मनोज जरांगे पाटलांनी घेतली 'आर या पार'ची भूमिका; सरकारचं शिष्टमंडळ भेटण्याआधीच केली मोठी घोषणा
अहमदनगर: मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मुंबईच्या दिशेने निघालेल्या मनोज जरांगे पाटील यांनी आता 'आर या पार'ची भूमिका घेतली आहे. अहमदनगर जिल्ह्यात दाखल झाल्यानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेऊन आंदोलनावर ठाम असल्याचे स्पष्ट केले. विशेष म्हणजे, सरकारच्या शिष्टमंडळासोबत चर्चा होण्याआधीच त्यांनी ही भूमिका जाहीर केली.

आज सकाळी 11 वाजता महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि उद्योग मंत्री उदय सामंत यांच्यासह सरकारचे शिष्टमंडळ जरांगे पाटलांना भेटणार होते, मात्र त्यापूर्वीच जरांगे यांनी आपली पुढील दिशा स्पष्ट केली. 'आम्ही मागे हटणार नाही', असे ठामपणे सांगत त्यांनी सरकारसमोर काही मागण्या ठेवल्या आहेत.
आंदोलनावर ठाम, 'एक दिवसाची परवानगी' म्हणजे चेष्टा
पत्रकार परिषदेत बोलताना मनोज जरांगे पाटलांनी पोलिसांकडून मिळालेल्या एक दिवसाच्या परवानगीवर तीव्र नाराजी व्यक्त केली. "एक दिवसाची परवानगी देणे म्हणजे गरीब मराठा समाजाची चेष्टा आहे. सरकारने जाणूनबुजून असे केले आहे, जेणेकरून आंदोलनात काहीच होऊ नये. या अटी आणि शर्ती त्वरित रद्द करा", असे ते म्हणाले.
ते पुढे म्हणाले, "मराठा समाजाने तुम्हाला मने जिंकण्याची संधी दिली आहे. एक दिवसाची परवानगी देऊन तुम्ही त्यांचा अपमान करू नका. जर सरकारने आमच्या मागण्या मान्य केल्या, तर मराठा समाज तुमचे उपकार कधीच विसरणार नाही."
'गोळ्या झाडल्या तरी मागे हटणार नाही'
जरांगे पाटील यांनी यावेळी एक मोठी घोषणा करत 'आर या पार'चा इशारा दिला. "जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होत नाहीत, तोपर्यंत आम्हाला आंदोलन करण्याची परवानगी द्या. भले आमच्यावर गोळ्या झाडल्या तरी आम्ही मागे हटणार नाही. आज रात्री आम्ही निश्चितपणे आझाद मैदानावर पोहोचणार आहोत", असा निर्धार त्यांनी व्यक्त केला.
सरकारचे शिष्टमंडळ आता जरांगे पाटलांची भेट घेऊन त्यांची समजूत घालण्याचा प्रयत्न करणार आहे. मात्र, जरांगे पाटलांनी घेतलेल्या या भूमिकेमुळे सरकारची डोकेदुखी वाढली आहे.












Click it and Unblock the Notifications