मुंबई मोर्चाचा जरांगे पाटलांनी सांगितला प्लॅन; फडणवीसांचा मराठा-ओबीसी दंगली घडवण्याचा 'खटाटोप'?
Manoj Jarange Patil on mumbai maratha march fadnavis : मराठा आरक्षणासाठी लढा देत असलेले मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा आक्रमक पवित्रा घेतला आहे. आगामी 29 ऑगस्ट रोजी मुंबईत मराठा समाजाच्या वतीने मोठा मोर्चा काढण्यात येणार असून, जरांगे पाटील यांनी या मोर्चासाठी राज्यभरातील मराठा बांधवांना मुंबईत येण्याचे आवाहन केले आहे. या मोर्चातूनच 'ओबीसी' प्रवर्गातून आरक्षण मिळवण्याचा त्यांचा निर्धार आहे.
फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप!
मनोज जरांगे पाटील यांनी या निमित्ताने राज्य सरकार आणि विशेषतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. "राज्यात जर मराठा आणि ओबीसी समाजामध्ये दंगल घडली, तर त्याला पूर्णपणे देवेंद्र फडणवीस जबाबदार असतील," अशा कठोर शब्दांत त्यांनी मुख्यमंत्र्यांना इशारा दिला आहे.

'मराठ्यांसाठी नाही, तर ओबीसींसाठी लढणार'
मनोज जरांगे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. "देवेंद्र फडणवीस ओबीसींच्या हक्कांसाठी लढणार आहेत, याचा अर्थ ते मराठ्यांसाठी लढणार नाहीत," असे जरांगे पाटील म्हणाले. संवैधानिक पदावर बसलेल्या व्यक्तीने एका समाजासाठी लढणार असल्याचे सांगणे चुकीचे आहे, असा त्यांचा दावा आहे.
जरांगे यांनी साताऱ्यात केले मार्गदर्शन !
पश्चिम महाराष्ट्राचा दौरा करताना जरांगे यांनी सातारा जिल्ह्यातील फलटण येथे मराठा बांधवांना संबोधित केले. यावेळी त्यांनी, मुख्यमंत्री फडणवीस मराठा आणि ओबीसी समाजात वाद निर्माण करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप केला. ते म्हणाले की, सरकार 29 ऑगस्टला मराठा आरक्षण कसे देत नाही, ते मी पाहतो. पश्चिम महाराष्ट्रातून मोठ्या संख्येने समाज बांधव मुंबईतील मोर्चाला उपस्थित राहतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
'राजकीय नेते मराठ्यांना संपवायला निघाले'
जरांगे पाटील यांनी मराठा नेत्यांवरही टीका केली. "मराठ्यांच्या मंत्र्यांना घोटाळ्यात क्लीन चिट मिळत नाही, त्यामुळे त्यांचे नाव खराब होत आहे. सर्वच पक्षातील मराठा नेते एकमेकांना संपवायला निघाले आहेत," असे ते म्हणाले. यासोबतच, त्यांनी "देवेंद्र फडणवीस हे भाजप संपवायला निघाले आहेत," असेही म्हटले.
दंगली घडवण्याचा 'खटाटोप'
मराठा आणि ओबीसी समाजांमध्ये दंगल घडवण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोपही जरांगे यांनी केला. "ओबीसी बांधवांना गोव्याला बोलावून त्यांच्या मनात मराठ्यांविरोधात द्वेष भरला जात आहे. मात्र, दोन्ही समाज एकत्र येऊन फडणवीस यांना धडा शिकवतील," असा विश्वास जरांगे यांनी व्यक्त केला. तसेच, मराठा-ओबीसी दंगल घडल्यास त्याचा फटका केंद्र सरकारलाही बसेल, असा इशाराही त्यांनी दिला आहे.












Click it and Unblock the Notifications