देशमुख हत्याकांडाचा खटला बीडबाहेर चालवा; 'या'मुळे संजय राऊत यांनी केली मोठी मागणी
संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा तपास बीडच्या बाहेर चालवावा, अशी मागणी ठाकरे गटाचे खा. संजय राऊत यांनी केली. या प्रकरणातील कोणालाही सोडणार नाही, असं देवेंद्र फडणवीस म्हणातात. मात्र फडणवीसांनी आत्तापर्यंत किती जणांना सोडलंय व किती जणांना अडकवलंय यासाठी एक एसआयटी नेमली पाहिजे, असा टोलाही खा. संजय राऊत यांनी लगावला.

राऊतांचा आरोप नेमका काय
प्रसारमाध्यमांशी बोलताना खा. संजय राऊत यांनी बीडच्या हत्या प्रकरणावर गंभीर आरोप केले. ते म्हणाले, संतोष देशमुखांच्या खुनाने अनेक गुन्ह्यांना वाचा फुटली. महायुतीची सत्ता आल्यापासून आम्ही बीडचे आका, सध्याचे मुख्यमंत्री व दोन उपमुख्यमंत्र्यांसोबतचे संशयित आरोपींचे फोटो पाहिले आहेत. त्यामुळे या प्रकरणात खरा तपास होईल का..? ही शंका आहे. देशमुख कुटुंबाला खरंच न्याय मिळेल का..? अशी शंका लोकांच्या मनात आहे. त्यामुळेच हा खटला बीडमध्ये चालू नये, तो बाहेर चालवावा अशी मागणी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केली.
सरकारबाबत व्यक्त केली शंका
संजय राऊत पुढे म्हणाले, या प्रकरणात कोणालाही सोडणार नाही, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणालेत. मात्र त्यांच्या या बोलण्यावर विश्वास ठेवायचा का..? आत्तापर्यंत त्यांनी किती जणांना कसं सोडलंय, आणि कसं अडकवलंय याचीच एक SIT नेमली पाहिजे, असा टोला संजय राऊत यांनी लगावला. ते पुढे म्हणाले, गेल्या काही काळात फडणवीसांनी किती जणांना सोडलंय, किती जणांच्या रक्ताचे डाग धुवून त्यांना आपल्या सरकारमध्ये घेतलंय हे सर्वांना माहित आहे. त्यामुळेच हा खटला बीडच्या बाहेर चालवावा, अशी आमची मागणी आहे.
खटला राज्याबाहेर चालवा
संजय राऊत म्हणाले, वाल्मिक कराडला अटक केली आहे. पण बीडमध्ये हा खटला चालू नये अशी माझी मागणी आहे. यापूर्वी अनेक केसेस, राज्याच्या बाहेर चालवल्या गेल्या आहेत. बीडमधील हत्या हा इतका गंभीर विषय आहे, हा खटला बीड जिल्ह्याच्या बाहेरच चालला पाहिजे. महाराष्ट्रात इतरत्र जरी हा खटला चालला, तरीही न्याय मिळण्याची शक्यता नाही. पण हे प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याने सध्या मुख्यमंत्र्यावर विश्वास ठेवला पाहिजे, असं राऊत म्हणाले.












Click it and Unblock the Notifications