लाखो मुंबईकरांसाठी खूशखबर! फडणवीस सरकारचा मोठा निर्णय 25 हजारांवर इमारतींना होणार 'हा' फायदा
Mumbai Buildings OC Policy : गेल्या अनेक वर्षांपासून भोगवटा प्रमाणपत्र (Occupation Certificate- OC) न मिळाल्यामुळे कायदेशीर अडचणींमध्ये अडकलेल्या मुंबईतील लाखो रहिवाशांसाठी एक अत्यंत दिलासादायक निर्णय घेण्यात आला आहे. राज्य सरकार लवकरच २५ हजारहून अधिक इमारतींसाठी एक विशेष धोरण तयार करणार असून, त्यामुळे त्यांना कायदेशीररीत्या 'मुंबईकर' म्हणून जगता येणार आहे.

या धोरणामुळे बांधकाम व्यावसायिकांच्या चुका किंवा जुन्या नियमांमुळे अडकलेल्या इमारतींना आता OC मिळू शकेल. या निर्णयाची घोषणा पालकमंत्री ॲड. आशिष शेलार यांनी मुंबईतील एका महत्त्वाच्या बैठकीनंतर केली.
कोणत्या इमारतींना लाभ मिळणार?
- म्हाडा, एसआरए आणि इतर प्राधिकरणांनुसार बांधकाम झालेल्या, परंतु विविध कारणांमुळे OC न मिळालेल्या सुमारे २५ हजारांहून अधिक इमारतींना या धोरणाचा लाभ मिळेल.
- विकासकांच्या चुका किंवा तांत्रिक-प्रशासकीय त्रुटींमुळे अडकलेल्या इमारतींनाही OC मिळू शकेल.
- परवानगीच्या क्षेत्रफळात फरक किंवा 'सेटबॅक' सारख्या अडचणींमुळे रखडलेल्या प्रकरणांनाही मार्ग मिळेल.
धोरणाची अंमलबजावणी कधीपासून?
- हे नवे धोरण २ ऑक्टोबरपासून लागू केले जाईल.
- संपूर्ण प्रक्रिया ऑनलाइन आणि पारदर्शक पद्धतीने राबवली जाईल.
सोसायटींसाठी विशेष सवलत
ज्या सोसायट्या पहिल्या सहा महिन्यांत OC किंवा 'पार्ट-ओसी' (Part-OC) साठी अर्ज करतील, त्यांना कोणताही दंड आकारला जाणार नाही. मात्र, नियमांपेक्षा जास्त एफएसआय (FSI) वापरला असल्यास, त्यासाठी लागणारा प्रीमियम भरावा लागेल.
मुंबईकरांना मोठी संधी - आशिष शेलार
लाखो मुंबईकर अनेक वर्षांपासून स्वतःच्या घरात राहूनही कायदेशीरदृष्ट्या "बिगरवासी" म्हणून राहत होते. यासाठी नागरिकांचा काहीही दोष नसून, त्याकाळच्या नियमांमधील पळवाटा किंवा विकासकांच्या चुका यामुळे हा प्रश्न निर्माण झाला होता. यासाठी नगर विकास विभाग २ ऑक्टोबरपासून एक नवे धोरण लागू करणार आहे. या धोरणाअंतर्गत बांधकामादरम्यान झालेल्या तांत्रिक किंवा प्रशासकीय चुका दूर करून इमारतींना सुटसुटीत पद्धतीने ओसी देण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे परवानगीच्या क्षेत्रफळातील फरक, सेटबॅकशी संबंधित अडचणीसारख्या कारणांमुळे ओसी रोखल्या गेलेल्या इमारतींनाही दिलासा मिळणार आहे.
मुंबईकरांसाठी घेतलेल्या या अतिशय दिलासादायक निर्णयाबद्दल पालकमंत्री ॲड.शेलार यांनी मुख्यमंत्री देवेंद फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांचे अभिनंदन केले आहे. तसेच २ ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या या संधीचा मुंबईकरांनी लाभ घ्यावा, असे आवाहन सांस्कृतिक कार्य, माहिती तंत्रज्ञान तथा मुंबई उपनगर पालकमंत्री ॲड.शेलार यांनी केले आहे.
हेही वाचा : Mumbai local train : मुंबईकरांसाठी खूशखबर, लोकल ट्रेन आणखी फास्ट धावणार! स्पीडबाबत मोठा निर्णय












Click it and Unblock the Notifications