात एक महत्त्वाचा राजकीय संदेश दिला गेला.

jayant patil resignation

पक्षाचे सध्याचे प्रदेशाध्यक्ष आणि शरद पवारांचे जवळचे सहकारी जयंत पाटील यांनी पक्षाच्या नवीन नेतृत्वाला संधी देण्याची इच्छा जाहीर केली. त्यांच्या या घोषणेमुळे सभागृहात क्षणभर गोंधळाचे वातावरण निर्माण झाले आणि चर्चेला उधाण आले.

"नवीन चेहऱ्यांना संधी द्या" - जयंत पाटील यांचा स्पष्ट इशारा

बालगंधर्व रंगमंदिरात आयोजित वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात कार्यकर्त्यांना संबोधित करताना जयंत पाटील म्हणाले, "माझ्या सात वर्षांच्या कार्यकाळात पक्षाने मला खूप मोठ्या संधी दिल्या. आता नवीन लोकांना पुढे येण्याची गरज आहे. साहेब (शरद पवार) यांच्यासमोर मी विनंती करतो की, नवीन नेतृत्वाला संधी दिली जावी."

त्यांच्या या विधानानंतर उपस्थित कार्यकर्त्यांनी 'नको नको' अशा घोषणा देत त्यांचा विरोध दर्शवला. परंतु जयंत पाटील आपल्या भूमिकेवर ठाम राहिले. "पक्षाने अधिक बळकट व्हायचं असेल तर नवीन चेहऱ्यांना घेऊनच हे शक्य होईल," असेही ते म्हणाले.

राजकीय संदेश आणि कार्यकर्त्यांना आवाहन

जयंत पाटील यांनी आपल्या भाषणात पक्षाच्या आगामी वाटचालीसाठी कार्यकर्त्यांना सज्ज राहण्याचे आवाहन केले. "आपण जर पुन्हा ताकदीने मैदानात उतरलो, तर राजकीय लढाई जिंकणं शक्य आहे," असे ते म्हणाले. ही लढाई त्यांनी 'तुकाराम विरुद्ध नथुराम' अशी असल्याचे विधान करत कार्यकर्त्यांना नव्या प्रेरणेसह कामाला लागण्याचा संदेश दिला.

सरकारवर जोरदार हल्ला

पाटील यांनी यावेळी राज्य सरकारवरही टीकेची झोड उठवली. "गरीबांना आधार देणारी शिवभोजन थाळी सरकारने बंद केली. एखाद्या मुलीला जीव गमवावा लागतो, तेव्हा सरकार हलतं," असे उदाहरण देत त्यांनी सरकारच्या संवेदनशीलतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं.

शरद पवारांवरील टीकेला प्रत्युत्तर

कार्यक्रमात शरद पवार यांच्यावर होणाऱ्या टीकेलाही जयंत पाटील यांनी प्रत्युत्तर दिलं. "ओबीसी आरक्षणाचा मुद्दा असेल, मंडल आयोग लागू करण्याची भूमिका असेल, ती शरद पवारांनीच घेतली. त्यांच्या कामगिरीला दुर्लक्षित करता येणार नाही," असे त्यांनी स्पष्ट केले. "आजही पवार साहेबांना लक्ष्य केलं जातं, कारण अजूनही अनेकांना त्यांच्या प्रभावाची भीती वाटते," असा टोला त्यांनी लगावला.

निवडणूक निकालावर भाष्य

लोकसभा निवडणुकीतील यशानंतर विधानसभेतील अपेक्षित कामगिरी न झाल्याबद्दल पाटील म्हणाले, "जनतेला वाटत होतं की महाविकास आघाडीचा विजय निश्चित आहे. मात्र, निकालांनी वेगळी दिशा दाखवली." निवडणूक आयोगाकडून उत्तर न मिळणाऱ्या प्रश्नांकडे त्यांनी लक्ष वेधले.

कार्यकर्त्यांप्रती कृतज्ञता व्यक्त

कार्यकर्त्यांनी प्रतिकूल परिस्थितीतही पवार साहेबांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत साथ दिली, हे विशेष असल्याचं सांगत जयंत पाटील म्हणाले, "2014 नंतर अनेक जण दुसऱ्या गाडीत चढले, पण तुम्ही आमच्यासोबत राहिलात. तुमचं हे निष्ठावान योगदान मला कायम स्मरणात राहील."

या भाषणाने केवळ पक्षांतर्गत बदलांची शक्यता नव्हे, तर आगामी राजकीय रणनीतीचाही संकेत मिळतो. जयंत पाटील यांचा हा निर्णय पक्षातील नेतृत्व बदलाच्या चर्चेला गती देणार, हे निश्चित.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+