उपोषणाच्या बाबतीत मनोज जरांगेंचा मोठा निर्णय, सरकारच्या अडचणी वाढणार...
मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली मुंबईतील आझाद मैदानावर मराठा समाजाचे आरक्षण आंदोलन सुरू असून, आज आंदोलनाचा तिसरा दिवस आहे. राज्यभरातून लाखो मराठा बांधव मोठ्या संख्येने मुंबईत दाखल झाले आहेत. आंदोलनाच्या तिसऱ्या दिवशी मनोज जरांगे यांनी सरकारला थेट इशारा देत, उद्यापासून पाण्याच्या एकाही थेंबाला स्पर्श करणार नसल्याचे जाहीर केले आहे. सरकार मागण्यांकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप करत, त्यांनी आता 'आरक्षण मिळेपर्यंत माघार नाही' ही भूमिका अधिक कठोर केली आहे.

सेवाभावाच्या नावाखाली पैसे गोळा करणाऱ्यांवर जरांगेंची नाराजी
जरांगे यांनी आंदोलनादरम्यान मदत करण्याच्या नावाखाली पैसे गोळा करणाऱ्यांवर तीव्र नाराजी व्यक्त केली. ते म्हणाले, "जर कोणी रेनकोट, छत्र्या वाटत असेल तर त्यांना एक रुपया देऊ नका. काही लोकांनी धंदा सुरू केला आहे. माझ्या नावावर पैसे कमवत आहेत. मराठा समाजाने कुणालाही पैसे देऊ नयेत. जे लोक खरंच मदत करत आहेत, ते नावही सांगत नाहीत. गरीब माणसांची सेवा करा. असे लोक ट्रक भरून सामान घेऊन येत आहेत, पण पैसे छापणाऱ्यांची आता दुकाने बंद करा."
उद्यापासून 'कडक उपोषण', सरकारला निर्वाणीचा इशारा
आजच्या सभेत जरांगे पाटील यांनी जाहीर केले की, "मी काल आणि आज पाणी प्यायलो, पण उद्यापासून मी पाणी घेणार नाही. सरकार ऐकत नाहीये, त्यामुळे आता उपोषण अधिक कडक करणार आहे. मराठा तरुणांनी कोणत्याही परिस्थितीत मान खाली घालावी लागेल असे कृत्य करू नये. शांतता राखा, कितीही अन्याय झाला तरी चालेल, पण आरक्षण मिळाल्याशिवाय मी मुंबई सोडणार नाही, हा माझा शब्द आहे."
जरांगे यांनी मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले. ते म्हणाले, "काल मुख्यमंत्र्यांच्या घरी बैठक झाली, तातडीने मार्ग काढण्याचे आदेश दिले, असे ऐकले. मग ज्यांना आदेश दिले, ते मार्ग का काढत नाहीत? उपसमितीला आदेश देऊनही काहीच होत नाहीये. नुसत्या बैठका घेत आहेत, पण आता बैठका खूप झाल्या."
सध्याची परिस्थिती आणि राजकीय घडामोडी
मनोज जरांगे यांच्या या निर्वाणीच्या इशारामुळे सरकारवरचा दबाव प्रचंड वाढला आहे. आझाद मैदानात आंदोलकांची संख्या वाढत असल्यामुळे मुंबईतील वाहतूक व्यवस्था विस्कळीत झाली आहे. राज्याच्या विविध भागांतून आंदोलक येत असल्यामुळे परिस्थिती चिघळण्याची शक्यता आहे.
राजकीय वर्तुळातही या आंदोलनावरून आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी सुरू झाल्या आहेत. भाजपचे आमदार संजय केनेकर यांनी मनोज जरांगे यांना शरद पवार यांचा 'सुसाइड बॉम्ब' म्हटले आहे, तर रितेश देशमुख आणि उद्धव ठाकरे यांसारख्या नेत्यांनी जरांगे यांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे. उद्धव ठाकरेंनी तर आपल्या शिवसैनिकांना आंदोलकांना मदत करण्याचे आवाहन केले आहे.
दुसरीकडे, सरकार चर्चेतून मार्ग काढण्याचा प्रयत्न करत आहे. सरकारने ७/१२ उतारा असणाऱ्या मराठा बांधवांना कुणबी प्रमाणपत्र देण्याच्या प्रस्तावावर विचार करण्याची तयारी दर्शवली आहे. हा प्रस्ताव बीडमधील काही आमदारांनी मांडला होता. यासह, ओबीसी संघटनांनीही जरांगे यांच्या मागणीला विरोध करत, मुंबईकडे कूच करण्याचा इशारा दिला आहे. त्यामुळे, आता मराठा आणि ओबीसी समाज आरक्षणाच्या मुद्द्यावरून आमनेसामने येण्याची चिन्हे आहेत, ज्यामुळे राज्य सरकारची कोंडी आणखी वाढली आहे.
जरांगे यांनी उपोषणाची तीव्रता वाढवण्याचा निर्णय घेतल्यामुळे सरकारला यावर तात्काळ तोडगा काढावा लागणार आहे. अन्यथा, या आंदोलनाचे भविष्यात काय परिणाम होतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.












Click it and Unblock the Notifications