मराठा GR नंतर ओबीसींचे भवितव्य धोक्यात? मुंबईत बैठकांचे सत्र, हाकेंची संघर्ष यात्रा दिशा बदलेल का?
maratha reservation obc future meetings : गेल्या काही दिवसांपासून मराठा आरक्षणावरून महाराष्ट्राचे राजकारण ढवळून निघाले आहे. सरकारने मराठा आरक्षणासाठी काढलेल्या अध्यादेशानंतर ओबीसी समाजामध्ये एक प्रकारची अस्वस्थता निर्माण झाली आहे.आपल्या आरक्षणाला धक्का बसू नये, अशी भावना ओबीसी समाजात बळावत आहे.
याच पार्श्वभूमीवर मुंबईत ओबीसी समाजाच्या भवितव्यासाठी दोन महत्त्वाच्या बैठकांचे आयोजन करण्यात आले आहे. या बैठका मराठा आरक्षण आणि ओबीसी समाजाच्या मागण्यांसाठी अत्यंत महत्त्वाच्या ठरणार आहेत.

ओबीसी नेत्यांची बैठक
८ सप्टेंबर, मराठा आरक्षणाच्या जीआरमुळे ओबीसी आरक्षणाला धोका निर्माण होईल, अशी भीती अनेक नेत्यांना वाटत आहे. या शंकेच्या निरसनासाठी आणि पुढील दिशा ठरवण्यासाठी ८ सप्टेंबर रोजी मुंबईतील यशवंतराव चव्हाण सभागृहात राज्यभरातील ओबीसी नेत्यांची एक महत्त्वाची बैठक आयोजित करण्यात आली आहे.
ही बैठक विदर्भातील ओबीसी नेत्यांनी नागपुरात विजय वडेट्टीवार यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या बैठकीनंतर आयोजित केली आहे. या बैठकीत, सरकारकडून मिळालेल्या आश्वासनांवर आणि आगामी काळात ओबीसी समाजाची रणनीती कशी असावी, यावर चर्चा झाली.
सरकारसोबतची बैठक
९ सप्टेंबर, मुंबई : दुसऱ्या बाजूला, राज्य सरकारनेही ओबीसी समाजाच्या मागण्यांची दखल घेतली आहे. इतर मागास व बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यांनी ९ सप्टेंबर रोजी संध्याकाळी ४.३० वाजता मुंबईत ओबीसी समाजाच्या प्रलंबित मागण्यांसाठी विशेष बैठक बोलावली आहे.
४ सप्टेंबर रोजी नागपूर येथे राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या साखळी उपोषणाची सांगता करताना मंत्री सावे यांनी अशी बैठक लवकरच आयोजित करण्याचे आश्वासन दिले होते. या बैठकीत ओबीसी समाजाच्या विविध मागण्यांवर शासनाच्या स्तरावर तोडगा काढण्याचा प्रयत्न केला जाईल.
राष्ट्रीय ओबीसी महासंघाने याआधीच स्पष्ट केले आहे की, सरकारने मराठा आरक्षणासाठी काढलेल्या अध्यादेशामुळे ओबीसींच्या आरक्षणाला कोणताही धक्का बसणार नाही. या दुहेरी भूमिकेमुळे ओबीसी समाजात नेमकी काय स्थिती आहे, हे स्पष्ट होईल.
लक्ष्मण हाकेंचा एल्गार आणि संघर्ष यात्रेचे संकेत
या सगळ्या घडामोडींमध्ये ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी जोरदार भूमिका घेतली आहे. बीड जिल्ह्यातील भोगलवाडी येथे झालेल्या एका जाहीर सभेत त्यांनी राज्यव्यापी ओबीसी संघर्ष यात्रेची घोषणा करण्याचे संकेत दिले आहेत.
त्यांनी थेट शरद पवार यांच्यावर टीका करताना म्हटले, की 'पवार साहेब, तुम्ही मंडल यात्रा काढली, ती दोन दिवसांत बंद केली. आमच्या नादाला लागायच्या भानगडीत पडू नका.'
लक्ष्मण हाके यांनी ओबीसींच्या मागण्यांकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप केला. गोपीनाथ मुंडे यांनी आम्हाला स्वाभिमान शिकवला असे सांगत त्यांनी सध्याच्या ओबीसी नेत्यांवरही टीका केली. 'आमचे ओबीसी नेते बोलत नाहीत, कारण ते या सगळ्यासाठी जबाबदार आहेत,' असे ते म्हणाले.
यावेळी त्यांनी धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांची प्रशंसा केली आणि सोळंके यांच्यावरील हल्ल्याचा संदर्भ देत, 'सुंदरराव सोळंके उपमुख्यमंत्री झाले, तेव्हा तुमची जात आडवी आली नाही का?' असा सवाल केला.
हाके यांनी आपल्या भाषणात देवेंद्र फडणवीस यांच्यावर विश्वास व्यक्त करत, 'आम्ही तुमच्याकडे बघून मतदान केले,' असे सांगितले. महाराष्ट्रातील धनगर समाजाच्या आमदारांच्या कमतरतेवरही त्यांनी बोट ठेवले.
हाकेंच्या या भूमिकेमुळे ओबीसी समाजाच्या मागण्या आता केवळ बैठकांपुरत्या मर्यादित राहणार नाहीत, तर त्या आंदोलनाचे रूप घेऊ शकतात, असे संकेत मिळत आहेत.
येत्या काळात, मराठा आणि ओबीसी आरक्षणांचा संघर्ष अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर, मुंबईत होणाऱ्या या दोन्ही बैठकांचे निकाल आणि लक्ष्मण हाकेंच्या 'संघर्ष यात्रे'ची पुढील पावले महाराष्ट्राच्या राजकारणाला नवी दिशा देतील, यात शंका नाही.












Click it and Unblock the Notifications