आझाद मैदानात जरांगे पाटील यांच्या आंदोलनामुळे तणाव; कोर्टाच्या निर्देशानंतर काय-काय घडले?
Maratha Quota Protest in Mumbai Day 5 : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांचे मुंबईतील आझाद मैदानावर उपोषण सुरू आहे. आज (2 सप्टेंबर) त्यांच्या आंदोलनाचा पाचवा दिवस आहे. मात्र, मराठा आंदोलन हाताबाहेर जात असल्यामुळे मुंबई उच्च न्यायालयाने राज्य सरकारला दुपारपर्यंत मुंबई रिकामी करण्याचे महत्त्वपूर्ण निर्देश दिले आहेत.
गणेशोत्सवाच्या काळातच हे आंदोलन सुरू असल्याने मुंबईला छावणीचे स्वरूप आले आहे. कोर्टाने आंदोलकांना दक्षिण मुंबईतून बाहेर काढण्याचे आदेश दिले आहेत, तसेच त्यांना सीएसएमटी, मरीन ड्राईव्ह आणि हुतात्मा चौक यांसारख्या भागातून हटवण्यास सांगितले आहे.

आझाद मैदानात नवा मोठा मंडप
न्यायालयाच्या निर्देशानंतरही आंदोलन अधिक प्रभावी करण्यासाठी आझाद मैदानात एक मोठा मंडप उभारण्यात आला आहे. सुमारे 50 मीटर लांब आणि 20 मीटर रुंद असलेल्या या मंडपात २,५०० ते ३,००० लोक थांबू शकतील. जरांगे पाटील यांच्या जवळच्या सहकाऱ्यांनी सांगितले की, या मंडपामुळे इकडे-तिकडे पांगलेले आंदोलक पुन्हा मैदानात एकत्र येतील.
कोर्टाच्या निर्देशानंतरची परिस्थिती
न्यायालयाच्या आदेशानंतर, मुंबई पोलिसांनी मध्यरात्री आझाद मैदान आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) परिसरातील आंदोलकांच्या गाड्या हटवण्यास सुरुवात केली.
पोलिसांनी स्पीकरद्वारे आणि प्रत्यक्ष भेटून आंदोलकांना त्यांची वाहने मुंबईबाहेर, वाशी मार्केटला नेण्यास सांगितले. आंदोलनाची चौथी रात्र असूनही, सीएसएमटीवर अजूनही शेकडो आंदोलक थांबले आहेत.
आरक्षणाबाबत सरकारची हालचाल
यादरम्यान, मराठा आरक्षणावर तोडगा काढण्यासाठी सरकार लवकरच एक नवा जीआर (शासकीय निर्णय) काढण्याच्या तयारीत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. कुणबी प्रमाणपत्राचे वितरण सुलभ करण्यासाठीही सरकार प्रयत्नशील आहे.
महाधिवक्त्यांच्या मान्यतेनंतर या जीआरचा मसुदा जरांगे पाटील यांना दाखवून अंतिम निर्णय घेतला जाईल. मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्याच्या जरांगेंच्या मागणीमुळे सरकारसमोर मोठा पेच निर्माण झाला आहे. मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री, आणि समितीच्या सदस्यांची यावर तोडगा काढण्यासाठी बैठक झाली आहे.












Click it and Unblock the Notifications