सासरच्या दारातच पेटवली चिता! हुंड्यासाठी छळाला कंटाळून 22 वर्षीय विवाहितेची आत्महत्या; नाशिक हादरले!
Nashik Tragedy : हुंड्यासाठी विवाहितेचा छळ, सासरकडून सातत्याने पैशांची मागणी आणि माहेरहून वस्तू आणण्याचा हट्ट करत नववधूंना त्रास देण्याच्या संतापजनक घटना महाराष्ट्रात थांबायला तयार नाहीत. काही महिन्यांपूर्वी पुण्यातील वैष्णवी हगवणे प्रकरण राज्यभर गाजले असताना, आता नाशिक जिल्ह्यातील चांदवड तालुक्यात अशीच एक हृदय पिळवटून टाकणारी आणि धक्कादायक घटना समोर आली आहे.

सासरच्या जाचाला कंटाळून २२ वर्षीय विवाहितेची आत्महत्या
नाशिकच्या चांदवड तालुक्यातील पिंपळगाव धाबली येथे सासरच्या सततच्या छळाला कंटाळून एका २२ वर्षीय विवाहितेने आपले जीवन संपवले. मृत विवाहितेचे नाव मोहिनी चंद्रकांत अहिरे असे आहे. मोहिनी चंद्रकांत अहिरे यांना सासरकडून सतत मोबाईल, गाडी आणि घरून पैसे आण अशा वारंवार मागण्या केल्या जात होत्या. या मागण्यांवरून सासरी नेहमी वाद घातला जात असे आणि शिवीगाळ केली जात असे. सासरच्या सातत्याने होणाऱ्या या छळामुळे मोहिनी यांनी अखेर टोकाचे पाऊल उचलले आणि आपले जीवन संपवले.
संतप्त कुटुंबीयांचा 'दग्ध' आक्रोश: सासरच्या दारातच अंत्यसंस्कार
मोहिनीच्या आत्महत्येची माहिती माहेरच्या कुटुंबीयांना मिळताच त्यांनी पिंपळगाव धाबली येथील सासरी धाव घेतली आणि जाब विचारला. दोन्ही कुटुंबांमध्ये मोठा वाद झाल्यानंतर, माहेरच्या कुटुंबीयांनी अत्यंत संतप्त आणि भावनिक अवस्थेत एक धक्कादायक पाऊल उचलले. मुलीच्या माहेरच्या कुटुंबीयांनी तिच्या सासरच्या घरासमोरच मोहिनीच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले आणि आपला तीव्र संताप व्यक्त केला. आपल्या लाडक्या लेकीच्या मृतदेहावर सासरच्या दारातच अंत्यसंस्कार करून पीडित कुटुंबीयांनी हुंडाबळीविरोधात आपला तीव्र आक्रोश व्यक्त केला.
६ जणांविरोधात गुन्हा, सर्व संशयित ताब्यात
या गंभीर प्रकरणी चांदवड पोलिसांनी तात्काळ कारवाई केली आहे. मृत विवाहितेच्या कुटुंबीयांनी दिलेल्या तक्रारीनुसार, पतीसह सासरच्या ६ जणांवर छळ आणि आत्महत्येला प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी याप्रकरणी तातडीने तपास सुरू केला असून, गुन्ह्यात सामील असलेल्या सर्व संशयितांना ताब्यात घेण्यात आले आहे. या घटनेमुळे चांदवड तालुक्यासह संपूर्ण नाशिक जिल्ह्यात हुंडेशाहीविरोधात तीव्र संताप आणि हळहळ व्यक्त होत आहे. पोलीस याप्रकरणी पुढील अधिक तपास करत आहेत.












Click it and Unblock the Notifications