मोदींच्या मंत्रिमंडळात महाराष्ट्रातून या खासदारांना मिळणार स्थान?
Mumbai: नरेंद्र मोदी ९ जून रोजी तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेणार आहेत. मोदींच्या मंत्रिमंडळात महाराष्ट्रातील कोणत्या नेत्यांना स्थान मिळणार याची संभाव्य यादी समोर आलीय. यामध्ये महाराष्ट्रातून जुन्या चेहऱ्यांना पुन्हा संधी दिली जाण्याची शक्यताय. तर काही नवीन चेहऱ्यांचा समावेशही मंत्रिमंडळात होऊ शकतो.
यात एनडीएतील घटकपक्ष शिवसेना आणि राष्ट्रवादीलाही कॅबिनेट मंत्रिपद मिळणार असल्याची माहिती समोर येतेय. नरेंद्र मोदींच्या तिसऱ्या टर्ममध्ये महाराष्ट्रातून नितीन गडकरी आणि पीयूष गोयल यांचे स्थान जवळपास निश्चित असल्याच मानलं जातय.

नितीन गडकरी आणि पीयूष गोयल दोघेही कार्यक्षम मंत्री म्हणून ओळखले जातात. यंदा नितीन गडकरींना कुठले खाते दिले जाईल हे पाहणं औत्सुक्याचं ठरणारय. तर दुसऱ्या टर्ममध्ये मंत्री असणारे नारायणे राणे यावेळी लोकसभेवर निवडून गेले आहेत. त्यामुळं मंत्रिपदावर त्यांचाही दावा अधिक भक्कम झालाय.
शिवसेनेच्या संदीपान भुमरेंना मंत्रिपदाची लॉटरी?
राज्यात भाजपच्या पाठोपाठ एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेनं ७ जागांवर विजय मिळवलाय. त्यामुळं एनडीएमधील त्यांच महत्त्व वाढलेलं आहे. शिवसेनेला एक कॅबिनेट आणि एक राज्यमंत्रीपद दिलं जाण्याची शक्यताय. शिवसेनेकडून मंत्रीपदासाठी तिसऱ्यांदा निवडून आलेले बुलढाण्याचे खासदार प्रतापराव जाधव यांचे आघाडीवर असल्याचं वृत्त आहे. तर राज्याचे कॅबिनेट मंत्री आणि औरंगाबाद लोकसभेतून निवडून आलेल्या संदीपान भुमरेंना मंत्रीपदाची लॉटरी लागू शकते.
श्रीकांत शिंदेंना मंत्री करण्याची शिवसेना खासदारांची मागणी
दरम्यान, शिवसेनेतून संदीपान भुमरे आणि प्रतापराव जाधव यांच्यासारखे ज्येष्ठ नेते मंत्रिपदाच्या शर्यतीत असताना श्रीकांत शिंदेंना मंत्री करण्याची मागणी होऊ लागलीय. श्रीकांत शिंदेंना कॅबिनेट मंत्री करा अशी एकमुखी मागणी शिवसेना खासदारांनी केल्याचं खात्रीदायक वृत्त आहे. यामुळं एकनाथ शिंदे कुणाच्या नावाला पसंती देतात हे पाहणं महत्त्वाच ठरणार आहे.
याबाबत हातकणंगलेचे खासदार धैर्यशील माने यांनी याबाबत प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, श्रीकांत शिंदे तरुण आहेत. ते तिसऱ्यांदा लोकसभेवर निवडून गेले आहेत. त्यामुळे तरुण चेहऱ्याला संधी मिळणं आवश्यक आहे. याबाबत वरीष्ठांकडे मागणी करणार असल्याचं माने यांनी म्हटलं आहे.
राष्ट्रवादीकडूनही एका मंत्रिपदाची मागणी
राज्यात अजित पवारांच्या राष्ट्रवादीला केवळ एक जागा जिंकता आलीय. त्यामुळं मोदींच्या तिसऱ्या टर्ममध्ये राष्ट्रवादीला मंत्रिपद मिळणार नसल्याचे बोलले जात होते. मात्र राष्ट्रवादी काँग्रेसनेही एका मंत्रिपदाची मागणी केल्याचं वृत्त समोर आलय. राष्ट्रवादीकडून रायगडमधून निवडून आलेले सुनील तटकरे आणि राज्यसभेचे खासदार प्रफुल्ल पटेल यांच्यापैकी एकाची मंत्रीपदासाठी निवड होऊ शकते.












Click it and Unblock the Notifications