अजित पवार वीस हजार मतांनी पडलेत; कसे? ती आकडेवारीच जानकरांनी सांगितली
विधानसभा निवडणुकीचा निकाल लागून महिना होत आला आहे. मात्र तरीही या निकालाचे कवित्व संपताना दिसत नाही. शरद पवार गटाचे आमदार उत्तम जानकर यांनी पुन्हा एक मोठा दावा केला आहे. विधानसभा निवडणुकीत दीडशे मतदारसंघात गडबडी केल्या आहेत. बारामतीतून अजित पवारही २० हजार मतांनी पराभूत झाले आहेत, असे विधान जानकर यांनी केले आहे. विशेष म्हणजे गोविंद बागेत शरद पवारांची भेट घेतल्यानंतर त्यांनी हे विधान केल्याने त्याची महाराष्ट्राच्या राजकारणात चांगलीच चर्चा सुरु आहे.

काय म्हणाले जानकर
शरद पवारांची भेट घेऊन आल्यानंतर जानकर यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, विधानसभा निवडणुकीत नक्कीच गडबड झाली. अजित पवार गटाचे फक्त १२ आमदार निवडून आले आहेत. शिंदे गटाचे १८ व भाजपचे ७७ उमेदवार विजयी झाले आहेत. महायुतीचे तीन अपक्ष धरून महायुतीचे फक्त ११० आमदार निवडून आले आहेत. जानकर यांनी थेट आकडेवारी सांगत कोण किती मतांनी पराभूत झाले, हे सांगितले आहे.
अजित पवारांचा पराभव
जानकर म्हणाले, अजित पवार यांना १ लाख ८० हजार मते पडली. त्यापैकी दोनास एक असे प्रपोजल लावले गेले. युगेंद्र पवार यांना ८० हजार मते पडली. त्यात साठ हजार मते मिळून त्यांना १ लाख ४० हजार मते होतात. म्हणजेच अजित पवारांच्या मतांतून ६० हजार मते कमी होतात. म्हणजेच अजित पवार हे बारामतीतून २० हजार मतांनी पराभूत झाले आहेत, अशा दावा जानकर यांनी केला.
महायुती सरकार पडणार
जानकर यांनी महायुती सरकार चार महिन्यात पडेल, असाही दावा केला. ते म्हणाले, दिल्लीत ज्येष्ठ नेते शरद पवार, राहुल गांधी असे आम्ही सगळे मिळून निवडणूक आयोगाची भेट घेणार आहोत. या सगळ्या गोष्टी आम्ही निवडणूक आयोगाच्या लक्षात आणून देणार आहोत. व्हीव्हीपॅटची चिठ्ठी आमच्या हातात आली पाहिजे, ही आमची मागणी आहे. हे सर्व पाहता महायुती सरकारने राजीनामा दिला पाहीजे. ते राजीनामा देत नसतील तर मी राजीनामा देतो. माझ्या मतदारसंघात पोटनिवडणूक घेतली पाहीजे. चार महिन्यांत तुम्हाला महायुती सरकार जमीनदोस्त झालेले पहायला मिळेल, असा दावाही जानकर यांनी केला.












Click it and Unblock the Notifications