आधीच होत्याचं नव्हतं झालं! त्यात पुन्हा मराठवाड्याला मुसळधार पावसाचा इशारा!, पुढचे 5 दिवस वैऱ्याचे!
Marathwada Flood Crisis IMD Issues Heavy Rain Alert : गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या अतिवृष्टीने मराठवाड्याची परिस्थिती बिकट केली आहे. हजारो हेक्टर शेती पाण्याखाली गेली असून, अनेक गावांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे.
या अस्मानी संकटातून मराठवाडा अजून सावरलेला नसताना, आता पुढील पाच दिवस पुन्हा एकदा मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. यामुळे मदतकार्य आणि पुनर्वसनाच्या कामांमध्ये मोठे अडथळे येण्याची शक्यता आहे.

पुढील पाच दिवस मुसळधार पावसाचा इशारा
हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार, २५ सप्टेंबर ते २९ सप्टेंबर या काळात राज्यासह मराठवाड्यात काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडेल. विशेषतः २७ सप्टेंबर रोजी पावसाची तीव्रता अधिक असणार आहे.
बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाल्याने आणि चक्रीय स्थितीमुळे हा पाऊस अपेक्षित आहे. विदर्भ आणि मराठवाड्यात २६ ते ३० सप्टेंबर दरम्यान पावसाचा जोर अधिक राहील, असेही सांगण्यात आले आहे. त्यामुळे, मच्छिमारांना या काळात समुद्रात न जाण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
24 Sep, IMD model guidance for 27 to 30 Sept for possibility of heavy to very heavy rains over Maharashtra and adjoining areas, in view of LPA development on 25th Sept over BoB it's likely inward movement & its further intensification. IMD has already alerted & updating daily. TC pic.twitter.com/lcNrgVDoeU
— K S Hosalikar (@Hosalikar_KS) September 24, 2025
मराठवाड्याची पावसाने दयनीय अवस्था
जी मराठवाड्याची ओळख कायम दुष्काळी भाग म्हणून होती, तोच भाग आता ओल्या दुष्काळाने ग्रस्त झाला आहे. एकेकाळी रेल्वेने पाणी पोहोचवावे लागणाऱ्या मराठवाड्यात आता लोकांना हेलिकॉप्टरने बाहेर काढण्याची वेळ आली आहे. धाराशिव, बीड आणि जालना या जिल्ह्यांमध्ये पावसाने मोठे थैमान घातले आहे.
१ जूनपासून आतापर्यंत मराठवाड्यात सरासरीपेक्षा १२४% जास्त पाऊस झाला आहे. २२ सप्टेंबरपर्यंत सरासरी ६०४ मिमी पाऊस अपेक्षित असताना, प्रत्यक्षात ७४७ मिमी पाऊस झाला आहे. एकट्या सप्टेंबर महिन्यात १६५% पाऊस झाला आहे, ज्यामुळे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे.
सरकारकडून मदतीचा दावा
राज्यात पावसाने झालेल्या नुकसानीसाठी सरकारने २ हजार २१५ कोटी रुपयांची मदत जाहीर केल्याचा दावा मदत आणि पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव पाटील यांनी केला आहे. मात्र, पुढील काळात पावसाची शक्यता लक्षात घेता ही मदत गरजूंपर्यंत वेळेत पोहोचेल का, हा प्रश्न निर्माण झाला आहे.












Click it and Unblock the Notifications