‘आम्हाला आझाद मैदानातून हुसकावून लावलं तर', जरांगेंचा फडणवीसांना सर्वात मोठा इशारा
मराठा आरक्षणासाठी मुंबईच्या आझाद मैदानात आंदोलन करणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला थेट इशारा दिला आहे. "आम्हाला आझाद मैदानातून हुसकावून लावण्याचा प्रयत्न केला, तर गरीब मराठ्यांच्या मनात बदलाची भावना निर्माण होईल," अशी मनोज जरांगे यांनी भूमिका घेतली आहे. या आंदोलनासंदर्भात मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशानंतर जरांगे पाटील यांनी ही भूमिका मांडली.

'सरकारने कोणताही निमित्त काढून आम्हाला हुसकावू नये'
जरांगे पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना उद्देशून म्हटले की, "राज्य सरकारने कोणत्याही समाजावर अन्याय होईल, असे वागू नये. तुम्ही काहीतरी निमित्त काढून मराठ्यांना आझाद मैदानावरून हुसकावून लावू नका. जर तुम्ही पोलिसांना सांगून आम्हाला अटक केली, तर ते घातक असेल. आमच्या आंदोलकांवर लाठीमार केला, तर ते अतिघातक ठरेल." ते पुढे म्हणाले, "जर तुम्ही गरीब मराठ्यांचा अपमान केला, तर त्यांच्या डोक्यात बदला घेण्याची चीड निर्माण होईल. आम्ही मराठ्यांची औलाद आहोत, आम्ही घाबरणार नाही. आम्ही शांत आहोत, आम्हाला शांत राहू द्या, देवेंद्र फडणवीस."
'मी जे बोलतो ते होते...'
"मी जे जे बोलतो, ते ते होत असतं," असे म्हणत जरांगे पाटील यांनी आपल्या मागणीवर ठाम राहण्याचा निर्धार व्यक्त केला. "अद्याप मुंबईत आणखी मराठे यायला सुरुवात झाली नाही. जर शनिवार आणि रविवारच्या सुट्टीमध्ये मराठे मुंबईत आले, तर सोमवारचे आंदोलन खूप प्रभावी असेल. तुम्ही ही वेळ येऊ देऊ नका," असा इशारा त्यांनी दिला. ते पुढे म्हणाले, "तुम्ही जास्त काय कराल? १०० पोलीस आले तरी अटक करणार, १ लाख पोलीस आले तरी अटक करून जेलमध्येच नेणार. आम्ही जेलमध्येही उपोषण करू. पण आता सरकारला सुट्टी नाही."
'न्यायालय आम्हाला न्याय देईल'
सरकारने गरीबांना विसरले, तर न्यायालय त्यांना आधार देते, असे सांगत जरांगे पाटील यांनी न्यायव्यवस्थेवर विश्वास व्यक्त केला. "आम्ही लोकशाहीच्या कोणत्याही कायद्याचे उल्लंघन केलेले नाही. आम्ही शांततेत उपोषण करत आहोत. न्यायालयाचा आदेश आल्यानंतर आम्ही काल रात्री सगळ्या गाड्या बाजूला केल्या. आता मुंबईत कुठेही वाहतूक कोंडी नाही. यापेक्षा कायद्याचे काय पालन करायचं?" असा सवाल त्यांनी केला.
'आम्हाला हटवण्याच्या वल्गना बंद करा'
"सरकारने नको त्या विषयात घुसू नये. आम्हाला आझाद मैदानातून हटवण्याच्या वल्गना बंद करा," अशी मागणीही जरांगे पाटील यांनी केली. "मी मेलो तरी आझाद मैदानातून हटणार नाही. सरकार कोणत्याही थराला गेले, तरी मी त्या थराला जाईन," असा निर्धार त्यांनी व्यक्त केला. "मराठे काय असतात हे पुन्हा एकदा ३५० वर्षांनी बघायचं असेल, तर माझा नाईलाज आहे," असे म्हणत त्यांनी पुन्हा एकदा इतिहासाचा संदर्भ दिला.
जरांगे पाटील यांच्या या भूमिकेनंतर सरकार आता काय पाऊल उचलते, हे पाहणे महत्त्वाचे आहे. न्यायालयाच्या आदेशाचे पालन करत पोलीस आंदोलकांना हटवणार की सामोपचाराने यावर तोडगा काढला जाईल, हे येणाऱ्या काळात स्पष्ट होईल.












Click it and Unblock the Notifications