"गुलामीचं गॅझेट म्हणता, मग तुमच्या घरात इंग्रज होते का?; जरांगेंचा नारायणगडावरून मुंडे बंधूंना सवाल
Manoj Jarange Targets Pankaja and dhananjay Munde : बीड जिल्ह्यातील नारायणगडावर आयोजित दसरा मेळाव्यात मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे यांनी आजारपणातही उपस्थिती लावून मराठा समाजाला भावनिक साद घातली, तसेच राजकीय नेत्यांवर, विशेषतः मुंडे बंधूंवर आणि मराठा आरक्षणाला विरोध करणाऱ्यांवर, जोरदार हल्लाबोल केला. जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला 'गुलाम' म्हणणाऱ्यांना परखड सवाल विचारत, आता निवडणुकीत बदला घेण्याचे थेट आवाहन केले.

गुलामीच्या गॅझेटवरून मुंडे बंधूंवर अप्रत्यक्ष निशाणा
राज्याच्या मंत्री पंकजा मुंडे यांच्या एका वक्तव्याचा संदर्भ घेत मनोज जरांगे यांनी आपल्या भाषणाला धार दिली. मराठा आरक्षण लागू झाल्यानंतर आम्हाला 'गुलाम', 'गुलामीचं गॅझेट लागू केलं' असे म्हणणाऱ्यांवर त्यांनी टीका केली.
जरांगे यांनी थेट विचारले, "आमचं गुलामांचं गॅझेट म्हणता, मग इंग्रज काय तुमच्या घरचे होते का? मग इंग्रजांनी केलेल्या १९३१ च्या जनगणनेच्या आधारे आरक्षण का घेता?"
यावेळी त्यांनी अप्रत्यक्षपणे पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांना टोला लगावला. "आमच्या पोराबाळांचा पाणउतार करण्यासाठी, जातीचा अपमान करण्यासाठी यांना ३० वर्षे निवडून दिले का?" असा संतप्त सवाल त्यांनी केला.
गुलाम म्हणणाऱ्यांसाठी काम कशाला?
मराठा समाजाला गुलाम समजणाऱ्या नेत्यांसोबत काम करणाऱ्या मराठा बांधवांना त्यांनी खडे बोल सुनावले. "तुम्ही मराठ्यांच्या पैदाशी कोण कोण आहेत? तुमच्या जातीला गुलामीची औलाद म्हणाले, त्यांचा प्रचार करतो काय? पाच-दहा लाखांसाठी कशाला चाटता? आम्ही जर गुलाम आहोत, तर मराठ्यांनो त्यांच्याकडे कशाला काम करता? कशाला कुणाच्या पायाखाली काम करता?" असा भावनिक आणि कठोर प्रश्न त्यांनी उपस्थित केला.
'बिघडलेल्या रक्ताचे' नाहीत, पण मापात राहा!
राजकीय नेत्यांच्या जातीयवादाच्या राजकारणावर टीका करताना जरांगे म्हणाले, "आम्ही कुणाला घाबरत नाही. माजलेल्यांना नीट करायची ताकद आमच्यात आहे."
जरांगे यांनी विरोधकांना इशारा दिला, "तुम्ही तिकडून अकबर बादशाहकडून पळून आलात आणि इकडे निझामाची चाकरी करायला लागला, असं आम्ही म्हणायचं का? पण आम्ही तसं म्हणत नाही.
आम्ही बिघडलेल्या रक्ताचं नाही." मात्र, त्यांनी स्पष्ट बजावले, "यांनी आपल्या जातीवर बरंच बोललं... आता मापात राहा. तुम्ही असं बोलण्यासाठीच मराठ्यांनी तीस वर्षे निवडून दिलं का?"
निवडणुकीत बदला घ्या: 'खपाखप पाडा'
जरांगे यांनी मराठा समाजाला आगामी निवडणुकीत मराठाविरोधी उमेदवारांना पराभूत करण्याचे थेट आवाहन केले. ते म्हणाले, "हे बदलणारे नाहीत. त्यामुळे दया माया जरा कमी करा. मराठ्यांच्या विरोधात जे कोण उभा राहतील त्यांना खपाखप पाडा." जेव्हा मराठा एकजुटीची ताकद दिसेल, तेव्हाच नेते मराठ्यांसोबत चांगले राहतील, असे त्यांनी सांगितले.
ओबीसी समाजाला दोष देऊ नका
आरक्षण प्रश्नावर भूमिका स्पष्ट करताना जरांगे यांनी ओबीसी समाजाला दोष देण्यास विरोध केला. "आजपासून कधीच ओबीसी समाजाला दोष द्यायचा नाही. ओबीसी समाजाचा काही संबंध नाही, यात काही नेते आहेत. सगळ्या माळी समाजाचा दोष आहे का? ते छगन भुजबळ बावचाळले आहे. त्यामुळे काही नेते यामध्ये बोलतात," असे म्हणत त्यांनी केवळ मूठभर नेत्यांवर टीका केली.
भावनिक साद अन् मुख्यमंत्र्यांना आवाहन
रुग्णालयातून खास नारायणगडावर आलेल्या जरांगे पाटील यांनी 'विराट संख्येनं जमलेल्या तमाम मराठा बांधवांना माझा मानाचा जय शिवराय' म्हणत भाषणाला सुरुवात केली. प्रकृती ठीक नसतानाही त्यांनी केलेले जोरकस भाषण आणि डोळ्यातून तरळलेले अश्रू यामुळे नारायणगडावरील वातावरण भावूक झाले होते.
यावेळी त्यांनी केंद्र आणि राज्यातील प्रमुख राजकीय नेत्यांना शेतकऱ्यांना मदत करण्याचे आवाहन केले. "महाराष्ट्रातील आणि देशातील प्रमुख राजकीय नेत्यांच्या संपत्तीचा अर्धा हिस्सा कापून तो शेतकऱ्यांना द्यावा," अशी मागणी त्यांनी केली. त्यांनी देवेंद्र फडणवीस, अजित पवार, एकनाथ शिंदे, उद्धव ठाकरे, शरद पवार, नाना पटोले, सोनिया गांधी, राज ठाकरे, नारायण राणे यांसारख्या विविध राजकीय नेत्यांच्या संपत्तीचा उल्लेख करत त्यांच्याकडे शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी पुरेसा पैसा असल्याचे ठामपणे सांगितले.












Click it and Unblock the Notifications