मनोज जरांगे यांच्या मेहूण्याची तीन जिल्ह्यांतून तडीपारी; 'या' गंभीर प्रकरणात होते गुन्हे दाखल
मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे यांच्या मेहूण्याला पोलिसांनी तीन जिल्ह्यातून तडीपार केले. जालन्यात वाळू माफिया आणि अट्टल गुन्हेगारांच्या विरोधात प्रशासन ॲक्शन मोडवर आले आहे. वाळू प्रकरणासह इतर गुन्ह्यातील नऊ आरोपींना जालन्यासह बीड, परभणी आणि छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यातून तडीपार करण्यात आले आहे. त्यात मनोज जरांगे पाटील यांचा मेहुणा विलास खेडकर याचाही समावेश आहे.

कुणाविरोधात झाली कारवाई?
जालना पोलिसांनी विलास हरिभाऊ खेडकर, केशव माधव वायभट, संयोग मधुकर सोळुंके, गजानन गणपत सोळुंके, अमोल केशव पंडित, गोरख बबनराव कुरणकर, संदीप सुखदेव लोहकरे, रामदास मसूरराव तौर, वामन मसुरराव तौर यांना तडीपार केले आहे. या आरोपींना तीन जिल्ह्यातून तडीपार करण्यात आले आहे. वाळू माफिया आणि अट्टल गुन्हेगारांवर ही कारवाई करण्यात आली. अंबड उपविभागीय न्याय दंडाधिकारी यांच्या आदेशाने तडीपारीची कारवाई झाली. या आरोपींविरोधात जालन्यातल्या अंबड, घनसावंगी आणि गोंदी पोलीस ठाण्याच्या हद्दीत गुन्हे दाखल आहेत, अशी माहितीही समोर आली आहे.
आंदोलनातील सहा जणांचा सहभाग
मनोज जरांगे यांच्या आंदोलनामध्ये सक्रिय असणार्या जवळपास सहा आरोपींवर परभणी, जालना बीड आणि छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यातून हद्दपारची कारवाई करण्यात आली आहे. सदर आरोपींवरती वाळू चोरी, जीवे मारण्याचा प्रयत्न, अंतरवाली सराटीच्या आंदोलनात केलेली जाळपोळ यासह सरकारी कामात अडथळा आणल्यासंबंधी जालना जिल्ह्यात गुन्हे दाखल आहेत. २०१९ पासून वेगवेगळ्या प्रकरणात हे गुन्हे दाखल आहेत. अंबड उपविभागीय न्यायदंडाधिकाऱ्यांच्या आदेशान्वये ही तडीपारीची कारवाई करण्यात आली असून आणखीही कारवाईचे प्रस्ताव विचाराधीन असल्याची देखील माहिती मिळत आहे.












Click it and Unblock the Notifications