मुंब्रा कळव्याचा गड जितेंद्र आव्हाड यांच्याकडेच
Maharashtra Assembly Election Result 2024 : शरद पवार यांचे अत्यंत विश्वासू आणि आक्रमक नेते जितेंद्र आव्हाड आणि अजित पवार यांचे विश्वासू युवा नेते नजीब मुल्ला यांच्यातील थेट लढतीमुळे महाराष्ट्राची उत्सुकता ताणून धरलेला ठाणे जिल्ह्यातील मुंब्रा कळवा मतदारसंघ जितेंद्र आव्हाड यांनी जिंकून आपले वर्चस्व सिद्ध केले. जितेंद्र आव्हाड यांनी जवळपास 1 लाख मताच्या फरकाने नजीब मुल्ला यांचा पराभव केला आहे.
जितेंद्र आव्हाड हे नाव महाराष्ट्राला चांगलेच परिचित आहे. मुंब्रा कळवा विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करणारे जितेंद्र आव्हाड हे शरद पवार यांचे अत्यंत विश्वासू मानले जातात, राष्ट्रवादीतला बडा नेता अशीही त्यांची ओळख आहे. वीस वर्षांपूर्वी गुजरात पोलिसांनी इशरत जहा नावाच्या तरुणीसह तीन तरुणांचा एन्काऊंटर केला होता. गुजरातचे तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हत्येचा कट या चौघांनी रचल्याचे पोलिसांचे म्हणणे होते. संबंधित तरुणी कळवा मुंब्रा परिसराशी संबंधित होती.

जितेंद्र आव्हाड यांनी तिच्या स्मरणार्थ रुग्णवाहिका सुरू केली,आणि त्यानंतर ते वादग्रस्त ठरले होते. राष्ट्रवादी काँग्रेससाठी मुस्लिम मते खेचून घेणारा हुकमी चेहरा अशी जितेंद्र आव्हाड यांची ओळख निर्माण झाली. हिंदुत्व, उजवी विचारधारा यांच्या विरोधात जितेंद्र आव्हाड यांनी आक्रमकपणे भूमिका मांडली. काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसचे सरकार असताना जितेंद्र आव्हाड यांचे प्रस्थ चांगलेच वाढले.
इस्त्राईल आणि पॅलेस्टाईन यांच्या संघर्षामुळे गाझा पट्टी हे नाव जगभरात चर्चेत असते. सेव गाजा असा मजकूर लिहिलेले टी-शर्ट घालून फिरणारे जितेंद्र आव्हाड टीव्हीवर सातत्याने दिसतात. 2019 साली उद्धव ठाकरे यांनी आयत्यावेळी युती तोडून काँग्रेस राष्ट्रवादीशी संधान साधले. त्यावेळी अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांनी 72 तासांचे सरकार स्थापन केले. अजित पवारांच्या सोबत गेलेल्या आमदारांना परत आणण्यात जितेंद्र आव्हाड यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती.
अजित पवार यांच्या विरोधात तेव्हा थेट भूमिका घेणारा नेता म्हणून जितेंद्र आव्हाड ओळखले जातात. राज्यात शिवसेना-भाजपती सरकार पुन्हा सत्तेत आल्यानंतर अजित पवार देखील त्या सरकारमध्ये सहभागी झाले. तेव्हाही अजित पवार यांच्याकडे न जाणारा आणि शरद पवार यांची ठाम पाठराखंड करणारा नेता म्हणून जितेंद्र आव्हाड यांची ओळख आहे. शरद पवार यांनी राजकीय निवृत्तीची घोषणा केली तेव्हा त्यांच्या घोषणेला सर्वाधिक विरोध जितेंद्र आव्हाड यांनीच केला होता. राष्ट्रवादीच्या शरद पवार गटात सुप्रिया सुळे, जयंत पाटील आणि जितेंद्र आव्हाड हे त्रिकूट महत्वाचे मानले जाते.
दुसरीकडे नजीब मुल्ला हे ठाण्यातील राष्ट्रवादीचा मुस्लिम चेहरा होते. अजित पवार यांनी बंड केल्यानंतर नजीब मुल्ला यांनी अजित दादांना साथ दिली आणि अजित दादांनी ही मुंब्रा कळवा विधानसभा मतदारसंघातून त्यांना उमेदवारी दिली., मुंब्रा कळवा हा मतदारसंघ मुस्लिम बहुल मतदारसंघ म्हणून ओळखला जातो. त्यामुळे येथील बहुसंख्य मुस्लिम मतदार जितेंद्र आव्हाड यांच्या पाठीशी उभा राहतो की नजीब मुल्ला यांना मतदान करतो याची उत्सुकता ताणली गेली होती. अखेरीस जितेंद्र आव्हाड यांनीच बाजी मारली.












Click it and Unblock the Notifications