'मराठी भाषा गौरव दिन' आणि 'मराठी राजभाषा दिन' यामध्ये काय फरक आहे, कधी व कसे साजरे होतात हे दिवस?
Marathi Bhasha Gaurav Din 2025 : अगदी काही महिन्यांपूर्वीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळाने मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिला. त्यामुळे सगळीकडे अभिनंदन केले जात आहे. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त झाल्याने येत्या काळात मराठी भाषेच्या प्रगतीसाठी केंद्र व राज्यशासनाकडून अनेक प्रकारचे उपक्रम राबविले जातील, यात कोणतीह शंका नाही.
दुसरीकडे महाराष्ट्रात मराठी भाषा गौरव दिन साजरा केला जातो. तो नेमका कधी व कोणत्या तारखेला साजरा केला जातो, यावर कायमच चर्चा असते. मराठी भाषा गौरव दिन व मराठी राजभाषा दिन यात नेमका काय फरक आहे, यावर देखील एक नजर टाकणार आहोत. चला तर जाणून घेऊया या दोन्ही दिवसातील फरक आणि त्यामागील उद्देश नेमका काय आहे?
मराठी भाषेला मोठा वारसा अन् परंपरा
मराठी भाषेला महानुभवापासून ते अगदी अलिकडच्या मोबाईल युगातील मराठी परंपरेचा एक दीर्घ वारसा लाभलेला आहे. ज्ञानेश्वरांपासून ते अगदी अत्याधुनिक काळात आणि युवा साहित्य अकादमी विजेत्यापर्यंत मराठी बोली आणि मराठी प्रादेशिक बोली असा फरक केला गेला असला तरी या दोन्हीमध्येही मराठी साहित्य निर्मिती ही विपुल झाली आहे.
विपुलतेचे प्रमाण हे मराठी बोलीला एकदमच प्राप्त झाले नाही तर त्यासाठी प्राचीन मराठी वाङ्मयापासून ते आधुनिक मराठी वाङ्मयापर्यंतचा वारसा लाभला आहे. या वारसा परंपरेतील एक नाव म्हणजे विष्णू वामन शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज. कुसुमाग्रजांनी मराठी कविता उंच पातळीवर नेऊन ठेवली. त्यामुळे भारत सरकारतर्फे त्यांना ज्ञानपीठ पुरस्काराने गौरवण्यात आले. त्यांच्या जन्मदिवस म्हणून महाराष्ट्र सरकारच्या वतीने 27 फेब्रुवारी हा दिवस मराठी भाषा गौरव दिन साजरा केला जातो.

कुसुमाग्रजांचा जन्मदिवस म्हणून सन्मान!
विष्णू वामन शिरवाडकर अर्थात कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस 27 फेब्रुवारी रोजी आहे. हाच दिवस 'मराठी भाषा गौरव दिन' साजरा करण्यात येतो. कवी कुसुमाग्रज यांच्या स्मृतींना अभिवादन करण्याच्या निमित्ताने 27 फेब्रुवारी हा दिवस 'मराठी भाषा गौरव दिन' म्हणून साजरा करण्याचा निर्णय 21 जानेवारी 2013 रोजी महाराष्ट्र सरकारने घेतला. परंतु याच दिवसाला अनेक जण मराठी राजभाषा दिन म्हणतात. अर्थात या दोन्ही दिवसांमध्ये फरक आहे, हे लक्षात घेणे गरजेचे आहे.
'मराठी भाषा गौरव दिन' अद्यादेश कधी निघाला
महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक धोरण 2010 मध्ये कवी कुसुमाग्रज यांचा 27 फेब्रुवारी हा जन्मदिवस 'मराठी भाषा गौरव दिन' म्हणून नमूद करण्यात आला आहे. कुसुमाग्रज यांनी महाराष्ट्रच्या सांस्कृतिक क्षेत्रामध्ये मोलाचे योगदान दिले आहे. मराठी कवितेला कुसुमाग्रजांनी एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवले. शिवाय महाराष्ट्राच्या बोलीला साहित्यात विशेष असे स्थान निर्माण करून देण्यात कुसुमाग्रजांचं मोलाचं योगदान आहे.
मराठी भाषा ही ज्ञानभाषा होण्यासाठी त्यांनी अथक परिश्रम घेतले. कुसुमाग्रज यांचा जन्म नाशिक येथे 27 फेब्रुवारी 1912 रोजी झाला. विष्णू वामन शिरवाडकर यांच्या मोठ्या बहिणीचे नाव कुसुम होते. त्या नावावरूनच त्यांनी आपले कवी म्हणून कुसुमाग्रज हे नाव वापरले. कुसुमाग्र यांनी आपल्या आत्मनिष्ठ प्रतिभेने आणि समाजनिष्ठ भावस्पर्शी लेखणीने जागतिक दर्जाचे लेखन केले.
'मराठी राजभाषा दिन' कधी साजरा केला जातो?
- भारतीय राज्यघटनेतील अनुच्छेद 347 नुसार राष्ट्रपतींना लक्षणीय प्रमाणात लोकांकडून बोलल्या जाणाऱ्या कोणत्याही भाषेला राजभाषा म्हणून मान्यता देण्याची तरतूद व अधिकार आहे. 1 मे 1960 ला महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली. राज्य कारभाराची अधिकृत भाषा म्हणून मराठी भाषेला मान्यता देण्यात आली. तेव्हापासून 1 मे दिवस हा 'मराठी राजभाषा दिन' किंवा 'मराठी भाषा दिन' म्हणून साजरा केला जातो. तत्कालिन मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या सरकारने 'मराठी राजभाषा अधिनियम 1964 सर्वप्रथम 11 जानेवारी 1965 रोजी प्रसिद्ध केला.
