'त्या मंत्र्याला बुटाने मारलं पाहिजे', खा. संजय राऊतांची दीपक केसरकर यांच्यावर टीका
सिंधुदुर्ग : मालवणमधील राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या भव्य पुतळा दुर्दैवाने कोसळण्याने राज्यभर तीव्र संतापाची लाट उसळली आहे. शिवप्रेमींकडून संताप व्यक्त केला जात आहे. मालवणमध्ये आज महाविकासआघाडीकडून सरकारविरोधात आंदोलन केलं जाणार आहे. विरोधकांनी या घटनेवरून राज्य सरकारला चांगलेच धारेवर धरलं आहे.
आज सकाळी उबाठा गटाचे खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेऊन सरकारवर जोरदार टीका केली आहे. राऊत म्हणाले की, जे शिवरायांचे शत्रू देखील करू शकले नाहीत, ते भाजपने केलं, पुतळा पडला बरं झालं असं म्हणणारा मंत्री फडणवीसांसोबत काम करत आहे. ही शिंदेंची गँग आहे. फडणवीस त्यांची वाहवा करत आहे. त्या मंत्र्याला बुटाने मारलं पाहिजे. फडणवीस सच्चे शिवभक्त असतील तर त्यांनी केसकरला बुटाने मारलं पाहिजे. उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाकडून चौकशी करा, अशी मागणी संजय राऊत यांनी केली आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या बांधकामामध्ये कोट्यावधींचा भ्रटाचार झाल्याचं आता उघड झाले आहे. पाण्यात असंख्य पुतळे आहेत. शिखरावर आहेत, पहाडावर आहेत. प्रतापगडावर आहेत. 120 ते 600 किलोमीटर वेगाने प्रतापगडावर वारे वाहत आहे. नेहरुंनी, शाहू महाराजांनी स्थापना केलेले पुतळे तसेच आहेत. पण सात महिन्यांपूर्वी उभा केलेला पुतळा पडला. महाराष्ट्राच्या मनाला झालेली ही जखम आहे. अशा लोकांना बुटाने मारलं पाहिजे., त्या माणसाला वाटत असेल महाराजांचा पुतळा पडला हे बरं झालं. त्यातून चांगलं होईल. काही अफजल खानाची औलाद आहे.
ही माणसं मिंध्यांनी पोसली आहे. हे लोक त्यांच्या मंत्रिमंडळात आहे. हे सडक्या विचाराचे लोक आमच्याकडून गेले बरं झालं. यांच्या तोंडातून हे शब्द कसे निघू शकतात. बरं झालं पुतळा पडला, त्यातून शुभ शकून घडेल, असं म्हणणारी माणसं कशी असू शकतात. हे फडणवीसांचं पाप आहे. महाराजांचा पुतळा पैसे खाण्यासाठी पाडला हा आरोप नाही सत्य आहे, असं म्हणत संजय राऊतांनी दीपक केसरकरांवर टीका केली आहे.
वाऱ्याने पुतळा पडला असा दावा केला जात आहे, पण त्याच वाऱ्याने किल्ल्यावरील नारळी पोहळाची झाडे कुठे पडलेली दिसत नाहीत. त्यादिवशी झाडे पडली किंवा लोकांची घरे पडली असं काही झालं नाही. जेव्हा वादळ येते तेव्हा लोकांची घरं उद्धवस्त होतात, झाडे पडतात, समुद्रातल्या बोटी पडतात, पण तसं काहीच न होता, फक्त पुतळा पडला.
पुतळा पडला याचा अर्थ तो पोकळ, भ्रष्टाचाराने पोखरलेला चौथरा, कोट्यावधी रुपये या सरकारने खाल्ले आहेत. ज्या बातम्या समोर येत आहेत, यातून ठाणे कलेक्शन समोर येत आहे. मुख्यमंत्र्यांच्या पुत्राचं कलेक्शन आहे, हे मी सांगत नाही तर बातम्यांमध्ये येत आहे. त्यामुळे याप्रकरणाची चौकशी करण्यासाठी विद्यमान न्यायमूर्तींच्या नेतृत्वाखाली एसआयटी स्थापन केली पाहिजे, अशी मागणी संजय राऊत यांनी केली आहे.












Click it and Unblock the Notifications