कोकणातून ठाकरेंच्या सेनेते इनकमिंग; राजन तेली म्हणाले- नारायण राणेंसोबत जाणे ही सर्वात मोठी चूक
विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजले आहे. त्यामुळे महायुती व महाविकास आघाडीकडून जागावाटपाबाबत बैठका सुरू झालेल्या आहेत. अशातच काही ठिकाणी आपल्याला जागा मिळू शकत नाही. म्हणून विविध पक्षातील इच्छुक लोक आता ज्या पक्षाकडून तिकीट मिळू शकते, अशा पक्षाची वाट धरत आहेत. त्यामुळे पक्षांतर करण्याची स्पर्धा सद्या राज्यात सुरू झाल्याचे पाहायला मिळत आहेत. अशातच एक महत्त्वाची बातमी आता कोकणातून समोर येत आहे. ठाकरेंच्या शिवसेनेत कोकणातून भाजपमधील बडे नेते प्रवेश करणार असल्याची माहिती समोर आलेली आहे.
एकीकडे शरद पवार सत्ताधाऱ्यांना धक्क्यांवर धक्के देत आहेत. तर दुसरीकडे आता उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेतही जोरदार इनकमिंग सुरू झाल्याचे दिसत आहे. अशातच भाजप आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांना धक्का देत दोन बडे नेते आज ठाकरे गटात प्रवेश करणार आहेत. त्यामुळे हा महायुतीला 'जोर का झटका'च असणार आहे.

आज सायंकाळी करणार ठाकरे गटात प्रवेश
अजित पवार आणि भाजपला धक्का देत कोकणातील भाजप नेते राजन तेली, सांगोला येथील राष्ट्रवादी काँग्रेसचे दीपक आबा साळुंखे आणि चिंचवडचे मोरेश्वर भोंडवे आज मातोश्रीवर ठाकरे गटात प्रवेश कऱणार असल्याची माहिती समोर आली आहे. कोकणातील भाजपचे नेते राजन तेली हो सावंतवाडी मतदारसंघातील बडे नेते आहेत. ठाकरे गटात प्रवेश केल्यानंतर ते शिंदे गटाचे दीपक केसरकर यांच्याविरोधात विधानसभा निवडणूक लढवणार आहेत. आज (18 ऑक्टोबर) संध्याकाळी 5 वाजता त्यांचा पक्षप्रवेश होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
सांगोला मतदारसंघावर राष्ट्रवादी काँग्रेसने दावा केला होता. परंतु, ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर त्याठिकाणी दीपक आबा सांळुखे हे शहाजीबापू पाटील यांच्या विरोधात मैदानात उतरतील. त्याचबरोबर अजित पवार गटाचे चिंचवडचे मोरेश्वर भोंडवे आणि दीपक आबा साळुंखे यांचा सायंकाळी 6 वाजता पक्षप्रवेश होईल, अशी माहिती मिळत आहे.
नारायण राणे यांच्यासोबत शिवसेना पक्ष सोडून जाणे, ही माझी सर्वात मोठी चूक होती. मी त्यावेळी शिवसेना सोडली नसती तर सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात दीपक केसरकर यांचा राजकीय जन्मच झाला नसता, असे वक्तव्य राजन तेली यांनी केले. तर त्यांनी दीपक केसरकर यांच्यावर निशाणा साधला.
नीतेश राणे हे कुरघोड्या करत असल्याचा आरोप
राजन तेली म्हणाले की, मी भावनेच्या भरात नारायण राणे यांच्यासोबत शिवसेना पक्ष सोडला आणि काँग्रेसमध्ये प्रवेश केला. दीपक केसरकर यांनी पंधरा वर्षात काहीच काम केलं नाही. त्यामुळे दीपक केसरकर यांना उमेदवारी देण्याला माझा विरोध होता. भाजपच्या नेत्यांशी मी याबद्दल बोललो.
भाजपच्या वरिष्ठ नेत्यांबद्दल मला कुठल्याही प्रकारची तक्रार नाही. नारायण राणे यांच्याबद्दल सुद्धा माझं काही म्हणणं नाही. फक्त त्यांचा मुलगा नीतेश राणे त्याचा मतदारसंघ सोडून इतर मतदारसंघांमध्ये कुरघोड्या करत आहे आणि त्याचा त्रास आम्हाला व्हायचा. हे मी अनेकदा सांगितलं, तरी काहीच होत नसल्याने आता मी पुन्हा एकदा ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश करत त्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.












Click it and Unblock the Notifications