मनोज जरांगेंची मोठी घोषणा, 20 मतदारसंघात उमेदवार देणार; मराठ्यांना त्रास देणाऱ्यांना पायदळी तुडवणार
Manoj Jarange Patil : मनोज जरांगे यांनी 15 ते 20 मतदारसंघांमध्ये विधानसभा निवडणूक लढण्याचे ठरवले आहे. यासाठी त्यांनी मतदारसंघ देखील जाहीर केले. उर्वरित मतदारसंघासाठी चर्चा सुरू असल्याचेही मनोज जरांगे यांनी सांगितले.
आम्ही जिथे शक्ती आहे, तिथेच उमेदवार देण्याचा आमचा प्रयत्न आहे. आपल्या शक्तीप्रमाणे काम करायचे आहे आणि बाकीचे पाडून टाकायचे, असा आमचा निर्णय झाल्याचे मनोज जरांगे यांनी सांगितले.
उद्याच्या बैठकीत उमेदवारांच्या नावाची घोषणा
जरांगे म्हणाले, तीन दिवसांपासून आमची बैठक सुरू आहे. उद्याही बैठक होणार आहे. आम्ही समाजाच्या जोरावर उमेदवार देण्याचे ठरवले आहे. एकूण 25 मतदारसंघावर आज चर्चा झाली. ज्या मतदारसंघाचे नाव येणार नाही, त्यांनी अर्ज मागे घ्यावेत. आज रात्रीतून मतदारसंघ आणि उमेदवार जाहीर करणार आहोत, असेही जरांगे म्हणाले.

मराठ्यांना त्रास देणाऱ्यांना पायाखाली तुडवणार
मनोज जरांगे म्हणाले की, एवढी हीन वागणूक आमच्या समाजाला उभ्या आयुष्यात कुणीही दिलेली नाही. ती वागणूक आम्हाला मिळाली. मी गेल्या कित्येक दिवसांपासून माझ्या घरच्यांपासून दूर आहे. केवळ माझ्या समाजासाठी मी हे करत आहे. नेत्यासाठी आणि पक्षासाठी तुम्ही लेकराची तळमळ विसरू नका. मराठ्यांना त्रास देणाऱ्यांना पायाखाली तुडवल्याशिवाय सोडणार नाही. 4
डोळ्यात अश्रू अन् जरांगेंची भावनिक साद
मनोज जरांगे पुढे बोलताना म्हणाले की, एवढ्या वेळेस समाजाचे लेकरं बना आणि समाजाचे काम करा. आपल्याविरोधात अनेकजण गेले आहेत. आपले हसू करू नका. तर केवळ एवढ्या वेळेस तुम्ही समाजासाठी काम करा आणि आपल्या उमेदवारांना निवडून आणा, असे भावनिक आवाहन मनोज जरांगे यांनी समाज बांधवांना केले आहे. यावेळी जरांगे यांना अश्रू अनावर झाले.
जिथे उमेदवार दिले तिथे विजय नक्की
जरांगे म्हणाले- जेवढे मतदारसंघात आम्ही उमेदवार दिले आहेत. तेथील आमचा उमेदवार आम्ही शक्यतोवर पडूच देणार नाही. एकदा उमेदवार समाजाने दिला आहे, त्यामुळे समाजाच्या उमेदवाराला आमदार आणि खासदार त्या उमेदवाराच्या मागे उभे राहून ते समाजाच्या उपकाराची परतफेड करतात का? हे पाहण्याची वेळ आली आहे. ते आता पक्षाच्या पाठीशी उभे राहतात की पुन्हा पक्षाच्या पाठीशी उभे राहता? हे आम्ही पाहणार असल्याचेही जरांगे म्हणालेत.
समाजाला त्रास देणाऱ्यांना सोडणार नाही
येवला, परळी, जामनेर मतदारसंघात काय करणार असे विचारले असता, जरांगे म्हणाले की, वेळेवर सर्वकाही होईल. आम्ही हळूहळू सर्वकाही उघड करणार. मात्र आमच्या समाजाला त्रास देणाऱ्यांना आम्ही सोडणार नाही. काळजी करणारा मायबाप आहे. हे मराठा बांधवांनी विसरू नका. तुमची काळजी करणारा तुम्ही ओळखा. विचारणारे लाखो भेटतील. पण तुम्ही योग्य काय ते ओळखा.
माझ्या फोनची वाट पाहू नका
जरांगे पाटील म्हणाले की, अर्ज मागे घ्या म्हटल्यावर अर्ज मागे घ्यावा. काही जण माझ्या फोनची वाट पाहतील, पण माझ्या फोनची वाट पाहू नका, माझ्याकडे फोन करायला वेळ नाही. चार-पाच दिवसांपासून कामामध्ये व्यस्त आहे. मी पहाटे पाच वाजता झोपून सकाळी आठ वाजता उठत आहे. त्यामुळे मला फोन करायला वेळ नाही, असे जरांगे म्हणालेत.
आई-बहिणींची रक्त लक्षात ठेवा
अंतरवालीत सांडलेले आई-बहिणींची रक्त लक्षात ठेवा. उमेदवार आणि मतदारसंघावर समाधान माना. आपला नेता आणि पक्षासाठी समाजाला वेठीस धरू नका. आमचा मतदारसंघ लढवावा, असा हट्ट सगळ्यांनी करू नका, अशी भावनिक साद मनोज जरांगे यांनी समाज बांधवांना घातली.
या मतदारसंघात उमेदवार देणार
बीड, मंठा, परतूर, फुलंब्री, वसमत आणि हिंगोली, परभणीतील पाथरी, गंगाखेड पेंडिंग, नांदेडमधील हदगाव लढणार, लोहा कंधार पेंडिंग, तुळजापूर, भूम, परंडा, दौंड आणि पर्वती, पाथर्डी आणि शेवगाव, कन्नड लढवणार पण त्यावर चर्चा सुरू असल्याचे जरांगे यांनी सांगितले.












Click it and Unblock the Notifications