एका मिनिटांत होत्याचे नव्हते झाले, सहा मुलं ठार, नाशिकच्या द्वारका पुलावर भीषण अपघात
Nashik Accident News : नाशिकच्या द्वारका पुलावर रविवारी रात्री भीषण अपघात झाला. यामध्ये सहा जण ठार झाले आहेत, तर अन्य काही जण गंभीर जखमी झाले आहेत. या अपघातातील मृत आणि जखमींमध्ये प्रामुख्याने किशोरवयीन मुलांचा समावेश आहे. द्वारका पुलावर रविवारी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास हा भीषण अपघात घडला.
या अपघातामध्ये एका पिकअप टेम्पो (छोटा हत्ती) लोखंडी सळ्यांनी भरलेल्या ट्रकला धडकला. या ट्रकमधील लोखंडी सळ्या अंगातून आरपार गेल्याने सहा मुलांचा जागीच मृत्यू झाला. या अपघातामुळे द्वारका उड्डाणपुलावरील वाहतूक ठप्प झाली होती. या भीषण अपघाताने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

प्राप्त माहितीनुसार, लोखंडी सळ्यांनी भरलेला ट्रक धुळ्याहून मुंबईच्या दिशेने जात होता. त्यावेळी द्वारका उड्डाणपुलावर एक पिकअप टेम्पो मागून ट्रकला जोरात धडकला. ही धडक इतकी जोरदार होती की, दोन्ही वाहनांचे प्रचंड नुकसान झाले आहे. पिकअप ट्रकच्या मागच्या बाजूला काही मुलं होती. अपघातानंतर लोखंडी ट्रकमधील सळया यातील काही मुलांच्या अंगात शिरल्या.
सहा जणांचा मृत्यू
घडलेल्या अपघातात मृतांमध्ये अतुल मंडलिक, संतोष मंडलिक, दर्शन घरते, यश घरते, चेतन पवार यांचा समावेश आहे. तर राहुल राठोडे (वय 20), लोकेश निकम (वय 18), अरमान खान (वय 15), ओम काळे, अक्षय गुंजाळ, राहुल साबळे हे सर्वजण गंभीररित्या जखमी असल्याची माहिती आहे.
भीषण घटना, हृदयद्रावक प्रसंग
अंगात सळया शिरल्यानंतर मुलांच्या शरीरातून मोठा रक्तस्त्राव झाला. त्यामुळे रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच चार जणांचा मृत्यू झाला. तर सहा जण गंभीर जखमी झाले आहेत. या दुर्घटनेबद्दल माहिती मिळाल्यानंतर स्थानिक पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. याठिकाणी पोलिसांकडून बराचवेळ वाहतूक पूर्ववत करण्याचे काम सुरु होते. परिमंडळ एकचे उपायुक्त किरणकुमार चव्हाण, भद्रकाली पोलीस ठाण्यातील वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक दिनकर कदम व अन्य कर्मचाऱ्यांनी तातडीने मदतकार्य सुरु करुन जखमींना रुग्णालयात पाठवले.












Click it and Unblock the Notifications