महायुतीत 'फोडाफोडी'चा धुमाकूळ!मुख्यमंत्र्यांपुढे ठरूनही कुरघोडी सुरूच; शिवसेनेने फोडला BJPचा उमेदवार
Mahayuti internal conflict : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये महायुती आणि महाविकास आघाडी या दोन्ही प्रमुख राजकीय गटांमध्ये लढत आहे. दुसरीकडे मात्र सत्तेवर असलेल्या महायुतीतील प्रमुख पक्ष असलेल्या भाजप आणि शिवसेनेमध्ये (शिंदे गट) उमेदवारांची फोडाफोडी करण्यावरून तणाव मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. हा वाद थेट दिल्लीपर्यंत पोहोचला असताना, दुसरीकडे वाशिममध्ये ठाकरे गटाच्या अंतर्गत कुरघोडीमुळे एका पदाधिकाऱ्याने बंडखोरी केल्याचं धक्कादायक वृत्त आहे.

हिंगोलीत शिवसेनेचा 'पलटवार': भाजप उमेदवाराची माघार
गेल्या काही दिवसांपासून भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेच्या नगरसेवकांचे भाजपमध्ये प्रवेश घडवून आणले जात असल्यामुळे उपमुख्यमंत्री आणि शिवसेना मुख्य नेते एकनाथ शिंदे यांची नाराजी होती. या नाराजीमुळेच शिंदे यांनी दिल्लीत जाऊन गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतल्याची माहिती आहे.
एका बाजूला शिवसेनेचे उमेदवार भाजप पळवत असल्याच्या तक्रारी होत असतानाच, हिंगोलीमध्ये मात्र शिवसेनेने भाजपला जोरदार धक्का दिला आहे. हिंगोली नगरपालिका निवडणुकीत प्रभाग 16 ब मध्ये भाजपचे अधिकृत उमेदवार असलेले भास्कर बांगर यांनी उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या एक दिवस आधी स्वतः माघार घेतली.
एकनाथ शिंदे यांचे निष्ठावान मानले जाणारे स्थानिक आमदार संतोष बांगर यांनी हा 'फोडाफोडी'चा डाव यशस्वी केला. भास्कर बांगर यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश करत, शिवसेनेचे उमेदवार श्याम कदम यांना आपला पाठिंबा जाहीर केला.
महायुतीमध्ये एकमेकांचे उमेदवार पळवायचे नाहीत, असे मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत ठरले असतानाही, दुसऱ्याच दिवशी हिंगोलीत ही घटना घडल्याने स्थानिक राजकारणात भाजपसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. शिवसेनेने भाजपला 'जशास तसे' उत्तर दिल्याची चर्चा यानिमित्ताने रंगली आहे.
मुख्यमंत्र्यांसोबतच्या बैठकीलाही 'खो'!
महायुतीमधील या 'फोडाफोडी'च्या राजकारणावर शिवसेनेच्या नेत्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली होती. या पार्श्वभूमीवर शिवसेना मंत्र्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. आमदार प्रताप सरनाईक यांनी दिलेल्या माहितीनुसार, या बैठकीत यापुढे कोणीही एकमेकांच्या पक्षाचे नेते, पदाधिकारी व उमेदवार घ्यायचे नाहीत असे स्पष्टपणे ठरले होते. मात्र, हिंगोलीतील घडामोडींनी हे ठरलेले नियम पाळले जात नसल्याचे सिद्ध केले आहे. यामुळे महायुतीतील नेत्यांमध्ये विश्वासाचं वातावरण कमी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
वाशिममध्ये ठाकरे गटातही बंडखोरीचे नाट्य!
एकीकडे महायुतीत तणाव वाढत असताना, महाविकास आघाडीमधील घटकपक्ष असलेल्या ठाकरे गटाच्या शिवसेनेलाही अंतर्गत गटबाजीचा फटका बसला आहे. वाशिम जिल्ह्यातील ठाकरे गटाचे उपजिल्हाप्रमुख नागोराव ठेंगडे यांनी अचानक आपल्या पदाचा राजीनामा दिला. नगराध्यक्षपदासाठी त्यांच्यासाठी आलेला 'एबी फॉर्म' जिल्हाप्रमुख सुरेश मापारी यांनी आपल्या पत्नीच्याअर्जाला जोडला, असा धक्कादायक आरोप ठेंगडे यांनी केला आहे. ठेंगडे यांनी थेट बंडखोरी करून अपक्ष निवडणूक लढवण्याची घोषणा केली आहे. या बंडखोरीमुळे ठाकरे गटाच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार रेखा मापारी यांच्यासमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे.












Click it and Unblock the Notifications