पूर आलेल्या 5 नाल्यांतून प्रवास! 7 तास चकमक 2000 राऊंड फायर 12 नक्षल्यांना कसा केला खात्मा? वाचा
मुंबई - पावसाळ्याचे दिवस पुराची स्थिती अन् घनदाट जंगल. यातच नक्षल्यांशी चकमक त्यात जीवाची पर्वा न करता पोलिसांनी 12 नक्षलवाद्यांना कंठस्नान घातले. ही मोठी कामगिरी पोलिसांनी केली. अंगावर काटा आणणारा हा थरारक क्षण होता. बारा नक्षल्यांचा खात्मा कसा झाला हे जाणून घेऊया.
शहीद सप्ताह करतात साजरा?
28 जुलै ते 3 ऑगस्ट हा कालावधीत नक्षलवादी शहीद सप्ताह साजरा करतात. त्याअनुषंगाने या काळात ते हिंसक कारवाया करण्याची दाट शक्यता असते. त्याचीच कुणकुण पोलिसांना लागली आणि हिंसक कारवायासाठी नक्षली एकत्र आल्याची ठोस माहिती पोलिसांना प्राप्त झाली होती. त्यामुळे सकाळीच पोलिसांनी रणनीती आखली आणि 17 जुलैला ही चकमक झाली.

नाल्यातून प्रवास, 200 पोलिस
एटापल्ली तालुक्यातील जारावंडी क्षेत्रांतर्गत छत्तीसगड सीमेलगतच्या वांडोली गावानजीकच्या जंगल परिसरात बुधवारी 17 जुलैला नक्षलवादी आणि पोलिसांत चकमक झाली. त्यापूर्वी पोलिसांचा प्रवास फारच कठीण होता. घनदाट जंगल आणि पूर आलेल्या 5 नाल्यांमधून प्रवास करीत गडचिरोली पोलिस दलाच्या सी-60 पथकाचे दोनशे जवान काल दुपारी वांडोली परिसरात पोहचले. त्यानंतर त्यांनी ही कारवाई केली.

2 दलमचा सफाया
नक्षल्यांशी झालेल्या चकमकीत पोलिसांनी एकूण 30 लाख रुपयांचे बक्षीस असलेल्या 12 नक्षल्यांना कंठस्नान घालण्यात आले. यामुळे उत्तर गडचिरोलीत सक्रिय टिपागड एलओएस आणि चातगाव-कसनसूर या नक्षल्यांच्या दोन दलमचा संपूर्ण सफाया झाल्याचे पोलिस अधीक्षक नीलोत्पल यांनी आज पत्रकार परिषदेत सांगितले.
2 हजार गोळ्या झाडल्या
35 वर्षानंतर उत्तर गडचिरोली नक्षलवादमुक्त झाला. आता तिथे एकही सशस्त्र नक्षलवादी उरला नाही. 7 तास चकमक झाली. 2 हजार राऊंड फायर करण्यात आल्या. यात एकरा हत्यारे जप्त करण्यात आली आहेत.

ठार झालेल्या 12 नक्षल्यात 7 पुरुष, 5 महिला
या चकमकीत चातगाव-कसनसूर संयुक्त दलमचा प्रभारी आणि विभागीय समिती सदस्य योगेश तुलावी, कोरची-टिपागड दलमचा प्रभारी तथा विभागीय समिती सदस्य विशाल आत्राम, टिपागड दलमचा प्रभारी तथा विभागीय समिती सदस्य प्रमोद कचलामी या प्रमुख नक्षल्यांचा समावेश आहे. 12 पैकी 7 पुरुष नक्षल्यांचा यात समावेश आहे. सर्वांची ओळख पटली आहे.
हे जवान चकमकीत जखमी
या चकमकीत पोलिस उपनिरीक्षक सतीश पाटील, हवालदार शंकर पोटावी आणि विवेक शिंगोळे हे जखमी झाले. त्यांच्यावर नागपुरात उपचार सुरु आहेत, तिघांचीही प्रकृती धोक्याबाहेर असल्याचे पोलिस अधीक्षक निलोत्पल यांनी सांगितले.












Click it and Unblock the Notifications