Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

भाजपच्या उमेदवारांना पाडू नको तर काय डोक्यावर घेऊन नाचू का?; मनोज जरांगेंचा सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल

Manoj Jarange Patil Special Interview for OneIndia Marathi मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे यांनी विधानसभा निवडणुकांमध्ये उमेदवार उभे करण्याची घोषणा केली आहे. काही ठिकाणी आम्ही लढणार आहोत तर काही ठिकाणी पाडणार आहोत, असं मनोज जरांगे यांनी जाहीर केलं आहे. त्याआधी नारायणगडावर झालेल्या त्यांच्या दसरा मेळाव्यालाही प्रचंड गर्दी झाली होती. या पार्श्वभूमीवर आंतरवाली सराटी या गावात वन इंडिया मराठीने मनोज जरांगे यांची खास मुलाखत घेतली.

महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यामध्ये तुमचं लक्ष्य नेमकं कोण आहे? या प्रश्नाचं उत्तर देताना मनोज जरांगे यांनी भाजप आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टीका केली. देवेंद्र फडणवीस यांनी खूप मराठ्यांची मनं दुखावली आहेत. निवडणुकीच्या मतदानात याचा भयानक उद्रेक होणार आहे. भाजपसोबत असणारे मराठे लोकही त्यांना मतदान करणार नाहीत. शेतकरी तर मुळीच करणार नाही, असा इशारा मनोज जरांगे यांनी दिला आहे.

Manoj Jarange Patil

या निवडणुकीत तुम्ही भाजपच्या उमेदवारांना पाडणार आहात का? या प्रश्नावर, 'त्यांना पाडू नको तर मग काय त्यांना डोक्यावर घेऊन नाचू का?' असा सवाल त्यांनी केला. आमचा लढा सत्ताधाऱ्यांच्या विरोधात आहे, असंही त्यांनी सांगितलं.

म्हणून फडणवीसांवर आमचा राग

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मराठा जातीचे आहेत म्हणून तुम्ही त्यांच्यावर टीका करत नाही आणि देवेंद्र फडणवीस ब्राह्मण आहेत म्हणून तुम्ही त्यांच्यावर टीका करता का? असाही प्रश्न आम्ही मनोज जरांगे यांना विचारला. त्यावर मनोज जरांगे यांचं उत्तर होतं, 'असं काहीही नाही. आम्ही ब्राह्मण लोकांना देव मानतो पण देवेंद्र फडणवीस यांनी आमच्या आंदोलकांवर लाठीमार करण्याचे आदेश दिले, आमचं आंदोलन चिरडायचा प्रयत्न केला म्हणून त्यांच्यावर आमचा राग आहे.

फडणवीसांनी संपूर्ण मराठा समाजाला खुन्नस दिली

देवेंद्र फडणवीस यांनी संपूर्ण मराठा समाजाला खुन्नस दिली आहे. मराठा समाज आरक्षण मागतो आहे पण त्यांना आरक्षण मिळूच द्यायचं नाही, असा त्यांचा डाव आहे. याउलट ओबीसींमध्ये त्यांनी आणखी 17 जातींचा समावेश केला. त्यामुळे आम्ही चिडलो आहोत. आता आमचाही नाईलाज आहे. जे आमची जिरवायला निघाले आहेत त्यांची आम्ही जिरवणार, असं मनोज जरांगे यांनी ठासून सांगितलं.

छगन भुजबळ यांच्यावरही साधला निशाणा

मनोज जरांगे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांच्यावरही जोरदार टीका केली आहे. महाराष्ट्रात ओबीसी विरुद्ध मराठा अशी दुफळी माजवून अशांतता निर्माण करायची हे त्यांचं स्वप्न होतं पण आम्ही तसं होऊ दिलं नाही, असं मनोज जरांगे म्हणाले. मराठा आणि ओबीसी समाजातले वरचे नेते समाजात तेढ माजवायचा प्रयत्न करतात पण गावखेड्यामध्ये आम्ही सगळे एक आहोत. मराठ्यांचं ओबीसींशिवाय धकत नाही आणि ओबीसींचं मराठ्यांशिवाय धकत नाही, असंही त्यांनी आवर्जून सांगितलं.

