२-४ मशिदी तोडतील, हिंदू-मुस्लिम करतील, अजून काय करणार? पहलगाम घटनेवरुन संजय राऊतांनी केला 'हा' आरोप
जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे काल दहशतवाद्यांनी पर्यटकांवर अंदाधुंद गोळीबार केला. या भ्याड हल्ल्यात २६ पर्यटकांचा मृत्यू झाला. पर्यटकांना त्यांचा धर्म विचारुन ठार करण्यात आल्याची माहिती, काही प्रत्यक्षदर्शींनी दिली. या घटनेवर आज खासदार संजय राऊत यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्यांनी मोदी-शहांसह भाजपावर गंभीर आऱोप केले. या घटनेला भाजपच जबाबदार आहे, असं त्यांनी म्हटलं.

काय म्हणाले संजय राऊत?
संजय राऊत म्हणाले की, "जर पर्यटकांची हत्या करताना त्यांना धर्म विचारला गेला असेल तर त्यासाठीही भाजपाचं द्वेषाचं राजकारण जबाबदार आहे. ज्या प्रकारे आपल्या देशात द्वेषाचं राजकारण सुरू आहे, ती कधी ना कधी उलटणार होतं. पहलागममध्ये जे काही घडलंय त्यासाठी भाजपाने निर्माण केलेलं द्वेषाचं राजकारण जबाबदार आहे, असा आरोप संजय राऊत यांनी केला. ते पुढे म्हणाले की, "अमित शाह हे अपयशी गृहमंत्री आहेत. त्यांना एक मिनिटही पदावर राहण्याचा अधिकार नाही आहे. ते दिवसभर राजकारण, कटकारस्थान करत असतात. हा पक्ष तोडायचा, तो पक्ष तोडायचा... तिकडे संपूर्ण देश तुटत आहे, अशी टीकाही राऊत यांनी केली.
एकनाथ शिंदेंना चिमटा
संजय राऊत म्हणाले, एकनाथ शिंदे म्हणतात जशास तसं उत्तर दिलं जाईल. हे हास्यास्पद आहे. एकनाथ शिंदे काय करणार..? त्यांच्या लोकांना घेऊन सीमेवर जाणार का..? एकनाथ शिंदे यांच्यात दम असेल तर त्यांनी गृहमंत्र्यांचा राजीनामा मागावा. अमित शाह त्यांच्या पक्षाचे प्रमुख आहेत. या देशाच्या इतिहासातले अपयशी गृहमंत्री आहेत. गुंडागर्दी करुन देश चालत नाही. धार्मिक द्वेषाच्या राजकारणाचा हा परिणाम आहे" असंही त्यांनी स्पष्ट केलं.
फडणवीसांनाही लगावला टोला
संजय राऊत यांनी आपल्या पत्रकार परिषदेत भाजप व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही लक्ष्य केलं. ते म्हणाले, फडणवीस म्हणतात करारा जबाब देंगे. करारा जबाब काय, गोमूत्र शिंपडून जिवंत करणार का?" अशी असा सवाल संजय राऊत यांनी केला. संजय राऊत पुढे म्हणाले, "मोदी म्हणाले दहशतवादमुक्त जम्मू-काश्मीर बनवू. जम्मू-काश्मीर पर्यटकांसाठी स्वर्ग बनवू. इथं लोक स्वर्गात गेले. तुम्ही त्यांना स्वर्गात पाठवलं, असा टोलाही त्यांनी लगावला.












Click it and Unblock the Notifications