आतापर्यंत आम्हाला पाणी पाजलं, आता तुम्हालाही पाजतील: मनोज जरांगे
Mumbai: मराठा आरक्षणाच्या आंदोलनामुळे चर्चेत राहीलेला जालना जिल्हा पुन्हा एकदा केंद्रस्थानी आलेला आहे. यावेळी कारण मराठा आरक्षणाच नाही तर ओबीसी आरक्षणाच आहे. ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी जालना जिल्ह्यातील वडीगोद्री येथे उपोषण सुरू केलं आहे. त्यामुळं अवघ्या राज्याच लक्ष पुन्हा एकदा जालना जिल्ह्याकडे लागलं आहे.
दरम्यान, उपोषण मागे घेतल्यानंतर मनोज जरांगे यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. आज (२१ जून) त्यांना रुग्णालयातून डिस्जार्ज मिळाल्यानंतर मनोज जरांगे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी लक्ष्मण हाके यांच्या आंदोलनावरही भाष्य केलं.

जरांगे म्हणाले, आरक्षणाच्या मुद्द्यावरून सरकारने गेली 15-20 वर्षे आम्हाला फसवले, आता तुमच्याबाबतही तेच होईल. आजपर्यंत सरकार आम्हाला पाणी पाजत होते, आता ते तुम्हालाही पाणी पाजतील, असं विधान जरांगेंनी केलं आहे. तसेच आम्ही आंदोलन केलं तर जातीय तेढ आणि ओबीसींनी केलं तर शांतता अशी टीकाही त्यांनी केली आहे.
ओबीसींचे आंदोलन सरकार पुरस्कृत
पुढे बोलताना ते म्हणाले, ओबीसींचे आंदोलन हे सरकार पुरस्कृत आहे. ते म्हणाले, ''आम्ही आंदोलन केलं तर जातीय तेढ नाव दिला जातो, ओबीसींनी केलं तर शांतता असे म्हंटले जाते. शेवटी आंदोलन सरकार पुरस्कृत असल्यावर असेच होते. मराठा समाजावर नेहमीच अन्याय केला जातो'', असेही ते म्हणाले.
आंदोलन म्हटल्यावर शिष्टमंडळ येणारच
सरकारच्या शिष्ठमंडळाने लक्ष्मण हाके यांची भेट घेतली. यावर जरांगे म्हणाले, ''आंदोलन करतायत म्हटल्यावर सरकारी शिष्टमंडळ येणारच. आंदोलन केल्यावर त्यांना यावे लागणारच. पण दोघांचीही सारखीच फजिती होणार, हे ध्यानात ठेवा.
सरकारने 15-20 वर्षे आम्हाला फसवले. आजपर्यंत ते आम्हाला पाणी पाजत होते, आता तुम्हाला पाणी पाजतील'', असा सावधनातेचा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी हाकेंना दिला.
ओबीसी आंदोलनाला विरोध करू नका
जरांगे म्हणाले, ''25 वर्षे मराठा समाजाची फसवणूक केली. कितीही फसवले तरी मी मराठा समाजाला ओबीसीतूनच आरक्षण देणार. गोड बोलून आम्हाला फसवले जात असेल तर आता त्यांना आम्ही डुबवणारच'', असंही मनोज जरांगे यांनी म्हटलय. तसेच ''ओबीसी आंदोलनाला विरोध करू नका. ओबीसी आंदोलक आपले विरोधक नाहीत, असे आवाहन मनोज जरांगे यांनी केले आहे.
काड्या करणाऱ्यांना घरी पाठवणार
चार महिन्यांनी काड्या करणाऱ्यांना घरी पाठवणार असा इशारा मनोज जरांगे यांनी राज्य सरकारला इशारा दिला आहे. आम्ही आता रडत बसणार नाही. सगे सोयऱ्यांची अंमलबजावणी करा ही आमची मुख्य मागणी आहे. आता आंदोलन करणार नाही येत्या निवडणुकीत 288 उभे करु किंवा 288 जणांना पाडू'' असंही जरांगे म्हणाले.












Click it and Unblock the Notifications