15 दिवसांत दोन मराठा नेत्यांवर हल्ले; मनोज जरांगे पाटलांच्या भूमिकेकडे लक्ष, काय होणार?
गेल्या पंधरा दिवसांत महाराष्ट्राच्या राजकीय आणि सामाजिक वर्तुळात मराठा समाजाच्या दोन प्रमुख नेत्यांवर झालेल्या हल्ल्यांनी मोठी खळबळ उडवून दिली आहे. संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड आणि छावा संघटनेचे विजय घाटगे यांच्यावर झालेल्या या हल्ल्यांनंतर मराठा आरक्षणासाठीचा लढा देणारे आणि मराठा समाजाचा आक्रमक चेहरा म्हणून ओळखले जाणारे मनोज जरांगे पाटील यांनी अद्याप कोणतीही आक्रमक भूमिका घेतलेली नाही, ज्यामुळे सर्वांचे लक्ष त्यांच्या पुढील पावलांकडे लागले आहे.

प्रवीण गायकवाडांवरील शाईफेक आणि हल्ला
रविवार, १३ जुलै २०२५ रोजी सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट येथे संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांच्यावर शाईफेक करत हल्ला करण्यात आला. गायकवाड एका कार्यक्रमासाठी अक्कलकोट येथे आले असताना, शिवधर्म प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्यावर हल्ला केला. गायकवाड यांनी गाडीतून उतरताच काही लोकांनी धावत येऊन त्यांच्यावर शाई आणि ग्रीस फेकले. शिवधर्म प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांनी 'संभाजी ब्रिगेड' या नावात छत्रपती संभाजी महाराजांचा एकेरी उल्लेख केल्याने संतापून हा हल्ला केल्याचे सांगितले जाते.
या हल्ल्याप्रकरणी दीपक काटे नावाच्या व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. दीपक काटे हा भाजप युवा मोर्चाचा पदाधिकारी असल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे, मात्र भाजपने हा आरोप फेटाळला आहे. प्रवीण गायकवाड यांनी या हल्ल्यामागे मोठी शक्ती असल्याचा आरोप करत, हा पूर्वनियोजित कट असल्याचं म्हटलं आहे. त्यांनी आपल्या हत्येचा कट असल्याचा आणि यात मोठे नेते गुंतले असल्याचा दावाही केला आहे.
विजय घाटगेंना बेदम मारहाण
प्रवीण गायकवाडांवरील हल्ल्याच्या काही दिवसांनंतर 20 जुलै रविवारी छावा संघटनेचे नेते विजय घाटगे यांना बेदम मारहाण करण्यात आल्याची घटना समोर आली. राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण यांनी विजय घाटगे यांना मारहाण केली. विजय घाटगे यांनी या मारहाणीनंतर संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. त्यांनी अजित पवार यांना डिवचत, "आमच्या निवेदनांना लाथाबुक्क्यांनी उत्तर देत असाल, तर याचा हिशोब होईल," असा इशारा दिला आहे.
मनोज जरांगे पाटलांच्या भूमिकेचे महत्त्व
गेल्या पंधरा दिवसांत मराठा समाजाच्या दोन प्रमुख नेत्यांवर झालेल्या या हल्ल्यांनी राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे. अशा परिस्थितीत, मराठा आरक्षणासाठी निर्णायक लढा देणारे आणि मराठा समाजाचे मोठे आधारस्तंभ मानले जाणारे मनोज जरांगे पाटील यांची भूमिका अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे.
प्रवीण गायकवाडांवरील हल्ल्यानंतर जरांगे पाटलांनी प्रतिक्रिया दिली होती, परंतु त्यात त्यांचा नेहमीचा आक्रमकपणा दिसला नाही, अशी चर्चा आहे. तर, विजय घाटगेंवरील हल्ल्यानंतर त्यांनी फोन करून घाटगेंची चौकशी केल्याची माहिती आहे. मराठा समाजाचे नेतेच हल्ल्याचे लक्ष्य होत असताना, जरांगे पाटील यांनी अजूनही कोणतीही ठाम आणि आक्रमक भूमिका न घेतल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
या घटनांनंतर जरांगे पाटील मराठा समाजाच्या एकजुटीसाठी काय पाऊल उचलतात, हल्लेखोरांवर कठोर कारवाईची मागणी करतात का, किंवा मराठा समाजाला आणखी आक्रमकपणे एकत्र आणतात का, याकडे महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे. त्यांची पुढील भूमिका मराठा समाजाच्या भविष्यातील आंदोलनाची दिशा ठरवेल असे बोलले जात आहे.












Click it and Unblock the Notifications