महायुतीची मध्यरात्री बैठक,तिन्ही पक्षांची अडीच तास खलबतं
मुंबई : आगामी विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार तयारी सुरू केलीय. राज्यात महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यात जोरदार लढत होणार आहे.या पार्श्वभूमीवर काल रात्री मुंबईत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निवास्थानी महायुतीच्या नेत्याची एक बैठक पार पडली. नाशिकमध्ये सुरु असलेली जनसन्मान यात्रा सोडून अजितदादा गुरुवारी रात्री अचानक मुंबईत दाखल झाले.
मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी महायुतीच्या तिन्ही नेत्यांची रात्री 11 वाजता बैठक झाली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार या तिन्ही नेत्यांसह युतीचे प्रमुख पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. आगामी विधानसभा निवडणुकीसाठी या बैठकीत खलबतं झाल्याच्या चर्चा आहेत. लोकसभेतील अपेक्षाभंगानंतर विधानसभेला आता ताकही फुंकून प्यायचे, असाच निर्णय या बैठकीत झाल्याच्या चर्चा आहेत.

शिंदे-फडणवीस-पवारांची मध्यरात्री खलबतं
मुंबईत महायुतीने गुरुवारी मध्यरात्री बैठक घेतली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा बंगल्यावर गुरुवारी रात्री 11 ते 1.30 पर्यंत बैठक सुरु होती. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या उपस्थितीत तिन्ही पक्षाच्या प्रमुख नेत्यांची ही बैठक झाली. सुमारे अडीच तास तिन्ही प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत खलबते झाले. त्यात आगामी विधानसभा निवडणुकीचा रणनीती निश्चित करण्यात आली. तिन्ही पक्षाकडून सामूहिक सभा, दौरे आणि मेळावे घेण्यात येणार आहे. विधानसभा निवडणुकीचे रणशिंग येत्या 20 ऑगस्ट रोजी कोल्हापूर येथून फुंकण्यात येणार आहे.
मा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निवास्थानी मा उपमुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस व मा अजितदादा पवार यांच्या उपस्तितीत महायुती समन्वयाची बैठक संपन्न झाली . सदर बैठकीत ७ विभागात व २८८ विधानसभेत एकाच दिवशी विभागनिहाय महायुतीतील सर्व घटक पक्ष संवाद / लाभार्थी यात्रा व सभा आयोजित करतील… pic.twitter.com/xx47S0V9su
— Prasad Lad (@PrasadLadInd) August 8, 2024
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार रात्री 11 वाजता पोहचले. त्यानंतर तिन्ही नेत्यांमध्ये चर्चा सुरु झाली. या बैठकीत 7 विभाग आणि 288 विधानसभेत एकाच दिवशी विभागनिहाय संवाद दौरे, लाभार्थी यात्रा व सभा आयोजित करण्याबाबत निर्णय झाला. तसेच 7 विभागात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, देवेंद्र फडणवीस यांच्या जाहीर सभा होणार आहेत. 20 ऑगस्ट रोजी महालक्ष्मीचे दर्शन घेऊन कोल्हापूर येथून जाहीर सभेने विधानसभा निवडणुकीचे रणशिंग फुकंले जाणार आहे.
महायुतीच्या या बैठकीला प्रसाद लाडही उपस्थित होते. ते म्हणाले, या बैठकीत जागावाटपा संदर्भात प्राथमिक चर्चा झाली. तिन्ही नेते यासंदर्भात बोलतील. आमच्यामध्ये जागा वाटप संदर्भात कुठल्याही तिढा नसल्याचे प्रसाद लाड यांनी स्पष्ट केले. ते म्हणाले, तिघांच्या सहमतीने एक आराखडा तयार केला जाईल.
दिल्लीच्या नेतृत्वाखाली आमच्या सभा होण्याआधीच जागांच्या संदर्भात निर्णय झालेला असेल. भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय पातळीच्या पक्ष असल्यामुळं सर्व निर्णय देवेंद्र फडणवीस आणि कोर कमिटी करते. केंद्राच्या निर्णयानंतर जागा जाहीर केल्या जाणार असल्याचे लाड यांनी स्पष्ट केले.












Click it and Unblock the Notifications