राज्याला गुजरातचा गुलाम होऊ देणार नाही महाभ्रष्ट महायुती सरकार सत्तेतून उखडून फेकू! वाचा कोण म्हणाले
मुंबई - राज्याला गुजरातचा गुलाम होऊ देणार नाही महाभ्रष्ट महायुती सरकार सत्तेतून उखडून फेकू असा निर्धार आम्ही आमच्या आजच्या बैठकीत केला. आता मविआ विधानसभा एकत्र लढवणार असल्याचे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटले आहे.
भाजपचा सुपडा साफ
विधानसभा निवडणुकीला ताकदीने सामोरे जाणार असून आजच्या बैठकीत काँग्रेस संघटन मजबूत करण्यावर चर्चा करण्यात आली. लोकसभा निवडणुका व त्यानंतर देशभरात झालेल्या पोटनिवडणुकीतही भाजपाचा सुपडा साफ झालेला आहे. जनतेला महाराष्ट्रातही परिवर्तन हवे आहे. महाविकास आघाडी विधानसभेच्या निवडणुका एकत्र लढणार असून तीन पक्ष एकत्रित बसून जागावाटपाची चर्चा करणार आहेत असेही नाना पटोले म्हणाले.

सत्तेतून उखडून फेकू
आम्ही मिळून या विधानसभा निवडणुकीत राज्यातील महाभ्रष्ट महायुती सरकार सत्तेतून उखडून फेकू, असा निर्धार आजच्या बैठकीत आम्ही केला असे अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे संघटन सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल म्हणाले.
अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे संघटन सरचिटणीस खासदार के. सी. वेणुगोपाल व महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला यांच्या प्रमुख उपस्थितीत व काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या अध्यक्षतेखाली गरवारे क्लब येथे काँग्रेस पक्षाच्या प्रमुख नेत्यांची बैठक आज पार पडली.
या बैठकीला विधिमंडळ काँग्रेस पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे, पृथ्वीराज चव्हाण आदी उपस्थित होते.
सरकारला सत्तेतून खाली खेचू
या बैठकीनंतर प्रसार माध्यमांशी बोलताना वेणुगोपाल म्हणाले की, भारतीय जनता पक्षाने लोकसभा व विधानसभा पोट निवडणुकीतही सरकारी यंत्रणांचा मोठ्या प्रमाणात गैरवापर केला. पण तरीही त्यांचा पराभव झाला. भाजपाचा अयोध्येनंतर बद्रिनाथमध्येही जनतेने पराभव केला आहे. महाराष्ट्रातील स्वाभिमानी जनताही राज्यातील भ्रष्ट आणि असंवैधानिक सरकारला सत्तेवरून खाली खेचून परिवर्तन करणार आहे असे चित्र राज्यात आहे.
'त्या' आमदारांवर कारवाई केली
पत्रकारांच्या एका प्रश्नाला उत्तर देताना खा. के. सी. वेणुगोपाल म्हणाले की, विधान परिषद निवडणुकीत पक्षाच्या ज्या आमदारांनी क्रॉस व्होटिंग केले त्यांच्यावर पक्षाने कारवाई केली असून काही दिवसांत आपल्याला त्याची माहिती मिळेल. पक्षात बेशिस्त खपवून घेतली जाणार असे के. सी. वेणुगोपाल यांनी स्पष्ट केले.
नाना पटोले काय म्हणाले ?
या बैठकीत विधानसभा तयारीसंदर्भात बैठकीत चर्चा करण्यात आली. काँग्रेस पक्ष संविधान लोकशाही व महाराष्ट्राच्या स्वाभिमानाच्या रक्षणाची लढाई करणार आहे. आम्ही महाराष्ट्राला गुजरातचा गुलाम होऊ देणार नाही. महाराष्ट्राची संपत्ती आणि मुंबई गुजरातला विकू देणार नाही.
२० ऑगस्ट रोजी माजी पंतप्रधान भारतरत्न राजीवजी गांधी यांची जयंती मोठ्या प्रमाणात साजरी केली जाणार असून काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खा. मल्लिकार्जून खर्गे, लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुलजी गांधी हे उपस्थित राहणार असून याच दिवशी विधान सभेच्या प्रचाराचा नारळ फोडणार आहे. महाराष्ट्राची वाट लावणा-या महाभ्रष्ट युती सरकारला सत्तेतून बाहेर काढणे हाच काँग्रेसचा संकल्प आहे












Click it and Unblock the Notifications