विधानसभेंनंतर लाडक्या बहिणीला काहीही मिळणार नाही- खासदार संजय राऊत
मुंबई : विधानसभा निवडणुकीला दोन महिन्यांचा कालावधी उरला आहे. त्यानंतर लाडक्या बहिणीला काही मिळणार नाही. या लाडक्या बहिणींची काळजी महाविकास आघाडीच्या मुख्यमंत्र्यांनाच घ्यावी लागणार आहे. एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांना लाडक्या बहिणींचा जो उमाळा आला आहे, तो केवळ दोन महिन्यांसाठी आहे, अशी जोरदार टीका ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केली आहे
दोन महिने त्यांच्या खात्यात पैसे टाकतील. महाराष्ट्रावर कर्जाचा डोंगर उभा करतील आणि मग हे तिघेही पळून जातील असा टोला राऊत यांनी हाणला आहे. लाडक्या बहिणी योजनेचा पैसा हा तिजोरीतील आहे. तर फुटलेल्या आमदारांसाठीचा पैसा हा ठेकेदारीचा पैसा असल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला.

भाजपचे ज्या राज्यात सरकार आहे तिथे कायदा सुव्यवस्था नाही
गेल्या दोन दिवसांमध्ये दोन आमदारांच्या गाड्यांवर हल्ला करण्यात आला होता. त्यामध्ये राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी होते.आमदारांच्या गाड्यावर झालेल्या हल्ल्यावर खासदार संजय राऊत यांना प्रतिक्रिया विचारली असता ते म्हणाले, जर एखाद्या पक्षाचा एखादा आमदार आपली भूमिका मांडत असतो आणि प्रत्येकाची आपली भूमिका मांडण्याची पद्धत वेगळी असते.
मात्र जर आपल्याला त्याचे विचार पटले नाहीत. त्याला वैचारिक पद्धतीनेच विरोध करावा. आणि हीच लोकशाही आहे. परंतु गेल्या दहा वर्षांमध्ये आम्ही पहात आहोत भाजपचे सरकार ज्या ज्या राज्यात आहे त्या राज्यामध्ये कायदा सुव्यवस्था राहिलेली नाही.आणि जेव्हा हल्ले होतात तेव्हा पोलीस यंत्रणा काय करते असा सवाल देखील खासदार संजय राऊत यांनी उपस्थित केला.
कायदा सुव्यवस्थेसाठी महाराष्ट्राची एक ओळख होती मात्र गेल्या दहा वर्षांमध्ये तो कायदा सुव्यवस्था महाराष्ट्रात राहिलेला नाही. सत्तेवर जर नियमबाह्य व्यक्ती बसवला तर संविधानाच्या विरोधात गुंडागर्दी,जोर जबरदस्ती होणारच आणि हे लोकसभा निवडणुकीच्या वेळी पाहिले आहे. कारण जोर जबरदस्ती करणे हाच त्यांचा कायदा आहे. असे राजकारण महाराष्ट्रात चालू आहे आणि त्याच्यावर नियंत्रण दिल्ली आणि गुजरात वरून ठेवले जात आहे.जसा दाऊद हा मुंबईला कंट्रोल करत होता. तसेच दिल्ली आता महाराष्ट्र आणि मुंबईला कंट्रोल करत आहे आणि त्याची किंमत आम्ही मोजत आहोत, अशी टीका खासदार संजय राऊत यांनी केली.
मशालचिन्हानेच त्यांच्या खुर्चीला आग लावली
उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली मशाल या चिन्हावरच महाराष्ट्राच्या आणि देशातील सर्व निवडणुका शिवसेना लढवणार आहे. लोकसभेच्या निवडणुकीत मशाल या चिन्हानेच महाराष्ट्रात भारतीय जनता पक्षाच्या खुर्चीला आग लावली आहे. आणि मशाल या चिन्हाने सर्वांचा पराभव केला आहे असेही संजय राऊत म्हणाले.
मुसळधार पावसाने दिल्लीतील दाणादाण उडाली. त्यात नवीन संसद इमारतीला पण सोडले नाही. या इमारतीच्या लॉबीत पाणी गळायला लागले. तर आवारात पाणी साचले. त्यावरुन विरोधकांनी मोदी सरकारला चांगलेच धारेवर धरले. काँग्रसेच्या खासदारांनी तर या गळतीचे व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केले. त्यावरुन आता खासदार संजय राऊत यांनी मोदी सरकारवर टीका केली.
राम मंदिरासह संसदेला ही गळती
राम मंदिर बांधून एक वर्ष झाले पण एकाच पावसामध्ये राम मंदिर आगराला गळती लागली होती तसेच आता नवीन संसद भवनाला देखील गळती लागली आहे. त्यावर संजय राऊत म्हणाले,जुनी इमारत सुस्थिती होती. ती अजून अनेक वर्षे चालली असती. त्यात कामकाज होऊ शकले असते. ग्रीक आणि इतर देशांच्या संसद इमारती जुन्या आहेत. ही इमारत बांधून एक वर्ष होत आहे. तर राम मंदिर बांधून एक वर्ष झाले आहे. पण एकाच पावसात नवीन संसद इमारतीला गळती लागली. आमच्या कार संसद आवारात आल्या त्यावेळी पाणी होते.
राम मंदिरात पाणी गळत आहे. पावसामुळे विमानतळात पडझड झाली. सरकार आहे कुठे? असा प्रश्न त्यांनी विचारला. ठेकेदारांना काम दिल्याने हा प्रकार घडल्याचा आरोप त्यांनी केला. या ठेकेदारांचा आणि सरकारचा हिशोब झाला पाहिजे, हे ठेकदार कोण आहेत. ते कोणत्या राज्यातील आहे हे एकदा समोर आले पाहिजे. कोणाला किती कमिशन मिळाले याचा हिशोब झाला पाहिजे असा घणाघात त्यांनी घातला.












Click it and Unblock the Notifications