बीड हत्याकांडात उज्ज्वल निकम यांची एन्ट्री; धस यांच्या मागणीनंतर क्षणात फडणवीसांनी फिरवला फोन
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्याकांडात रोज नवनवी माहिती समोर येत आहे. या प्रकरणाचा खटला चालविण्यासाठी आता ज्येष्ठ सरकारी वकील उज्ज्वल निकम यांच्या नावाची चर्चा होत आहे. आ. सुरेश धस यांनी याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. फडणवीसांनीही धस यांच्या मागणीला हिरवा कंदील दाखवत उज्जल निकम यांना फोन केला. त्यामुळे उज्ज्वल निकम हे प्रकरण हातात घेतील, अशी शक्यता वाढली आहे.

धस यांनी घेतली फडणवीसांची भेट
या प्रकरणातील संशयित आरोपी वाल्मिक कराड याला अटक झाल्यानंतर त्याला बीड जिल्ह्यातील केज न्यायालयात हजर करण्यात आले. त्यानंतर सरकारी वकीलांनी हा खटला लढण्यास नकार दिला. त्यानंतर तत्काळ आ. सुरेश धस यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली. या भेटीत त्यांनी हा खटला ज्येष्ठ सरकारी वकील उज्ज्वल निकम यांच्याकडे द्यावा, अशा आग्रह फडणवीसांकडे धरला.
फडणवीसांनी लावला फोन
या भेटीबाबत माहिती देताना आ. सुरेश धस यांनी संपूर्ण प्रकार सांगितला. ते म्हणाले, मी मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्यानंतर त्यांना सरकारी वकील म्हणून उज्ज्वल निकम यांच्याकडे ही केस द्यावी, अशी विनंती केली. त्यानंतर तत्काळ फडणवीस यांनी याबाबत उज्ज्वल निकम यांना फोन लावला. त्यानंतर उज्ज्वल निकम यांनी तत्काळ आपल्या कामाचा आढावा घेऊन, संध्याकाळपर्यंत कळवतो, असे सांगितले असल्याचेही धस यांनी प्रसारमाध्यमांना सांगितले.
तीन आरोपी अजून फरार
संतोष देशमुख यांचे 9 डिसेंबर रोजी अपहरण करुन हत्या करण्यात आली होती. या प्रकरणात केज पोलीस ठाण्यात सुदर्शन घुले, राष्ट्रवादी काँग्रेसचा तत्कालिन तालुकाध्यक्ष विष्णू चाटे, जयराम चाटे, प्रतीक घुले, महेश केदार, कृष्ण आंधळे, आणि सुधीर सांगळे या सात जणांविरोधात गुन्हा दाखल केला. शरण आलेला वाल्मिक कराडवर खंडणीचा गुन्हा दाखल आहे. या प्रकरणात विष्णू चाटे, जयराम चाटे, महेश केदार, प्रतीक घुले या चौघांना अटक करण्यात आली आहे. त्यांना कोठडी सुनावण्यात आली आहे. सुदर्शन घुले, कृष्ण आंधळे, आणि सुधीर सांगळे हे तिघे अजून फरार आहेत.












Click it and Unblock the Notifications