- या अधिनियमानुसार, महाराष्ट्राची अधिकृत राजभाषा ही मराठी असेल असे जाहीर करण्यात आले. त्यानंतर 1966 पासून या निर्णयाची अंमलबजावणी सुरू झाली. वसंतराव नाईक सरकारने पुढे मराठी भाषा संवर्धनासाठी राज्यात पहिल्यांदाच भाषा संचालनालयाची निर्मिती करून प्रादेशिक स्तरावर चार केंद्राची स्थापना केली आणि राज्यकारभार मराठीतून चालणार असे अधिकृत जाहीर केले. अमराठी अधिकाऱ्यांसाठी 'राजभाषा परिचय' पुस्तकही प्रकाशित करण्यात आले.
- 1 मे 1960 रोजी मराठी भाषकांचे महाराष्ट्र राज्य अस्तित्वात आल्यामुळे तो दिवस 'मराठी राजभाषा दिन' साजरा करणे अपेक्षित होते. महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेनंतर काही वर्षे 1 मे रोजी 'मराठी राजभाषा दिन' साजरा केला जात होता. मराठी राजभाषा दिनासह याच दिवशी मराहाष्ट्र स्थापना दिवस आणि कामगार दिनही साजरा करण्यात येत होता. परंतु, या दोन्ही दिवसांमुळे 'मराठी राजभाषा दिना'कडे दुर्लक्ष झाले.
- त्यानंतर महाराष्ट्र सरकारच्या सामान्य प्रशासन विभागाने 10 एप्रिल 1997 रोजी पुन्हा शासन निर्णय काढून 1 मे रोजी 'मराठी राजभाषा दिन' साजरा करण्यात यावा, अशा सूचना दिल्या. 28 एप्रिल ते 30 एप्रिल 1997 या तीन दिवशी विविध उपक्रम आयोजित करून 1 मे रोजी समारंभपूर्वक सांगता सोहळा करावा' आणि त्याच दिवशी 'मराठी राजभाषा दिवस साजरा करावा असा निर्णय सरकारने घेतला. सरकारच्या या निर्णयामुळे 1 मे रोजीच 'मराठी राजभाषा दिन' साजरा करण्यात येतो.
'जागतिक मातृभाषा दिन' कधी साजरा केला जातो?
'मराठी राजभाषा दिन' आणि 'मराठी भाषा गौरव दिना'प्रमानेच 21 फुब्रुवारी रोजी जागतिक 'मातृभाषा दिन' साजरा केला जातो. युनेस्को या जागतिक पातळीवरील संस्थेनेच 21 फेब्रुवारी हा दिवस 'जागतिक मातृभाषा दिन' म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे या दिवशी आपल्या मातृभाषेवरील प्रेम व्यक्त करण्यासाठी 21 फेब्रुवारी रोजी दरवर्षी 'जागतिकक मातृभाषा दिन' साजरा केला जातो.
-
DA Hike सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खूशखबर! महागाई भत्त्यात 5% वाढ; पगार वाढणार 'या' राज्याचा मोठा निर्णय -
पुण्यासाठी मोठी बातमी! पुणेकरांचा प्रवास होणार सुसाट; रामवाडी-वाघोली मेट्रो कामाला गती; हा आहे फायदा -
युद्धाचा भडका! तरीही सोन्याच्या दरात मोठी घसरण! 10 ग्रॅमचा भाव झाला 'एवढा'; पहा मुंबई पुण्याचे दर -
Gudi padwa 2026 wishes in Marathi : गुढीपाडव्यानिमित्त नववर्षाचे खास 30 शुभेच्छा संदेश शेअर करा -
सोन्याच्या दरात मोठी घसरण! दुबईत 10 तोळे सोने भारतापेक्षा 21 हजाराने स्वस्त; मुंबई, पुण्यातही स्वस्त -
Chaitra Amavasya 2026 :18 की 19 मार्च? चैत्र अमावस्या नक्की कधी? जाणून घ्या तिथी, शुभ-मुहूर्त, महत्व -
हरीश राणांना कसा दिला जाणार 'इच्छामृत्यू'? व्हेंटीलेटर हटवणे ते अखेरच्या श्वासापर्यंत काय घडतं? वाचा -
Gudi Padwa 2026: गुढीपाडवा कधी आहे? का साजरा केला जातो हा सण? जाणून घ्या यामागील रंजक पौराणिक कथा -
'धुरंधर-2' मोडणार सर्व रेकॉर्ड्स! पहिल्या दिवशी बॉक्स ऑफिसवर नोटांचा पाऊस; आकडा पाहून व्हाल थक्क! -
काबुल हादरले! रुग्णालयावर भीषण 'एअरस्ट्राइक'; 400 जणांचा मृत्यू, 'त्या' व्हिडिओने जग सुन्न! -
प्राध्यापक भरतीचा मार्ग मोकळा! महाराष्ट्रात 5 हजार पदांसाठी मेगाभरती; चंद्रकांत पाटलांची मोठी घोषणा -
आजचे राशीचक्र: कुणाचे नशीब चमकणार आणि कुणाला संघर्ष करावा लागणार? वाचा आजचे राशीभविष्य










Click it and Unblock the Notifications