'२९ ऑगस्टला मुंबईला जाणार आणि ओबीसीतूनच आरक्षण घेणार'; जरांगेंची मोठी घोषणा
मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) मनोज जरांगे यांनी 'चलो मुंबई'ची हाक दिल्यानंतर आता त्यांनी आपला निर्धार अधिक स्पष्ट केला आहे. लातूरमध्ये माध्यमांशी बोलताना ते म्हणाले की, "कुणीही आडवं आलं तरी २९ ऑगस्टला मुंबईला जाणार आणि ओबीसीतूनच आरक्षण घेणार." सरकारने मागण्या मान्य केल्यास त्यांचे गुलाल लावून आभार मानू, अन्यथा मुंबईतून मागे हटणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.

जरांगे यांचा सरकारला इशारा
मनोज जरांगे सध्या मुंबई मोर्चाच्या नियोजनासाठी राज्यभर बैठका घेत आहेत. लातूरमध्ये त्यांच्या भेटीसाठी पालकमंत्री प्रताप सरनाईक आले होते. त्यांनी मराठा समाजाच्या मागण्या मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवण्याचे आश्वासन दिले.
यावर प्रतिक्रिया देताना जरांगे म्हणाले, "आम्ही शांततेत मुंबईला जाणार आहोत. सरकारने आम्हाला आरक्षण दिले तर त्यांचे आभार मानू. पण मागण्या पूर्ण झाल्या नाहीत तर आझाद मैदानावर बसून आरक्षणाची लढाई लढू आणि ओबीसीतून आरक्षण घेऊनच परत येऊ."
फडणवीसांवर टीकास्त्र
यावेळी मनोज जरांगे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टीका केली. ते म्हणाले, "माणूस किती दलबदलू असावा याचं जिवंत उदाहरण म्हणजे देवेंद्र फडणवीस. त्यांनी सत्तेच्या गैरसमजातून बाहेर यावे. तुम्ही एखाद्याला हात लावून दाखवा, मग आम्ही सांगतो."
फडणवीसांनी मराठा समाजाला फसवल्याचा आरोपही त्यांनी केला. धनगर समाजाला जसे फसविले, त्याच पद्धतीने मराठ्यांनाही फसवत असल्याचा दावा जरांगे यांनी केला. तसेच, काही लोक पाळून ते मराठ्यांच्या विरोधात बोलत असल्याचा आरोपही त्यांनी केला.
'चलो मुंबई' मार्गात बदल
मुंबई मोर्चाच्या मार्गात काही बदल करण्यात आल्याची माहितीही जरांगे यांनी दिली. आता अंतरवाली सराटी येथून मोर्चा पैठणमार्गे पुढे जाईल. त्यानंतर शिवनेरीवर मुक्काम करून चाकणमार्गे वाशी आणि नंतर आझाद मैदानावर पोहोचणार असल्याचे त्यांनी सांगितले.












Click it and Unblock the Notifications