मराठा मोर्चा; तीन आमदार जरांगेंच्या समर्थनासाठी आझाद मैदानावर दाखल
मुंबईतील आझाद मैदानावर मराठा आंदोलकांनी मोठी गर्दी केली आहे. मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळावे यासाठी बेमुदत उपोषण सुरू केले आहे. "सगेसोयरे" अध्यादेशाची अंमलबजावणी करावी अशीही त्यांची मागणी आहे. या आंदोलनात आता मागे हटणार नाही, अशी भूमिका जरांगेंनी घेतली आहे. सरकारला आता या विषयावर ठोस निर्णय घेण्याची मागणी आंदोलक करत आहेत.

दरम्यान, जरांगे यांनी उपोषणाची सुरुवात करताच बीड जिल्ह्यातील दोन आमदारांनी तातडीने आझाद मैदानात जाऊन त्यांची भेट घेतली.
बीडच्या आमदारांचा आंदोलनाला पाठिंबा
बीडचे आमदार संदीप क्षीरसागर आणि प्रकाशदादा साळुंके हे मनोज जरांगे पाटील उपोषणाला बसल्यानंतर लगेचच आंदोलनस्थळी पोहोचले. त्यांनी जरांगेंशी चर्चा केली आणि प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया दिली. आमदार क्षीरसागर म्हणाले, "मनोज जरांगे सर्व समाजाला सोबत घेऊन जात आहेत. सरकारने आता यावर ठाम निर्णय घेण्याची हीच योग्य वेळ आहे." आमदार साळुंके यांनीही या आंदोलनाला आपला पाठिंबा जाहीर केला. यापूर्वीही या दोन्ही आमदारांनी जरांगेंच्या आंदोलनांना पाठिंबा दिला होता.
खासदार रवींद्र चव्हाणही आंदोलनात सहभागी
नांदेडचे काँग्रेस खासदार रवींद्र चव्हाण यांनीही मराठा आंदोलनात सहभागी होण्याचे जाहीर केले आहे. त्यांनी या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिले असून, सरकार जाणीवपूर्वक दिरंगाई करत असल्याचा आरोप केला आहे. प्रत्येक नागरिकाला आंदोलन करण्याचा हक्क संविधानाने दिला असून, सरकारने मराठा आरक्षणाचा प्रश्न लवकर मार्गी लावावा अशी मागणी त्यांनी केली आहे.
आझाद मैदान आंदोलकांनी पूर्ण भरल्यामुळे, काही आंदोलकांनी थेट रस्त्यावरच मुक्काम केला आहे. नाशिकसह अनेक जिल्ह्यांतून मोठ्या संख्येने मराठा बांधव मुंबईकडे येत असल्याने आंदोलन अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे. नाशिकहून निघालेले हजारो मराठा बांधव मुंबईकडे रवाना झाले असून, त्यांच्यासाठी रसदही पुरवली जात आहे.












Click it and Unblock the Notifications