मग ठरवलं सलाईन लावून उपोषण करण्यात अर्थ नाही! काल रात्री 12 वाजता काय घडलं? वाचा- जरांगे काय म्हणाले
जालना - मराठा आरक्षणकर्ते मनोज जरांगे यांचे उपोषण पाचव्या दिवशी स्थगित झाले आहे. सलाईन चढवून उपोषणात अर्थ नाही, विरोधकांचा बंदोबस्त करणार असे मनोज जरांगे यांनी म्हटलं आहे. पण काल रात्री बारावाजता काय घडलं हेही मनोज जरांगे यांनी सांगितलं.
मराठा समाजाच्या भल्यासाठी..
मनोज जरांगे हे मराठा समाजाच्या भल्यासाठी, न्याय मागण्यांसाठी सतत उपोषण करीत आहेत. यामुळे त्यांच्या प्रकृतीही बिघडत आहे. त्यामुळे त्यांच्यावर सलाईन लावण्याची आणि उपचार घ्यावे लागत आहेत. पण मनोज जरांगे उपोषणादरम्यान सलाईन लावण्यास नकार देत आहेत. त्यामुळे सलाईन लावा, उपचार घ्या अशी भावना मराठा समाजबांधवांची होती.

काल रात्री हे घडलं.
उपोषणादरम्यान सलाईन लावावे, उपचार घ्यावे म्हणून गावातील समाजबांधव आणि समस्त मराठा समाज त्यांना सलाईन लावण्याचा आग्रह काल करीत होते. हा प्रसंग सांगताना जरांगे यांनी मराठा समाजाची भावना कथन केली. तुम्ही असाल तर मराठ्यांची एकजूट राहील. तुम्ही नसाल तर मराठ्यांची एकजूट टिकणार नाही. असा आग्रह मला करुन करुन त्यांनी मला माझा निर्णय मागे घ्यायला लावला. काल रात्री बारावाजता समस्त बांधव माझ्याजवळ बसून होते, त्यांचा मोठा आग्रहही होता. त्यामुळे मी हा निर्णय घेतला, असं जरांगे यांनी सांगितलं.
हातपाय दाबून सलाईन लावली
मराठा आंदोलनकर्ते मनोज जरांगे म्हणाले, मला हातपाय दाबून सलाईन लावली. त्यांची माया आहे, म्हणून त्यांनी तसे केले. माझे कुणीही ऐकले नाही. आता सलाईन लागलीच आहे, तर आता उपयोग नाही. सलाईन ही जेवणासारखीच आहे. त्यामुळे आता उपोषणाची मानसिकता राहिली नाही. सलाईन लावली म्हणजे उपोषणाला आता अर्थ नाही.
सरकारची दमछाक कमी होईल. आता उपोषण सोडून लोकांमध्ये जाणार आहे. मी उपोषण करायला तयार आहे. मात्र, गावकऱ्यांनी उपचार घेण्यासाठी पाणी पिण्यासाठी किंवा सलाईन लावण्यासाठी आग्रह करायचा नाही. विना उपचार घेता आणि सलाईन न लावता मी मरेपर्यंत उपोषण करायला तयार आहे. सलाईन लावून मी उपोषण करायला तयार नाही.
बसण्यापेक्षा बंदोबस्त करु
जरांगे यांनी हेही सांगितलं की, समाजाचा आग्रह आहे की, मी सलाईन लावावे , उपचार घ्यावे तर सलाईन चढवून उपोषण करण्यात अर्थ नाही असं मला वाटतं, चार महिने लेट भेटेल पण तुम्ही हवेत...मग मी ठरवलं येथे पडून राहण्यात काहीच अर्थ नाही. सरकारचा ज्या सत्तेत जीव आहे, त्याविरोधात तयारी करु.
जरांगे म्हणाले, अंतरवालीत सलाईन घेत उपोषण करुन इथे पडून न राहता एक दोन दिवस उपचार घेऊन डाॅक्टर जे म्हणतील ते उपचार घेऊ. दुपारी बाराच्या आत मी उपोषण मागे घेत आहे. त्यानंतर मतदारसंघ, कार्यक्रम, सभा आहेत त्या घेऊ. कुणाला पाडायचे , कोण त्यांचा मंत्री विरोधात बोलतो त्याचा बंदोबस्त लावणे गरजेचे आहे.
सरकारला 13 ऑगस्टपर्यंत अल्टीमेटम
दरम्यान मनोज जरांगे पाटील पुढे बोलताना म्हणाले की, मी माझ्या मनातून आंदोलन स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे. सलाईन घेऊन शरीराला काही होत नाही, असे आंदोलन करण्यात काही हरकत नाही. शंभूराज देसाई यांनी दोन महिन्याचा वेळ मागितला होता, तो आम्ही देत आहोत, 13 ऑगस्टपर्यंत सरकारला वेळ दिला आहे. आज दुपारी गावातील महिलांना हाताने पाणी पिऊन मी माझे उपोषण स्थगित करणार, असं मनोज जरांगे पाटील यांनी माध्यमांना सांगितलं आहे.












Click it and Unblock the Notifications