बटेंगे तो कटेंगे, एक है तो सेफ है, या घोषणांनी दिशाभूल करु नका,10 वर्षात काय केलं सांगा?- नाना पटोले
Nana Patoles harsh criticism of BJP slogans Batenge to Katenge : विधानसभेच्या निवडणुकीत भाजपाला पराभव दिसू लागल्याने ते हिंदू-मुस्लीम करत आहे. भाजपाचे नेते भाषणात महागाई, बेरोजगारी, शेतकरी यांच्याबद्दल बोलत नाहीत. 'बटेंगे तो कटेंगे', 'एक हैं तो सेफ हैं', च्या घोषणा देऊन जनतेची दिशाभूल करत आहेत, त्याला बळी पडू नका. जातीधर्मात फूट पाडणाऱ्या भाजपा युतीला सत्तेतून तडीपार करा, असे आवाहन करत मविआ जिंकली तर दिल्लीतील नरेंद्र मोदींची सत्ताही जाईल, असा ठाम विश्वास काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी व्यक्त केला आहे.
यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड महागाव विधानसभा मतदारसंघाचे महविकासा आघाडीचे उमेदवार साहेबराव दत्तराव कांबळे यांच्या प्रचारासाठी घेतलेल्या सभेत नाना पटोले बोलत होते.

भाजपला नाना पटोलेंचा परखड सवाल
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले, नरेंद्र मोदी यांनी 2014 च्या लोकसभा निवडणूक प्रचारात यवतमाळमध्ये 'चाय पे चर्चा' कार्यक्रमात शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करू, शेतमालाला हमीभाव देऊ तसेच सत्तेत आल्यानंतर पहिली सही शेतकरी कर्जमाफीवर करेन असे आश्वासन दिले होते पण सत्तेत येतात नरेंद्र मोदींनी ते सर्व चुनावी जुमले होते असे सांगत शेतकऱ्यांचा विश्वासघात केला.
बळीराजाला खोटी आश्वासने देऊन फसवू नका
नाना पटोले म्हणाले, आता देवेंद्र फडणवीस मोदींसारखेच शेतकऱ्यांना आश्वासन देत, सत्तेत आलो तर शेतमालाला हमीभाव देण्याची भाषा करत आहेत. 11 वर्षांपासून केंद्रात नरेंद्र मोदींचे सरकार आहे, मागील 7.5 वर्ष देवेंद्र फडणवीस सत्तेत आहेत, याकाळात त्यांनी केले, हे आधी सांगावे, बळीराजाला खोटी आश्वासने देऊन त्यांची फसवणूक करू नका. आता शेतकरी भाजपाच्या या थापेबाजाली बळी पडणार नाही, असे पटोले म्हणाले.
..यांना आता घरी बसवण्याची वेळ आली
नाना पटोले म्हणाले, विधानसभेची ही निवडणूक महत्वाची आहे, महाराष्ट्राला भाजपायुती सरकारने संकटात लोटले असून दिल्लीत बसलेल्या मोदी, शहा यांना महाराष्ट्र लुटून देण्याचे पाप महाराष्ट्रातील सत्ताधारी नेत्यांनी केले आहे, महाराष्ट्र गुजरातला गहाण ठेवला आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यातही भाजप युती सरकारने भ्रष्टाचार करून शिवाजी महाराज व कोट्यवधी शिवप्रेमींचा अपमान केला आहे. भाजपाच्या नेत्यांने यवतमाळ जिल्ह्यातील वणीमध्ये कुणबी समाजाचा अपमान केला. अशा मनुवादी प्रवृत्तींना आता घरी बसवण्याची वेळ आली आहे असेही ते म्हणाले.












Click it and Unblock the Notifications