Manoj Jarange Patil : मनोज जरांगेंची प्रकृती खालावली, मध्यरात्री उपचार, बीडमध्ये बंदची हाक
Manoj Jarange Patil : मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण दिले जावे, या प्रमुख मागणीसाठी सातत्याने लढा देणारे मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती खालावली आहे. आमरण उपोषणामुळे जरांगे यांची शुक्रवारी मध्यरात्री तब्येत बिघडली. अखेर मंत्री शंभूराज देसाई यांनी उपचार घेण्याची विनंती केल्यावर जरांगे पाटील यांनी मध्यरात्री पावणे दोन वाजता उपचार घेतले.
आमरण उपोषणाचा आजचा 5 वा दिवस
मनोज जरांगे यांच्या आमरण उपोषणाचा आजचा पाचवा दिवस आहे. कालपासूनच जरांगे यांची प्रकृती खालावली होती. यानंतर मोठ्या प्रमाणात लोकांनी त्यांना उपचार घेण्याची विनंती केली होती. त्यानंतर मंत्री शंभूराज देसाई यांनी देखील मनोज जरांगे यांना फोन करुन उपचार घेण्याची केली विनंती केली होती. त्यानंतर जरांगे यांनी उपचार घेतले आहेत. मध्यरात्री पावणेदोन वाजता मनोज जरांगे यांना डॉक्टरांकडून सलाईन लावण्यात आले. मराठा आंदोलक मनोज जरांगे यांच्या उपोषणाचा आजचा पाचवा दिवस होता. यावेळी मध्यरात्री मनोज जरांगे समर्थक आंदोलकांनी त्यांना उपचार घेण्याचा आग्रह केला. या आग्रहानंतर त्यांनी उपचार घेण्यास होकार दिल्याने त्यांच्यावर आता उपचार करण्यात आले आहेत.

जरांगे अचानक खाली बसले
सगेसोयरेच्या अधिसूचनेची अंमलबजावणी करुन मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण द्यावे, या मागणीसाठी मनोज जरांगे अंतरवाली सराटी येथे उपोषणाला बसले आहेत. दरम्यान, त्यांची प्रकृती खालावली आहे. जरांगेंना उपोषणाच्या चौथ्या दिवशी चालणं देखील मुश्कील झालं होतं. सहकाऱ्यांचा आधार घेत ते चालताना दिसत होते. मनोज जरांगे यांना थकवा जाणवतोय. ते स्टेजवरून खाली उतरताना अचानक खाली बसलेले पाहायला मिळाले. यावेळी त्यांना उठता येत नव्हते. दरम्यान, सरकारकडून मनोज जरांगेंना कोणता प्रतिसाद मिळतोय का? याकडे सर्वांचे लक्ष आहे.
जरांगेंच्या समर्थनार्थ बीडमध्ये बंदची हाक
मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला ओबीसीतून सरसकट आरक्षण मिळावे, या मागणीसाठी अंतरवाली सराटी येथे सहाव्यांदा उपोषण सुरू केले आहे. त्यांच्या उपोषणाला संपूर्ण समाजाचे समर्थन आहे. उपोषणाच्या समर्थनार्थ आज शनिवारी (ता.21) बीड जिल्हा बंदची हाक देण्यात आली आहे.
मराठा समाजाला सरसकट ओबीसीतून आरक्षण मिळावे, यासाठी मनोज जरांगे पाटील एक वर्षापासून घरदार सोडून लढा देत आहेत. सुरूवातीला आंदोलन केल्यानंतर सत्तेतील विविध मंत्र्यांनी भेटी देऊन आरक्षण देण्याचा शब्द दिला होता. मुंबईवरील मोर्चावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सगेसोयरेचे अधिसूचना काढून त्याची अंमलबजावणी करण्याचा शब्द दिला होता. यानंतरही उपोषण करण्यात आलेले असून प्रत्येक वेळी मंत्र्यांकडून वेळ मागवून घेतली जात आहे, परंतु शब्द पाळला जात नसल्याचा आरोप करण्यात आला. आता सहाव्यांदा मनोज जरांगे पाटील यांनी अंतिम लढाई उपोषणाच्या माध्यमातून सुरू केली आहे. या उपोषणाच्या पाचव्या दिवशी अखंड मराठा समाजाच्या वतीने शनिवारी बीड जिल्हा बंदची हाक दिली आहे. अत्यावश्यक सेवांना या बंदमधून वगळण्यात आलेले आहे.
जरांगे यांच्या नेमक्या मागण्या काय?
सगेसोयरेच्या अधिसूचनेची अंमलबजावणी करावी, हैदराबाद गॅझेट लागू करावे, सातारा गॅझेट लागू करावे, बॉम्बे गव्हर्नमेंट गॅझेट लागू करावे, मराठा बांधवांवर दाखल करण्यात आलेले गुन्हे सरसकट मागे घ्यावेत, या प्रमुख मागण्यांसाठी जरांगे यांचे पाचव्यांदा उपोषण सुरू झाले आहे. यापूर्वी देखील त्यांनी सातत्याने उपोषण करून सरकारला त्यांच्या मागण्यांची पूर्तता करायला लावली.












Click it and Unblock the Notifications