मुंबईकरांसाठी खूशखबर! आता 'या' मार्गावर 18 डब्यांची लोकल धावणार; 15 डब्यांच्या फेऱ्यांतही वाढ होणार
Mumbai local train : "मुंबईकरांनो, आता लोकलच्या गर्दीत चिरडून प्रवास करण्याचे दिवस संपणार आहेत! रेल्वेने प्रवाशांची सोय लक्षात घेऊन आता चक्क १८ डब्यांची लोकल रुळावर उतरवण्याची तयारी सुरू केली आहे. डब्यांची संख्या वाढल्यामुळे एकाच वेळी हजारो अतिरिक्त प्रवाशांना बसून किंवा सुसह्य प्रवास करता येईल. पश्चिम आणि मध्य रेल्वेच्या या 'मेगा' निर्णयामुळे प्रवाशांचा प्रवास आता अधिक सुखकर आणि वेगवान होणार आहे."

खरं तरं लोकल ही मुंबईची जीवनवाहिनी.. लोकल ट्रेनमधील वाढती गर्दी कमी करण्यासाठी रेल्वे प्रशासनाने आता कंबर कसली आहे. वनइंडिया हिंदीच्या वृत्तानुसार, पश्चिम रेल्वेवर (WR) लवकरच १८ डब्यांच्या लोकल ट्रेनची चाचणी सुरू होणार असल्याने प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. मध्य रेल्वेवरही (CR) १५ डब्यांच्या गाड्यांची संख्या वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयामुळे प्रवाशांची वाहतूक क्षमता २५ टक्क्यांनी वाढणार असून प्रवासाचा दर्जा सुधारण्यास मदत होणार आहे.
पश्चिम रेल्वेवर १८ डब्यांचे नियोजन
पश्चिम रेल्वेने आधुनिकतेच्या दिशेने पाऊल टाकत आता १५ डब्यांच्या पुढे जाऊन १८ डब्यांच्या लोकलचे ट्रायल घेण्याचे ठरवले आहे. सध्या या मार्गावर १५ डब्यांच्या लोकल यशस्वीपणे धावत आहेत. १८ डब्यांच्या लोकलसोबतच 'ऑटोमॅटिक डोअर' (स्वयंचलित दरवाजे) असलेल्या ट्रेनचेही परीक्षण केले जाणार आहे.
मध्य रेल्वे: सीएसएमटी ते खोपोली प्रवाशांना दिलासा
मध्य रेल्वेवर प्रवाशांचा भार सर्वाधिक असल्याने प्रशासनाने सीएसएमटी (CSMT) ते खोपोली दरम्यान १५ डब्यांच्या लोकल सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी ठाणे, कल्याण ते कसारा आणि खोपोली दरम्यानच्या स्थानकांवरील प्लॅटफॉर्मची लांबी वाढवण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. ऑगस्ट अखेरपर्यंत तब्बल २४ स्थानकांवरील प्लॅटफॉर्मचे विस्तारीकरण पूर्ण करण्याचे रेल्वेचे उद्दिष्ट आहे.
प्रवाशांच्या संख्येत मोठी वाढ
एप्रिल २०२५ ते जानेवारी २०२६ या १० महिन्यांच्या कालावधीत मध्य रेल्वेवरून तब्बल १२०.१९ कोटी प्रवाशांनी प्रवास केला आहे. दरमहा सरासरी १२ कोटी प्रवासी मुंबई लोकलने प्रवास करत आहेत. प्रवाशांची ही वाढती संख्या लक्षात घेता डब्यांची संख्या वाढवणे हाच एकमेव पर्याय रेल्वेसमोर आहे.
प्रवासी संघटनांची नाराजी
एकीकडे नवीन सुविधांचे स्वागत होत असताना, दुसरीकडे मध्य रेल्वेच्या प्रवासी संघटनांनी रेल्वेच्या 'दुजाभावा'वर नाराजी व्यक्त केली आहे. "प्रत्येक नवीन सुविधा, मग ती १५ डब्यांची लोकल असो वा एसी लोकल, आधी पश्चिम रेल्वेला दिली जाते आणि मध्य रेल्वेला नेहमीच उशिरा मिळते," अशी टीका ठाणे रेल्वे प्रवासी संघटनेचे अध्यक्ष नंदकुमार देशमुख यांनी केली आहे.












Click it and Unblock the Notifications