ओबीसींचं आरक्षण 2004 मध्येच संपवलं! मराठा समाजाची आरक्षणाची लढाई वर्चस्ववादी - लक्ष्मण हाकेंची टीका
Maharashtra OBC-Maratha Reservation: मंडल आयोगाच्या माध्यमातून ओबीसींचे आरक्षण २००४ मध्येच संपविण्यात आलं असून मराठा समाजाने काज्यात सुरु केलेली आरक्षणाची लढाई ही वर्चस्ववादी असल्याची टीका ओबीसी आरक्षण आंदोलनकर्ते प्रा. लक्ष्मण हाके यांनी केली आहे.
नांदेड जिल्ह्यातील भोकर येथे आज इतर मागासवर्गीय आरक्षण बचाव मेळावा पार पडला. या मेळाव्यात ओबींसींना संबोधित करताना हाके बोलत होते. यावेळी उमरी चौकातून पारंपारिक वेशात रॅलीही काढण्यात आली.

काय म्हणाले लक्ष्मण हाके?
लक्ष्मण हाके म्हणाले, मंडल आयोगाच्या माध्यमातून १९९४ ला ओबीसींना मिळालेले आरक्षण २००४ मध्ये संपविण्यात आले आहे. बांटिया आयोगाच्या अहवालानंतर ओबीसींच्या ५६ हजार जागा कमी झाल्या आहेत. या आयोगाने राज्यात ओबीसींची संख्या कमी झाल्याचा अहवाल दिला आहे. तो अहवाल कोणत्या आधारे दिला याचा शोध घेणे गरजेचे आहे. त्यामुळे आता ओबीसींना आपल्या हक्काच्या आरक्षणासाठी लढावे लागणार आहे.
मराठ्यांची आरक्षणाची लढाई वर्चस्ववादाची
मराठ्यांनी राज्यात सुरू केलेली आरक्षणाची लढाई ही वर्चस्ववादाची असल्याची टीका मागासवर्गीय आयोगाचे माजी सदस्य प्रा. लक्ष्मण हाके यांनी केली. मराठ्यांना आरक्षण दिले तर ओबीसींना धक्का बसणार नाही असा सरकार दावा करीत आहेत मात्र मनोज जरांगे पाटील हे राज्यात ५४ लाख नोंदी सापडल्याचे सांगत असतील तर ओबीसींच्या आरक्षणाला धक्का बसणार नाही, असे म्हणणे चुकीचेच आहे, असेही हाके म्हणाले.
ओबीसींची मोठ्या लढ्याची तयारी
लक्ष्मण हाके यांनी ओबीसी आता आपल्या हक्काच्या लढाईसाठी मैदानात उतरावे लागेल आणि आशा आहे की, ओबीसी हा लढा निकराने लढतील. महाराष्ट्रात बालेकिल्ले २८८ आहेत पण ओबीसी शोषित आहेत. आमच्या हक्कांवर आणि अधिकारांबाबत तुम्ही बोलणार आहात का नाही हा प्रश्न विचारण्यासाठी आम्ही नांदेडला आहलो आहोत.
लक्ष्मण हाके म्हणाले, आम्ही ओबीसी आहोत आम्हीही महाराष्ट्र देशाचे नागरिक आहोत. ओबीसींचा हक्क, अधिकार, स्वातंत्र्य, अभिमान आम्हाला हवा आहे. जरांगे निवडणुकीत कुणाला मत मागणार, तुम्ही इतर लोकांची आयमाय काढता मग तुम्हाला मत कोण देणार. या आमच्या गावगाड्यात मत मागायला असं आव्हानही त्यांनी जरांगे यांना यावेळी दिलं.
नांदेड जिल्ह्यातील कोणकोणत्या आमदारांनी ओबीसींच्या प्रश्नांवर विधानसभेत आवाज उठवला, आमची बाजू घेतली याचं ऑडीट आम्ही केलं आहे, आम्ही त्यांना सवाल विचारु. एक शब्द ओबीसींच्या प्रश्नांवर न बोलणाऱ्यांना विधानसभा निवडणुकीच्या काळात याचा जाब आम्ही प्रत्येक जिल्ह्यातील आमदारांना, लोकप्रधिनिधींना विचारणार आहोत असेही हाके म्हणाले.












Click it and Unblock the Notifications