Nagpur News : नागपुरात अचानक जाळपोळ का झाली, नेमका वाद कसा पेटला, जाणून घ्या- संपूर्ण घटनाक्रम
औरंगजेबाच्या कबरीवरून अवघ्या महाराष्ट्राचे वातावरण तापलेले आहे. अशातच नागपूरात सोमवारी सकाळी सायंकाळी साडे ते आठ वाजेच्या सुमारास महाल परिसरात मोठा राडा झाला.
दोन गट आमनेसामने आले आणि काही कळण्याच्या आतच एकमेकांवर दगडफेक झाली. त्यानंतर संतप्त जमावाने वाहने पेटवून दिली. गाड्या जाळल्या अन् काही वेळातच नागपूर पेटल्याची वार्ता वाऱ्यासारखी पसरली. नेमकं नागपुरात काय घडलं ते जाणून घेऊया..!

नेमके काय घडले?
- मिळालेल्या माहितीनुसार संध्याकाळी सात ते साडेसातच्या दरम्यान मोठ्या संख्येने एक गट शिवाजी चौकाच्या जवळ पोहोचला होता. या गटाने घोषणाबाजीला सुरुवात केली.
- विश्व हिंदू परिषदेने दुपारी केलेल्या आंदोलनासंदर्भात त्यांचा रोष होता. घोषणाबाजी सुरू होताच परिसरातील दुसऱ्या गटानेही घोषणाबाजी सुरू केली. त्यानंतर पोलिसांना पाचारण करण्यात आले.
- पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत घोषणाबाजी करणाऱ्या दोन्ही गटांना वेगवेगळे केले. त्यानंतर पोलिसांनी सर्वांना शिवाजी चौकावरून चिटणीस पार्कच्या दिशेने मागे ढकलले.
- यानंतर दोन्ही गटात तुफान राडा झाला आणि दगडफेक करण्यात आली. या दगडफेकीत अनेक वाहनांचे नुकसान झाले आहे. दगडफेकीसोबत जाळपोळही करण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतल्यानंतर जमावाकडून पोलिसांच्या दिशेनेही दगड भिरकावण्यात आले.
पोलिस जखमी झाल्याने अश्रुराच्या नळकांड्या फोडल्या...!
- यामध्ये दोन पोलिस कर्मचारी आणि काही नागरिक जखमी झाल्याची माहिती आहे. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या. जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांकडून शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. पोलिसांनी दंगा काबू पथकाला पाचारण केले आहे.
पुतळ्याजळ धार्मिक पुस्तक जाळल्याची अफवा पसरली
- अधिकाऱ्यांनी सांगितले की, आंदोलकांनी पुतळ्यासोबत एक धार्मिक पुस्तक जाळल्याची अफवा पसरली. त्यामुळे दोन्ही बाजूंनी दगडफेक झाली. अनेक वाहनांची तोडफोड करण्यात आली. दोन जेसीबी पेटवून देण्यात आले.
- नागपूरचे डीसीपी अर्चित चांडक म्हणाले की, गैरसमजातून ही घटना घडली. परिस्थिती नियंत्रणात आहे. सर्वांना आवाहन केले की, घराबाहेर पडू नका. दगडफेक करू नका. काही पोलीस कर्मचारी जखमी झाले आहेत. माझ्या पायालाही थोडी दुखापत झाली.
नागपुरातील दंगलीनंतर मुंबईत सुरक्षा वाढली
नागपुरातील दंगलीच्या घटनेनंतर मुंबईतील पोलिस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. मालवणी, भिंडीबाजार, कुर्ला, शिवाजी नगर-मानखुर्द, अँटोफिल या मुस्लिमबहुल भागात स्थानिक पोलिसांना सतर्क करण्यात आले. मुंबई पोलिसांनी विविध क्षेत्रातील सर्व धर्मातील प्रमुख लोकांशी संपर्क साधला असून कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका, असे आवाहन केले आहे.












Click it and Unblock the Notifications