छगन भुजबळांना आता सुट्टी नाहीच, मनोज जरांगे संतापले
Mumbai: छगन भुजबळ यांनी आधी मराठा आणि ओबीसीत वाद निर्माण केला. ते आता मराठा आणि धनगर समाजात वाद निर्माण करत आहे. दोन्ही समाजात द्वेष निर्माण करण्याचं काम भुजबळांकडून सुरू आहे. आम्ही हे खपवून घेणार नाही.
त्यामुळे आता छगन भुजबळ यांना सुट्टी नाही, असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी भुजबळांना दिला आहे. माध्यमांशी संवाद साधताना मनोज जरांगे पाटील यांनी राज्याचे मंत्री छगन भुजबळ यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला.

भुजबळांनी दोन पालकमंत्री जवळ ठेवले
पुढे जरांगे म्हणाले, ''ओबीसींच्या इतर नेत्यांनी तरी असा जातीयवाद करू नये. भुजबळांना धनगर आणि गरीब मराठ्यात वाद निर्माण करायचा आहे. संविधानाच्या पदावर बसलेल्या माणसाला साडेचारशे जाती महत्त्वाच्या की महाराष्ट्र महत्त्वाचा आहे? हे मी तुम्हाला सांगितलं पाहिजे का? भुजबळांनी दोन पालकमंत्री जवळ ठेवले आहेत.
आम्हाला काही फरक पडत नाही. वेळेला आम्ही दाखवून देऊ. छगन भुजबळ विनाकारण मराठ्याच्या विरोधात जात आहे'', असे अनेक आरोप जरांगे यांनी भुजबळांवर केले आहेत.
आमच्या ताटातलं परत द्या
यापूर्वी प्रकाश आंबेडकर यांनी आरक्षणावर भाष्य केलं होत. ओबीसी आणि मराठा आरक्षणाच ताट वेगळं हवं असे त्यांनी म्हटल होतं. यावर बोलताना जरांगे म्हणाले, आमच्या ताटातलं कुणी काढू नये. आमच्या ताटातलं आम्हाला परत द्या. आमच्या ताटातलं हिसकावून घेऊन पळाले. अंधारात घेऊन पळाले.
छगन भुजबळांनी किती विरोध केला तरी एकाही जातीच्या अंगावर जायचं नाही. एकटे भुजबळ हे करत आहेत. जातीयवाद करणं, वैयक्तिक मुद्द्यात घुसणं, या मागे भुजबळ आहेत, असा आरोप त्यांनी केला.
मराठ्यांचा दोष काय?
जरांगे पुढे म्हणाले की, मराठ्यांचा नेमका काय दोष आहे? भाऊ आहात म्हणता ना? भुजबळांनी मोठं मन करायला हवं होतं. ते मराठ्यांचेही नेते झाले असते. एकट्या येवल्यावाल्याचं ऐकून सरकारने वागू नये. नाही तर हाल होतील, असा निर्वाणीचा इशारा जरांगे यांनी सरकारला दिला.
बलिदान द्यायला मागेपुढे पाहणार नाही
आरक्षणासाठी बलिदान देण्याची वेळ आली तरी घाबरणार नाही असे म्हणत मराठा समाजावर अन्याय होऊ देणार नाही असे जरांगे यांनी यावेळी स्पष्टपणे सांगितले. पुढे ते म्हणाले, 'मी समाजावर अन्याय होऊ देणार नाही. वेळेप्रसंगी मी बलिदान देण्याची वेळ आली तरीही मी घाबरणार नाही.
मी कोट्यवधी मराठा समाजाची बाजू घेत आहे. माझा समाज माझ्या पाठीशी आहे. गोरगरीब मराठा समाजाची पोरं मोठं झाली पाहिजेत यासाठी मी लढत आहे. मराठा समाज एकत्र आला आहे, यामुळे यांचे पोट दुखत असल्याची प्रतिक्रिया जरांगे यांनी दिला.












Click it and Unblock the Notifications