'भुजबळ म्हणजे येवल्याचा अलीबाबा'; जरांगे पाटलांचा हल्लाबोल, ओबीसींचं वाटोळं त्यांनीच केल्याचा आरोप!
Manoj Jarange Attack on Chhagan Bhujbal : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलन करणारे नेते मनोज जरांगे पाटील यांनी सोमवारी (६ ऑक्टोबर) पुन्हा एकदा ओबीसी नेत्यांवर जोरदार टीकास्त्र सोडले.
कॅबिनेट मंत्री छगन भुजबळ यांचा थेट उल्लेख त्यांनी 'येवल्याचा अलीबाबा' असा केला. विजय वडेट्टीवार ओबीसी आरक्षणाबद्दल जे काही बोलत आहेत, ते छगन भुजबळांचेच शब्द आहेत. या लोकांनीच ओबीसींच्या खऱ्या जाती संपवल्या आणि त्यांचा खरा घात केला आहे, असा गंभीर आरोप जरांगे पाटील यांनी केला.
छत्रपती संभाजीनगर येथील एका खासगी रुग्णालयात उपचार घेत असताना जरांगे यांनी आज पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी ओबीसी आरक्षणाच्या मुद्यावरून काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार, राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री छगन भुजबळ, तसेच धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांच्यावर निशाणा साधला.

ओबीसींचा खरा घात ओबीसींच्या नेत्यांनीच केला
विजय वडेट्टीवार यांनी नुकतेच जरांगे यांना उद्देशून 'ओबीसीतील ३७५ जातींना एकदा संपवूनच टाका' असे विधान केले होते. या विधानाचा समाचार घेताना जरांगे म्हणाले की, "विजय वडेट्टीवार ओबीसींच्या ३७५ जाती असल्याचा दावा करतात, पण त्यांनीच ओबीसींच्या खऱ्या जाती संपवल्या आहेत. ओबीसी गरिबांनी यावर चिंतन केले पाहिजे. या लोकांनी ओबीसींना खोटे आणि बोगस आरक्षण दिले.
मराठ्यांचे आरक्षण दिले
१६ टक्के आरक्षण मराठ्यांच्या हक्काचे होते, ते त्यांना देण्यात आले. याचा अर्थ ओबीसींची खरी फसवणूक ही 'येवल्याच्या अलीबाबाने' आणि काँग्रेसच्या वडेट्टीवार अथवा त्यांच्या पूर्वाश्रमीच्या नेत्यांनी केली, असे जरांगे म्हणाले.
मंडल आयोगावर भाष्य
मंडल आयोगाने ओबीसींना १४ टक्के आरक्षण दिले होते, त्यानंतर १६ टक्के आरक्षण मराठ्यांचे असल्याचे माहीत असतानाही त्यांना देण्यात आले. यामुळे ओबीसींची फसवणूक ओबीसींच्याच नेत्यांनी केली हे स्पष्ट होते.
शरद पवारांवर टीका
शरद पवारांनी १९९४ साली १६ टक्के आरक्षण देऊन आमचे वाटोळे केले, पण या लोकांनी (ओबीसी नेते) त्यांचेही म्हणजेच पवारांचे उपकार ठेवले नाहीत, असेही ते म्हणाले.
वडेट्टीवार यांच्या तोंडी भुजबळांची भाषा
विजय वडेट्टीवार जे बोलत आहेत, ते सगळे 'येवल्याच्या नेत्याचे' (छगन भुजबळ) शब्द आहेत. हे शब्द आता परळीच्या टोळीने घेतले आहेत आणि त्यांना नवीन 'भिडू' भेटला आहे, असे जरांगे म्हणाले.
दंगल घडवण्याचा आरोप
"हे लोक तलवार, दांडे, कोयते आणि बंदुकीची भाषा करत आहेत. त्यांना जातीय दंगली घडवून आणायच्या आहेत. हा त्यांचा प्रयोग आहे," असा गंभीर आरोप जरांगे यांनी केला.
ओबीसींना पणाला लावले
"ओबीसींना आमच्याविषयी थोडाही धाक नाही, कारण आम्ही उलट्या काळजाचे नाहीत. पण या लोकांनी आपल्या राजकीय स्वार्थासाठी ओबीसींनाच पणाला लावले आहे. या लोकांनी ओबीसींना संपवण्याचा चंग बांधला आहे," असेही जरांगे म्हणाले.
मुंडे भावंडांवर अप्रत्यक्ष टीका
धाराशिवमध्ये व्हायरल झालेल्या एका व्हिडिओवरून जरांगे यांनी धनंजय आणि पंकजा मुंडे यांच्यावरही टीका केली. एका व्हिडिओमध्ये दुचाकीवरील दोघेजण पुरात वाहत असताना ते एका विशिष्ट जातीचे असल्यामुळे त्यांना वाहून जाऊ द्या, असे काहीजण म्हणताना दिसून आले होते. असे म्हणणारे भावनाशून्य लोक असतील. आम्ही एवढ्या भावना सोडल्या नाहीत. आम्ही असे करूच शकत नाही. यांचेच (मुंडे) कुणीतरी असतील," असे जरांगे म्हणाले.
गुलामीचे गॅझेट
"हे लोक दुसऱ्यांना निजामाच्या औलादी म्हणतात, दुसऱ्या जिल्ह्यांतून लोक आणून वातावरण खराब करतात आणि दुसऱ्यांना गुलाम समजतात. गुलामीचे गॅझेट म्हणून उल्लेख करतात. हा जातीयवाद आम्ही नव्हे, तर या लोकांनी वाढवला," असे जरांगे यांनी स्पष्ट केले.
आंदोलकांकडे लक्ष द्यायला सरकारला रोग आला आहे का?
सरकारच्या कार्यपद्धतीवर प्रश्न उपस्थित करताना जरांगे यांनी शेतकऱ्यांच्या नुकसानीकडे आणि उपोषणकर्त्यांकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप केला. "इथे शेतकऱ्यांचे मोठे हाल सुरू आहेत, पण सरकार केवळ सभा घेत आहे, हारतुरे लावते, आलिशान विमानाने येतात-जातात. शेतकरी इकडे उद्ध्वस्त झाला आहे."
सिल्लोडला सरपंच उपोषणाला बसले आहेत, धाराशिवला अमोल जाधव बसला आहे, करमाळ्याची ताई उपोषणाला बसली आहे, पण त्यांच्याकडे लक्ष द्यायला सरकारला वेळ नाही. "हे लोक आंदोलने व उपोषणे करून मरत आहेत. त्यांचे म्हणणे ऐकून घ्यायला सरकारला रोग आला आहे का?" असा संतप्त सवाल जरांगे यांनी उपस्थित केला.












Click it and Unblock the Notifications