Sanjay Shirsat: 'सरकारचा पैसा, आपल्या बापाचं काय जातंय?'; संजय शिरसाटांचे पुन्हा वादग्रस्त विधान!
Sanjay Shirsat : राज्यात महायुती सरकारमधील मंत्र्यांच्या वादग्रस्त वक्तव्यांवरून सुरू असलेला वाद थांबण्याचं नाव घेत नाहीये. नुकतंच, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कॅबिनेट बैठकीत सर्व मंत्र्यांना सावधगिरीने बोलण्याचे निर्देश दिले होते. मात्र, या आदेशानंतरही सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी पुन्हा एकदा एक वादग्रस्त विधान केलं आहे.
नेमकं काय घडलं?
संजय शिरसाट हे अकोल्यातील सामाजिक न्याय भवनाच्या उद्घाटनासाठी आले होते. या कार्यक्रमात बोलताना त्यांनी वसतिगृहासाठी निधी मंजूर करण्याबद्दल एक विधान केलं, ज्यामुळे नवीन वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.
संजय शिरसाट म्हणाले की, 'तुम्ही ५, १० किंवा १५ कोटी अशी कितीही रक्कम मागा, आपण लगेच मंजूर करू. सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय," असं वादग्रस्त वक्तव्य त्यांनी केलं. या वेळी व्यासपीठावर भाजप आमदार हरीश पिंपळे, राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी आणि काँग्रेसचे साजिद खान पठाण उपस्थित होते.

अमोल मिटकरी यांना सल्ला
याच कार्यक्रमात, पुढे बोलताना, स्वतः वादग्रस्त वक्तव्य करूनही शिरसाट यांनी राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांना जपून बोलण्याचा सल्ला दिला. "तुमच्यामुळे माध्यमांना चांगला टीआरपी मिळतोय, पण तू जास्त बोलू नकोस, नाहीतर तुझेही आमच्यासारखे हाल होतील," असं ते म्हणाले.
राज ठाकरे आणि राहुल गांधींवर टीका
राज ठाकरे यांनी इतर नेत्यांच्या व्यासपीठावरून केलेल्या टीकेवर उत्तर देणं त्यांनी टाळलं. तर, राहुल गांधी यांनी निवडणूक आयोगावर केलेल्या आरोपांवर बोलताना, "राहुल गांधी पुरावे देण्यापूर्वी २०२९ ची निवडणूक झालेली असेल," असा टोला त्यांनी लगावला.
या घटनेमुळे, महायुतीमधील मंत्र्यांच्या वक्तव्यांवरून पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे. मुख्यमंत्र्यांनी दिलेली तंबी असूनही असे प्रकार सुरू असल्याने सरकारची प्रतिमा धोक्यात येण्याची शक्यता आहे.












Click it and Unblock the Notifications