मनोज जरांगे यांनी आता आपल्या आंदोलनाचं स्वरूप व्यापक केलं आहे. विधानसभा निवडणुकीसाठी त्यांच्याकडून इच्छुक असलेल्या उमेदवारांमध्ये फक्त मराठाच नव्हे तर ओबीसी, दलित आणि मुस्लीम उमेदवारही आहेत. मराठा आरक्षण आंदोलनात महिलांचाही मोठा सहभाग आहे. मग तुम्ही उमेदवारांमध्ये महिलांनाही प्रतिनिधित्व देणार का? असा प्रश्नही आम्ही त्यांना विचारला. त्यावर, आम्ही महिलांनाही प्रतिनिधित्व देणार आहोत, असं मनोज जरांगे यांनी सांगितलं.

शिंदे-पवार-जरांगे समीकरणावर एकाच वाक्यात उत्तर

महाराष्ट्रामध्ये शरद पवार, एकनाथ शिंदे आणि मनोज जरांगे यांचं राजकीय समीकरण जुळतं आहे, अशी चर्चा आहे. त्यात किती तथ्य आहे? या प्रश्नांचं उत्तर मनोज जरांगे यांनी मोजक्या शब्दांत दिलं. 'अशा चर्चा होतच असतात. त्यावर विश्वास ठेवू नका', असं ते म्हणाले.

मराठ्यांना ओबीसींमधूनच आरक्षण द्या, अशी मनोज जरांगे यांची प्रमुख मागणी आहे. महाराष्ट्रात याआधीच 52 टक्के आरक्षण आहे. आरक्षणाची मर्यादा 50 टक्क्यांच्या वर गेली तर ते टिकणारच नाही. त्यामुळे मराठ्यांसाठी वेगळ्या आरक्षणाचा आम्हाला काही उपयोगच नाही, असं मनोज जरांगे यांचं म्हणणं आहे. मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्रं मिळालं तर ते ओबीसींच्या वर्गात येतात आणि मग त्यांना आरक्षण मिळू शकतं. म्हणूनच मराठ्यांना सरसकट कुणबी प्रमाणपत्रं द्या, अशी आमची मागणी आहे, असं मनोज जरांगे यांनी पुन्हा एकदा सांगितलं.

सरकारने शैक्षणिक संस्था आणि सरकारी नोकऱ्यांमध्ये मराठ्यांना 10 टक्के आरक्षण दिलं आहे. पण अशा आरक्षणाचा आम्हाला फार काही फायदा होणार नाही. सरकार आरक्षणाबद्दल अधिसूचना काढतं पण त्याची अमलबजावणी होत नाही. त्यामुळेच आमची वारंवार फसवणूक होते याची आठवण मनोज जरांगे यांनी करून दिली.

जोपर्यंत आरक्षण मिळत नाही तोपर्यंत माझा लढा सुरूच राहणार

मराठा समाजाला आरक्षण दिलं तर मग देशभरात वेगवेगळ्या समाजांची आरक्षणासाठीची मागणी जोर धरेल. जाट, गुज्जर या समुदायांनाही आरक्षण हवं आहे. मग हा तिढा सोडवायचा कसा? यावर मनोज जरांगे म्हणाले, 'जेव्हा मराठा समाज आरक्षणाची मागणी करतो तेव्हा मात्र तो तिढा असतो. पण ओबीसींच्या आरक्षणात आणखी 17 जाती घातल्या तेव्हा तो तिढा नसतो का?' आम्हाला शिक्षणामध्ये आरक्षण हवं आहे. गोरगरीब मराठा समाजातल्या मुलामुलींना चांगल्या संधी हव्या आहेत, असं मनोज जरांगे यांनी ठासून सांगितलं.

जोपर्यंत आरक्षण मिळत नाही तोपर्यंत माझा लढा सुरूच राहणार आहे. आरक्षणासाठी मी प्रामाणिकपणे लढतो आहे म्हणूनच लाखो मराठ्यांचा माझ्यावर विश्वास आहे, असंही मनोज जरांगे म्हणाले. कुणी कितीही विरोध केला तरी मी प्राणपणाने मराठा आरक्षणासाठी लढत राहणार, असा निर्धारही त्यांनी व्यक्त केला.

More From
Prev
Next
Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+