धमकी प्रकरणात चर्चेत आलेले सुहास कांदेच ठरले नांदगावचे बाँस; दुसऱ्यांदा मारली बाजी
Maharashtra Assembly Election Result 2024- मतदानाच्या दिवशी धमकी प्रकरणामुळे चर्चेत आलेल्या नाशिकमधील नांदगाव विधानसभा मतदारसंघातून शिवसेना शिंदे गटाचे सुहास कांदे विजयी झाले. कांदे यांना २४ व्या फेरी अखेर १ लाख ३५ हजार ७७८ मते मिळाली. तर अपक्ष उमेदवार समीर भुजबळ यांना ४७ हजार १३० मते मिळाली आहेत. त्यामुळे सुहास कांदे यांचा ८८ हजार ६४८ मतांनी विजय झाला.

कशी आहे सुहास कांदे यांची कारकिर्द?
सुहास कांदे मूळचे निफाड तालुक्यातले आहेत. मनसे स्थापन झाल्यानंतर २००६ साली त्यांनी मनसेतूनच राजकारणाची सुरुवात केली. त्यानंतर दोनच वर्षांनी म्हणजे २००८ ला त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. स्वतः वंजारी समाजातील असल्याने वंजारी मतदार जास्त असलेल्या नांदगाव मतदारसंघात त्यांनी एंट्री केली. २००९ च्या विधानसभा निवडणुकीत पंकज भुजबळ यांना विजयी करण्यासाठी त्यांनी मदत केली होती. मात्र त्यानंतर छगन भुजबळांसोबत वाद झाल्यानंतर या दोघांत जास्त दुश्मनी झाली. या पाच वर्षांत आ. कांदे यांच्यावर अनेक गुन्हे दाखल झाले. २०१४ च्या निवडणुकीपूर्वी त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला आणि पंकज भुजबळांविरोधात निवडणूक लढवली. त्यात त्यांचा पराभव झाला. या पाच वर्षांत त्यांचं मातोश्रीवरही चांगलं वजन वाढलं. त्यानंतर २०१९ ला त्यांनी पुन्हा विधानसभा लढवली आणि पंकज भुजबळांचा पराभव केला. आता दुसऱ्यांदा त्यांनी समीर भुजबळांचा पराभव करत आपणच बाँस असल्याचे दाखवून दिले.
भुजबळ, आदित्य ठाकरेंनाही नडले
भुजबळांशी हाडवैर असलेले आ. कांदे शिवसेना फुटल्यावर शिंदे गटात सहभागी झाले. त्यानंतर त्यांचं ठाकरे गटासोबतही चांगलंच वाजलं. सुहास कांदे आदित्य ठाकरेंनाही नडलेत. शिंदे गटात गेल्यानंतर त्यांनी आदित्य ठाकरेंना माझं काय चुकलं म्हणत खडे सवाल केले होते. एकेकाळी संजय राऊतांच्याही जवळ असणारे सुहास कांदे कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसताना राजकारणात आले, लोकांमध्ये मिसळले आणि आमदार झाले. शिंदे गटात जाऊन मातोश्रीला सवाल करणाऱ्या सुहास कांदेंना तोडफोड करणारा नेता म्हणूनही ओळखले जाते.
दाखल आहेत अनेक गुन्हे
२०१९ च्या शपथपत्रात आ. कांदे यांच्यावर सात गुन्हे दाखल होते. २०१४ ला त्यांच्यावर तडीपारीची कारवाईही झाली होती. खंडणी, फसवणूक, आत्महत्येचा प्रयत्न असे अनेक गुन्हे त्यांच्यावर दाखल आहेत. सुहास कांदेंविरोधातल्या अनेक प्रलंबित केसेस आहेत. सुहास कांदेंचं राजकारण हे सत्तेत असलेल्या भुजबळांसोबतच्या संघर्षामुळे चांगलंच गाजलं. सुहास कांदेंवर दाखल असलेल्या गुन्ह्यांमुळे त्यांच्यावर तडीपारीसारखी कारवाई सुद्धा झाली. सुहास कांदे शिवसेनेचे आमदार असले तरी सध्या ते वेगळ्याच कारणांमुळे चर्चेत आहेत. मतदानाच्या दिवशी त्यांनी थेट समीर भुजबळांना जिवे मारण्याची धमकी दिल्याचे बोलले गेले होते. मात्र आता निकालानंतर नांदगावच्या जनतेने त्यांनाच कौल दिल्याचे स्पष्ट दिसले आहे.












Click it and Unblock the Notifications