अत्याचारांच्या घटनांमागे कोणतं राजकारण? राज ठाकरेंचा सवाल
बदलापूर प्रकरण उघड झाल्यानंतर महाराष्ट्रात सातत्याने महिला आणि चिमुकल्यांवरील अत्याचारांच्या घटना समोर येत आहेत. या घटनांत वाढ का झाली आहे? यामागे कोणतं राजकारण आहे का? असा सवाल महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केला आहे. ठाकरे आज अमरावती, नागपूर दौऱ्यावर आहेत. त्यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
फोडाफोडीच्या राजकारणास केवळ शरद पवार जबाबदार - राज ठाकरे
फोडाफोडीच्या राजकारणास केवळ शरद पवार जबाबदार आहेत. पुलोदच्या वेळी फोडाफोडी केली, नंतर सेना फोडली आणि जातीचे विषही त्यांनीच कालवले. राष्ट्रवादीच्या जन्मानंतर जातीचे विष फोफावले, सगळ्यांनी मिळून जातीयता संपवायला हवी, असे राज ठाकरे म्हणाले. लोकसभेला मोदी शहांच्या विरोधात मतदान झाले पण ते ठाकरे-पवारांच्या प्रेमापोटी मतदान झालं नाही.

उत्तरप्रदेशखालोखाल महाराष्ट्र सर्वात जास्त बलात्काराचे गुन्हे
राज्यात दर तासाला एक बलात्कारासारख्या गंभीर गुन्हा दाखल केला जातो. नॅशनल क्राईम ब्यूरोच्या आकडेवारीनुसार 2022 मध्ये महाराष्ट्रात उत्तरप्रदेशाखलोखाल बलात्काराची जास्त प्रकरणे नोंदवली गेली आहेत. बीड आणि सांगलीत महिला उसतोड कामगारांच्या जिवाशी खेळ होत आहे. मविआच्या काळात देखील बलात्काराची प्रकरणे समोर आली आहेत. कठोर शासन होत नाही त्यामुळे असे प्रकार रोज वाढत आहेत असे राज ठाकरे म्हणाले.
पोलिसांच्या मागे सरकारने खंबीरपणे उभे रहावे
जरांगेच्या उपोषणाला बसले लाठीचार्ज झाला पण कारवाई पोलिसांवर झाली. लाठीचार्ज पोलिसांना सुचला का? जो कुणी गृहमंत्री असेल तर त्याला शून्य माहिती, पण सरकारने पोलिसांना सुचना करायला हवी. सरकार जर पोलिसांच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहिले पाहिजे. त्यांच्याच पायात बेड्या घातल्या तर ते कसे उभे राहतील असा सवालही राज ठाकरे यांनी केला.
लाडकी बहिण योजनेवर केले भाष्य
राज ठाकरे यांनी लाडकी बहिण योजनेवर देखील भाष्य केले ते म्हणाले की, लोकांच्या करातून सरकार सर्व योजनांना पैसे देते पण लाडक्या बहिण योजनेसाठी सरकारकडे पैसे कुठे आहेत? नुकतेच अजित पवारांनी निधीची मागणी धुडकावल्याचा उल्लेखही राज ठाकरेंनी केला.
मोदींची लवकरच भेट घेणार
राज ठाकरे यांनी यावेळी माध्यमांशी बोलताना सांगितले की, मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा, यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींना लवकरच भेटणार आहे. राज ठाकरे यांनी लोकसभा निवडणुकीत मोदी तिसऱ्यांदा देशाचे पंतप्रधान व्हावेत म्हणून देशात एनडीए आणि महाराष्ट्रात महायुतीला पाठिंबा दिला होता.
200 ते 225 जागांवर निवडणूक लढवणार
विधानसभेला मनसे एकला चलो रे असून पक्ष 200 ते 225 जागांवर निवडणूक लढवणार आहे असं राज ठाकरेंनी सांगितलं. शिंदे-फडणवीसांच्या मतदार संघातही आणि आदित्य ठाकरेंच्या विरोधातही उमेदवार देणार असल्याचे त्यांनी सांगितले.












Click it and Unblock the Notifications