सगळेचं सोडून चाललेत, मग नाशिकमध्ये ठाकरेंसोबत उरलयं तरी कोण? महिनाभरात नेमकं काय घडलं...
लोकसभा निवडणुकीतील यशानंतर आनंद साजरा करत असताना, ठाकरे गटासाठी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये मोठा धक्का बसला आहे. एकेकाळी पक्षाच्या मजबूत उपस्थितीचा मानला जाणारा नाशिक जिल्हा आता जवळपास ओस पडल्यासारखा वाटतो आहे. पक्षफुटीनंतर नाशिक महानगरपालिकेतील 35 पैकी तब्बल 31 नगरसेवकांनी ठाकरे गटाची साथ सोडली आहे.

गेल्या काही दिवसांतील राजकीय उलथापालथ पाहता, उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील गटाला नाशिकमध्ये मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. अवघ्या चार नगरसेवक आता या गटात उरले असून, बाकीचे 26 शिंदे गटात सामील झाले आहेत तर 5 नगरसेवक भाजपमध्ये गेले आहेत.
नेतृत्वातील उलथापालथ आणि गळतीचा कल
महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपमध्ये नेत्यांचा ओघ सुरू असताना, ठाकरे गटात मात्र नेत्यांची हकालपट्टी सुरू आहे. उपनेते सुधाकर बडगुजर, महानगरप्रमुख विलास शिंदे, उपनेते सुनील बागूल आणि नवनियुक्त मामा राजवाडे या प्रमुख चेहऱ्यांची हकालपट्टी झाली आहे.
विशेष म्हणजे, सुनील बागूल यांना पक्षात ठेवण्यासाठी त्यांना महानगरप्रमुखपद देण्यात आले होते, मात्र भाजप प्रवेशाची चर्चा रंगली आणि अखेर त्यांनाही बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला. त्यांनी भाजपशी जवळीक साधण्यामागचं कारण मुलाच्या भविष्यासाठी असल्याचं स्पष्ट केलं होतं.
निर्धार शिबिरही अयशस्वी?
15 एप्रिल रोजी झालेल्या "निर्धार शिबिरा"त उद्धव आणि आदित्य ठाकरे यांनी थेट हजेरी लावून शिवसैनिकांमध्ये जोश निर्माण करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र त्याचा फारसा परिणाम झाला नाही. शिबिरानंतर गळती थांबण्याऐवजी वाढलीच. वरिष्ठ नेत्यांकडून पक्षाच्या धोक्यांत असलेल्या संघटनात्मक स्थितीवर विचारमंथन न होता केवळ कारवायांवर भर दिला गेला, ही स्थानिक शिवसैनिकांची नाराजी स्पष्ट दिसून आली.
महिनाभरात गढी कोसळली
नाशिकमधील राजकीय घडामोडी पाहता, पक्षाच्या गढीचा कमकुवतपणा ठळकपणे समोर आला आहे. ज्यांच्या खांद्यावर शहराचं नेतृत्व सोपवण्यात आलं होतं, त्या नेत्यांनीच एकामागून एक भाजपचा मार्ग स्वीकारला. बडगुजर यांच्यापासून ते मामा राजवाडेपर्यंत अनेकांनी पक्षात फार काळ थांबणं टाळलं.
2017 आणि आताची स्थिती मोठा फरक
2017 मध्ये ठाकरेंकडे जवळपास 35 नगरसेवक होते. यापैकी 4 आता ठाकरेंसोबत आहेत. तर 26 नगरसेवक हे शिंदेगटात दाखल झाले आहेत. 5 नगरसेवकांनी भाजपची वाट चोखाळली आहे. ठाकरेंसाठी हा अतिशय मोठा धक्का मानला जातोय.
नाशिकमधील शिवसेना (ठाकरे गट) सध्या अस्तित्व टिकवण्यासाठी संघर्ष करत आहे. सातत्याने होत असलेल्या हकालपट्ट्या, नेतृत्वातील अस्थिरता आणि भाजपच्या सक्रियतेमुळे पक्षात मोठी गळती झाली आहे. येणाऱ्या महापालिका निवडणुकांपूर्वी हे चित्र बदलता येईल का, हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.












Click it and Unblock the Notifications